आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venezula's President Hugo Chavez Fight With Emperilism , But Defeat By Cancer

व्हेनेझुएलाचे राष्‍ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ साम्राज्यवादाशी लढले, पण कर्करोगापुढे हरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराकास - जगातील साम्राज्यवादविरोधी गटाचे कमांडर समजले जाणारे व्हेनेझुएलाचे डावे राष्‍ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी दोन वर्षे कर्करोगाशी झुंज दिली, परंतु अखेर त्यांना हार मानावी लागली. त्यांच्या कर्तृत्वाचा डंका लॅटिन अमेरिकेतील देशांसह दूरवरच्या इराण आणि बेलारूसपर्यंत फडकत राहिला. क्युबाचे कम्युनिस्ट नेते फिडेल कॅस्ट्रोच्या साम्राज्यवादविरोधी गटाचे आंतरराष्ट्रीय उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

17 व्या वर्षीच सैनिक
व्हेनेझुएलाच्या साबानेतामध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते वयाच्या 17 व्या वर्षीच सैन्यात दाखल झाले होते. 1992 मध्ये त्यांनी राष्‍ट्राध्यक्ष कार्लोस व्हेरेज यांची सत्ता उलथवून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. 1998 च्या राष्‍ट्राध्यक्ष निवडणुकीत प्रचंड बहुमताने ते विजयी झाले. तेव्हापासून ते राष्‍ट्राध्यक्षपदावर होते.
भारताशी व्यापारी संबंध
चावेझ यांचे निधन हा भारताला मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. ओएनजीसी. ऑइल इंडिया आणि इंडियन ऑइलने व्हेनेझुएलामध्ये गुंतवणूक केलेली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनेही गेल्या वर्षी पीडीव्हीएसए या व्हेनेझुएलाच्या कंपनीशी करार केला आहे. भारताने 2011-12 मध्ये व्हेनेझुएलातून 38.30 हजार कोटी रुपयांच्या कच्च्या तेलाची आयातही केली होती.
2005 मध्ये भारताचा दौरा
चावेझ यांनी 2005 मध्ये भारताला भेट दिली होती. दिल्लीच्या जेएनयूमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते. ‘जगावर 19 व्या शतकात युरोपचे व 20 व्या शतकात अमेरिकेचे वर्चस्व राहिले. मात्र, 21 वे शतक हे समाजवाद आणि कष्टक-यांचे शतक असेल,’ असे चावेझ यांनी कोलकाता भेटीत म्हटले होते. त्यांनी अलिप्ततवादी चळवळ आणि साम्राज्यवादविरोधी आंदोलनात महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांनी दिलेल्या योगदानाचेही कौतुक केले होते.
मादुरो यांच्याकडे धुरा शक्य
आगामी 30 दिवसांत व्हेनेझुएलामध्ये राष्‍ट्राध्यक्षपदाची निवडणूक होईल. निकोलस मादुरो (वर्तुळातील) हे सत्य साईबाबांचे भक्त आहेत. ते त्यांच्या भेटीलाही आले होते. नवीन निवडणुकीत चावेझ यांचे उत्तराधिकारी निकोलस यांना आता कॅप्रिलेस यांच्याशी सामना करावा लागेल. त्यांना कॅप्रिलेसच्या तुलनेत प्रचंड बहुमत मिळण्याची शक्यता आहे. ते लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये चावेझ यांची साम्राज्यवादविरोधी राजवट टिकवून ठेवू शकतात. जर त्यांचा पराभव झाला तर मात्र चावेझ यांनी लॅटिन अमेरिकेत डाव्या देशांची केलेली आघाडी आणि देशांतर्गत चळवळीला मोठा हादरा बसू शकतो.