वॉशिंग्टन - दहशतवादाने होरपळत असलेल्या इराकमध्ये सैन्य कारवाईस नकार देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सैन्य कारवाईचे संकेत दिले आहेत. ओबामांनी गुरुवारी घोषणा केली, की इराकच्या मदतीसाठी 300 सुरक्षा सल्लागार तिथे पाठवले जातील. गरज पडली तर, अमेरिका इराकमध्ये नियंत्रित कारवाई देखील करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अमेरिका इराकमध्ये पुन्हा युद्ध लढणार नसल्याचेही ते म्हणाले. सुरक्षा सल्लागार इराक सैन्याला प्रशिक्षीत करण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ओबामांनी व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दलासोबत इराकच्या ताज्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानतर त्यांनी सुरक्षा सल्लागार पाठवण्याची घोषणा केली. ओबामांसह या बैठकीत उप राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, संरक्षण मंत्री जॉन केरी, संरक्षण सचिव चेक हेगल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुजॅन राइस आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर ओबामा म्हणाले, अमेरिका इराकच्या सैन्याला मदतीचा ओघ कायम ठेवणार आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शामला (आयएसआयएस) तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अमेरिका गुप्त सुचना आणि सहकार्याच्या योजनांसदर्भात संयुक्त अभियानाची स्थापना करणार आहे.