आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयाच्या कृत्रिम झडपेचा शोध; शस्त्रक्रिया न करता बसवता येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजेलिस- हृदयाच्या झडपेप्रमाणे काम करणारे एक उपकरण कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. ज्या रुग्णांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणे शक्य नाही त्यांना या कृत्रिम झडपेमुळे दिलासा मिळणार आहे.
लॉस एंजेलिस आरोग्य विभागाने पहिल्यांदाच ट्रान्सकॅथेटर आर्टिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) पद्धतीचा वापर करून एका रुग्णाच्या हृदयात ही झडप बसवली आहे. या रुग्णाची अवस्था गंभीर असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. अमेरिकेच्या अन्न आणि औषधी विभागाने या उपकरणास मान्यता दिली आहे.
हृदयाकडून शरीराला रक्त पुरवठा करणार्‍या धमनीत कॅल्शियम जमा झाल्यास रक्तवाहिनी अरुंद होते आणि रक्तपुरवठा करताना हृदयावर ताण येतो. यास आर्टिक स्टनोसिस म्हटले जाते. यामुळे झडप खराब होते आणि हृदय बंद पडून मृत्यूही येऊ शकतो.
हृदयाकडून शरीराला पुरवले जाणारे रक्त हृदयात परत येण्यापासून ही झडप रोखते. आर्टिक स्टेनोसिसमुळे झडप खराब होते तेव्हा धमनीत रक्त जावे म्हणून हृदयाला जास्त दाब द्यावा लागतो. कृत्रिम झडप एका कॅथेटरच्या मदतीने हृदयापर्यंत पोहोचवली जाते. योग्य ठिकाणी झडप बसवल्यानंतर कॅथेटरच्या टोकाशी असलेला फुगा फुगवून नवी झडप उघडली जाते. ही झडप तत्काळ आपले काम सुरू करते.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. जोनाथन टोबिस म्हणाले की, ऑपरेशन करणे शक्य नसलेल्या रुग्णांना पूर्वी फारच कमी पर्याय उपलब्ध होते. मात्र ही पद्धती त्यांच्यासाठी वरदान आहे. सध्या ही पद्धत फक्त अशा गंभीर रुग्णांसाठीच वापरली जाईल.
नजिकच्या भविष्यात जास्तीत जास्त रुग्णांच्या हृदयाच्या झडपा या तंत्राने बदलता येतील. या विकारात औषधोपचार केलेल्या रुग्णांच्या तुलनेत अशी कृत्रिम झडप बसवलेल्या रुग्णांचे आयुष्य एका वर्षाने वाढलेले एका अभ्यासात आढळून आले आहे. या उपकरणाने बर्‍याच लोकांना नवे आयुष्य मिळेल अशी आशा आरोग्य विभागातील डॉ. रिचर्ड शेमिन यांनी व्यक्त केली आहे.
रुग्णांची संख्या सुमारे 40 टक्के- अनेक रुग्णांना इतर अनेक व्याधी असल्यामुळे त्यांच्यावर हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया करणे शक्य नसते. अशा रुग्णांची संख्या सुमारे 40 टक्के असते. मात्र टीएव्हीआर तंत्राने पहिल्यांदाच अशा रुग्णांच्या हृदयाची झडप बदलण्याचा मार्ग खुला करून दिला आहे. ही झडप एखाद्या सुरक्षारक्षकाप्रमाणे काम करते.