आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venezuela Crackdown Meets Silence In Latin America News In Amrathi

आशिया ते लॅटिन अमेरिका अशांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - पूर्व युरोपमधील युक्रेन, आग्नेय आशियातील थायलंड आणि दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएलामधील नागरिकांमध्ये सत्ताधार्‍यांविरोधात प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बंडाला चिरडण्यासाठी झालेल्या कारवाईत हिंसाचार घडून आला. त्यात अनेक नागरिक ठार झाले.

युक्रेनही राजकीय पातळीवर अशांत दिसून येते. शनिवारी राष्ट्राध्यक्ष भवनावर आंदोलकांनी कब्जा मिळवल्यापासून बेपत्ता झालेले राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांचा रविवारीदेखील थांगपत्ता लागलेला नाही. दुसरीकडे अनेक दिवसांपासून कैदेत डांबण्यात आलेल्या युलीया त्योमशेंको यांची अखेर सुटका झाली. त्यांना यानुकोविच यांचा कट्टर विरोधक नेत्या मानले जाते. शनिवारी बंडखोरांनी यानुकोविच यांच्या राजीनाम्याची मागणी करून 25 मे रोजी निवडणूक घेण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. सुमारे 4 कोटी 60 लाख लोकसंख्या असलेल्या देशाचे युरोपमधील स्थान महत्त्वाचे आहे. या देशातील राजकीय अस्थैर्य लवकरात लवकर संपणे सामरिक पातळीवर महत्त्वाचे ठरते. दरम्यान, रविवारी राजधानीत हिंसाचाराचे वृत्त नाही.

थायलंडच्या पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांनी पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. शनिवारी रात्री सरकारविरोधी आंदोलन करणार्‍या नागरिकांवर अमानुषपणे गोळीबार करण्यात आला. त्यात पाच वर्षाची मुलगी ठार झाली आणि 34 जण जखमी झाले. अज्ञात हल्लेखोर पिकअप ट्रकमधून आले आणि त्यांनी निदर्शकांवर गोळीबार केला. बँकॉकपासून 300 किलोमीटर पूर्वेला ट्रॅट प्रांतात ही घटना घडली. पीपल्स डेमोक्रॅटिक रिफॉर्म कमिटीचे (पीडीआरसी) 2 हजार निदर्शक आंदोलनात सहभागी झाले होते. सुरुवातीला हल्लेखोरांनी ट्रकमधून एका दुकानावर ग्रेनेड डागले. त्यानंतर त्यांनी आंदोलन स्थळी व्यासपीठावर जोरदार गोळीबार केला. त्यात एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.

हल्ल्यात सातवर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आतापर्यंत थायलंडमधील बंडामध्ये 17 जण ठार, तर शेकडो नागरिक जखमी झाले. माजी पंतप्रधान थकसिन शिनवात्रा यांनी 2006 मध्ये सत्ता सोडली. त्यानंतर बहिणीकडे सत्ता सोपवून लष्करशहा थकसिन दुबईला निघून गेले. 2010 पासून देशात वेगवेगळ्या ठिकाणी लष्करासोबत रेड शर्ट्स संघटनेच्या झालेल्या धुमश्चक्रीत 90 जण ठार, तर 1900 नागरिक जखमी झाले.

व्हेनेझुएलामध्ये जोरदार धुमश्चक्री
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात रॅली निघू लागल्या आहेत. सरकारविरोधी आणि सरकारसमर्थकांकडून असे मोर्चे काढण्यात येत असतानाच शनिवारी झालेल्या हिंसाचारात 10 जण ठार झाले होते. त्यानंतरही रविवारी बंडखोर सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. देशाच्या विविध भागांत हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. व्हेनेझुएला हा तेल साठवणारा सर्वात मोठा देश आहे. परंतु मदुरो यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली, असा आरोप बंडखोरांनी केला आहे.

यानुकोविच देशातच
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांनी देशाबाहेर पलायन केल्याच्या अफवांचे रविवारी त्यांच्या निकटवर्तीयाने खंडन केले. ते देशाच्या पूर्वभागातील खारकिव शहरात मुक्कामी असून राष्ट्राध्यक्षपदाची कर्तव्येही पार पाडत आहेत असा दावा त्यांच्या निकटवर्तीय हॅना हर्मन यांनी ‘एपी’वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.दरम्यान,यानुकोविच यांच्या ठावठिकाण्याबद्दल विश्वासार्ह माहिती अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे संसद अध्यक्षांना राष्ट्राध्यक्षांचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.