आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरियात पुन्हा नरसंहार: लष्कर-बंडखोर धुमश्चक्रीत 89 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैरट - सिरियातील वातावरण चांगलेच चिघळले असून रविवारी देशात पुन्हा झालेल्या नरसंहारात 89 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 57 जवानांचा समावेश आहे, असा दावा एका एनजीओकडून करण्यात आला आहे.
गेल्या मार्चपासून सिरियात असाद सरकार विरोधात असंतोषाचे वातावरण आहे. हा असंतोष मोडून काढण्यासाठी लष्कराने अनेक वेळा कारवाया केल्या. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही तासांत झालेल्या हिंसाचारात 29 नागरिकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचेही नुकसान झाले आहे, असे मानवी हक्क संघटनेच्या निरीक्षकांनी म्हटले आहे.
देशभरात लष्करी व नागरिक यांच्यातील धुमश्चक्रीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते. यंदा हे प्रमाण अधिक वाढले आहे. या धुमश्चक्रीत सर्वाधिक नुकसान बंडखोरांचे झाले आहे. कारण बंडखोरांना शस्त्रे चालवण्याचे योग्य ते प्रशिक्षण उपलब्ध नाही. विरोधी पक्षाने आपल्या विभागात आलेल्या लष्करी वाहनांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न केलेले दिसून येतात. या घटनांतील मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी आम्ही यातील मनुष्यहानीचा शोध घेत आहोत, असे अब्देल रहेमान यांनी सांगितले. कफ्रसिता या हामा प्रांतातील शहरात रविवारी झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री देशात अनेक ठिकाणी दोन्ही बाजूने संघर्ष सुरू होता. अलीप्पो प्रांतात झालेल्या संघर्षात एकाचा मृत्यू झाला.

कारवाईचा मार्ग खुला, पण..
पॅरिस । सिरियाविरुद्ध कारवाई करण्याचा मार्ग खुला आहे, परंतु यासाठी संयुक्त राष्ट्राची परवानगी आवश्यक आहे, असे फ्रान्सने स्पष्ट केले आहे. मागील आठवड्यात राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आॅलंद यांच्यात एक बैठक झाली होती. सिरियाच्या विरोधातील लष्करी कारवाईवर व्हेटो रशिया घाईघाईने माघार घेणार नाही, असे आम्हाला वाटते, असे फ्रान्सचे संरक्षण मंत्री जीन यवेस यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय शक्तीकडून टार्गेट : असाद
दमास्कस । सिरियाला प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शक्ती लक्ष्य करू लागल्या आहेत, असे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी म्हटले आहे.
देशातील भेदाभेद संपून आता देश एका गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना आंतरराष्ट्रीय शक्ती लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. परिस्थिती अशी असली तरी सिरिया आपला सुधारणावादी कार्यक्रमात कोणताही बदल करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या धोरणामुळे सामान्य नागरिक राजकारणात सहभागी होऊ शकणार आहे. देशावर आलेल्या संकटाला सोडून पळून जाता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.