आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पसंख्याकांतील वैशिष्ट्ये जपूनच नागरिकत्व घडवावे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्सफर्ड- उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील व्याख्यानातून भारतातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेली आव्हाने यावर अप्रत्यक्ष भाष्य केले. सरकारच्या सध्याच्या धोरणांचे सर्मथन करीत त्यांनी त्या धोरणांमागची घटनाकारांची भूमिका समजून घेण्याची गरज प्रतिपादन केली. संघ परिवार किंवा नरेंद्र मोदी यांचा उपराष्ट्रपतींनी दुरान्वयानेही उल्लेख केला नसला तरी देशांमधील उजव्या विचारसरणीकडून होत असलेल्या अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाच्या प्रचाराचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अल्पसंख्याकांमधील वैशिष्ट्यांना योग्य स्थान देऊनच भारतीय व्यक्तीचे नागरिकत्व घडवले गेले पाहिजे, असे त्यांच्या व्याख्यानाचे सार होते.

माणसाचे व्यक्तित्व आणि नागरिकत्व यांच्यातील परस्पर संबंधांवर भारताच्या घटनाकारांनी स्वतंत्र विचार केला होता. त्यांनी घालून दिलेला मार्ग योग्य असल्याचे इतिहासाने सिद्ध केले आहे. मात्र या मार्गाला आव्हान देणार्‍या शक्ती आजही डोके वर काढीत आहेत, याकडे उपराष्ट्रपतींनी लक्ष वेधले.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील ऑक्सफर्ड सेंटर ऑफ इस्लामिक स्टडीजमध्ये शुक्रवारी सायंकाळी भारताच्या उपराष्ट्रपतींचे विशेष व्याख्यान झाले.‘व्यक्तित्व आणि नागरिकत्व’ यातील संबंधांकडे पाहण्याचा भारतीय दृष्टिकोन’ हा व्याख्यानाचा विषय होता. व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

अभ्यासपूर्ण तरीही आटोपशीर अशा भाषणात उपराष्ट्रपतींनी व्यक्तित्व आणि नागरिकत्व या दोन्ही संकल्पनांचे विविध अर्थ सांगून त्यांच्यातील परस्पर संबंधांबाबत भारतीय घटनाकारांची दृष्टी स्पष्ट केली. वंश, जात, धर्म, भाषा, वर्ग असे विविध पैलू माणसाच्या व्यक्तिमत्त्वात असतात़ याची जाण घटनाकारांना होती. या पैलूंची मुस्कटदाबी होऊ न देता माणसाचे नागरिकत्व कसे विकसित करता येईल यावर घटनाकारांनी लक्ष केंद्रित केले होते. घटनाकारांच्या या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनाचे विवेचन उपराष्ट्रपतींनी अनेक संदर्भ देऊन केले. समानता म्हणजे व्यक्तीची, गटांची वा समाजाची एकरूपता नव्हे. यामुळे नागरिक म्हणून कायद्याच्या व राजकीय स्तरावर समानतेचा हक्क देत असतानाच विविध समाजगटांची वैशिष्ट्ये व या वैशिष्ट्यांतून निर्माण होणार्‍या गरजा व मागण्या यांची दखल देशाची धोरणे ठरवताना घेतली गेली पाहिजे, अशी घटनाकारांची अपेक्षा होती. यामुळेच सर्व समाजाला एकाच साच्यात बसवण्याची धडपड भारताने केली नाही तर विविधतेचे व्यवस्थापन करून नागरिकांमध्ये एकवाक्यता आणणे हा धोरणाचा गाभा राहिला. ‘सॅलेड-बाऊल अँप्रोच’ असे याला म्हटले गेले. सॅलेडमध्ये प्रत्येक पदार्थाचा वेगळेपणा कायम राहतो. तरीही त्यातून सॅलेड नावाचा वेगळा पौष्टिक पदार्थ तयार होतो.

समाजाचे एकजीवीकरण किंवा एकाच मुशीत समाजाला ओतणे किंवा समाजाचा एक ‘मेल्टिंग पॉट’ तयार करणे या एकेकाळच्या संकल्पना आता जगभर मागे पडत चालल्या असल्या तरी आजही परकीयांबद्दल तसेच इस्लामबद्दल अकारण भयगंड निर्माण करणे किंवा स्थलांतरितांबद्दल अकारण धास्ती बाळगणार्‍या शक्ती डोके वर काढीत आहेत. अल्पसंख्यांकांचे हक्क व नागरिकत्वाच्या कक्षेमधील त्यांचे स्थान हे आजही संवेदनशील विषय आहेत. यामुळेच सध्याची धोरणे व घटनाकारांनी मांडलेली त्यामागची तत्त्वे यांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी शेवटी केले.

हाँगकाँगचे गव्हर्नर व ऑक्सफर्ड विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू ख्रिस पॅटन यांनी खास नर्मविनोदी शैलीतील अध्यक्षीय भाषणात उपराष्ट्रपतींच्या प्रतिपादनाचे कौतुक केले. इंग्रजी व फ्रेंच साहित्यातील दाखले तसेच स्वत:चा व्यक्तिगत अनुभव सांगत त्यांनी व्यक्तित्व ही संकल्पना अद्यापही धूसर असल्याचे सांगितल़े.