आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उझबेकिस्तानच्या नागरिकांना योगाचे वेड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताश्कंद - भारताने जगाला दिलेल्या योगाची महती उझबेकिस्तानसारख्या देशालाही समजली आहे. म्हणूनच तेथील लोकांमध्ये योगाबद्दल खूप आकर्षण दिसू लागले आहे. केवळ शारीरिक व्यायामापुरते नव्हे, तर जीवनाचा मार्ग म्हणून त्याकडे पाहणा-या लोकांची संख्या देशात वाढू लागली आहे.
भारतीय सांस्कृतिक केंद्राची उझबेकिस्तानमध्ये 1995 ला स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे लालबहादूर शास्त्री केंद्र असे नामकरण करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून दैनंदिन योगा वर्ग चालवले जातात. आमच्या सेंटरमध्ये अनेक लोक दररोज योगाची साधना करतात, असे सेंटरचे संचालक राजेश मेहता यांनी सांगितले. आठवडाभर दररोज एक तास वर्ग घेतले जातात. शनिवारी सेंटरमध्ये ध्यानाचा विशेष वर्ग आयोजित करण्यात येतो. योगाची ओळख, मास्टर क्लास व इतर सामान्य वर्ग घेतले जातात. सहा महिन्यांचा प्रमाणपत्र वर्ग, एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रमही केंद्राकडून घेतला जातो. या वर्गाला अनेक अधिकारी व मान्यवरांचीदेखील उपस्थिती असते. त्यात राजदूत कार्यालयांचाही समावेश असतो. विविध प्रकारच्या संघटनाही त्यात टप्प्याटप्प्याने सहभागी होत आहेत. यात उझबेकिस्तानचा आरोग्य विभाग, इंटरनॅशनल मेडिकल क्लिनिक्स, विविध देशांच्या सांस्कृतिक केंद्रांतील कर्मचारी-अधिकारी वर्ग दिसून येतो.
अनेकांना अनेक फायदे
आर्थरायटिस किंवा श्वसनासंबंधीचे विकार असलेल्यांना त्याचा फायदा जाणवू लागला आहे. काहीजण वजन कमी करण्यासाठी योगा करू लागले आहेत. काहींना हा तणावमुक्तीचा मार्ग वाटतो, असे टी. एन. मंजुनाथ यांनी सांगितले. मंजुनाथ हे भारतीय सेंटरवरील योगा शिक्षक आहेत.
मोफत वर्ग
भारत -उझबेकिस्तान यांच्यातील संबंध सुधारावेत यासाठी योगा, कथ्थक, हिंदी आणि तबल्याचे येथील नागरिकांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो.