कैरो - युद्धाच्या खाईत लोटलेल्या पॅलेस्टाइनला विविध देशांनी पाच अब्ज ४० कोटी डॉलर म्हणजे साधारण ३३० अब्ज रुपये मदत देऊ केली आहे. इजिप्तची राजधानी कैरोमध्ये आयोजित परिषदेत नॉर्वेचे परराष्ट्रमंत्री बोर्गे ब्रेंडे यांनी ही घोषणा केली. पॅलेस्टाइनने ४ अब्ज डॉलरची मागणी केली होती. त्यापेक्षा ही रक्कम खूप मोठी आहे.
ब्रेंेडे म्हणाले, यातील बहुतांश रक्कम गाझाच्या उभारणीसाठी वापरली जाईल. उर्वरित निधी कसा खर्च केला जाईल यावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. कतारने एक अब्ज डॉलरचे आश्वासन दिले आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये ५० दिवस चाललेल्या युद्धामुळे गाझातील किमान एक लाख घरांचे नुकसान झाले आहे. सात आठवड्यांपासून सुरू असलेले युद्ध २६ ऑगस्ट रोजी युद्धबंदीनंतर संपुष्टात आले. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार युद्धात २१०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी, तर ६७ इस्रायली जवान मारले गेले होते. आंतरराष्ट्रीय मदतनिधी हे महत्त्वपूर्ण पाऊल असून पॅलेस्टाइनच्या एकात्मतेसाठी एक चांगला संदेश असल्याचे ब्रेंडे यांनी सांगितले. या परिषदेत विविध देशांच्या मुत्सद्यांचा समावेश होता.
भारताचे २४ कोटी
भारत सरकारने गाझापट्टीच्या पुनर्वसनासाठी ४० लाख डॉलर्स (२४ कोटी ३९ लाख रुपये) मदतीची घोषणा केली आहे. कैरो येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पॅलेस्टाइन प्राधिकरणाने गाझाच्या पुनर्वसनाची योजना सादर केली.
याअंतर्गत जगभरातील विविध देश निधी जमा करत आहेत. आतापर्यंत या योजनेसाठी ५.४ अब्ज डॉलर्सचा निधी जमा झाला आहे. भारताने पॅलेस्टाइन आणि इस्रायलदरम्यान युद्धबंदीसाठी इजिप्तच्या मध्यस्थीचे समर्थन केले होते. या परिषदेत परराष्ट्र मंत्रालयात पश्चिम आशिया आणि उत्तर अाफ्रिकन विषयाचे संयुक्त सचिव संदीप कुमार हे भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यांनीच भारताकडून गाझापट्टीसाठी मदतीची घोषणा केली. यामुळे येथील संघर्षमय भूमीत शांतता निर्माण होईल, अशी भूमिका त्यांनी भारताकडून मांडली.