आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Violence In Egypt As Mursi Supporters Comes On Road

इजिप्त पेटले; मुर्सी समर्थक रस्त्यावर, हिंसाचारात 170 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - होस्नी मुबारक यांना पायउतार करण्यासाठी झालेल्या क्रांतीच्या अडीच वर्षांनी इजिप्तमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांचा रोज मृत्यू होत आहे. शनिवारी मोठा हिंसाचार झाला. पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहंमद मुर्सी यांचे समर्थक शुक्रवारी रात्रीपासून रस्त्यावर उतरले होते. शनिवारी सकाळी त्यांच्यावर लष्कराने बेछूट गोळीबार केला. त्यात सायंकाळपर्यंत 170 नागरिक ठार झाले होते, तर 4500 हून अधिक जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत निदर्शने सुरूच होती.

देशातील ताज्या हिंसाचारातील मृतांच्या आकड्यावरून मुर्सी समर्थक व मुस्लिम ब्रदरहुडकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. मुस्लिम ब्रदरहुडचे प्रवक्ते गहद अल हद्दाद म्हणाले, आमचे लोक रात्रीपासून धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळ होण्याअगोदरच लष्कराने आंदोलकांवर गोळीबार केला. हा गोळीबार त्यांना पळवण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी झाला नाही. त्यांना ठार करण्यासाठी ही कृती करण्यात आली.

अल जझिराने मृतांची संख्या 170 व जखमींची 4500 असल्याचे म्हटले आहे. आरोग्य विभागाने मृतांची संख्या 38, तर 120 जखमी असल्याचे म्हटले आहे. मुर्सी पायउतार झाल्यानंतरची हा सर्वात मोठा हिंसाचार आहे. त्याअगोदर 8 जुलैला झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 53 मुर्सी विरोधक ठार झाले होते. दरम्यान, आमच्या समोर अल्जेरिया, सिरियाचे उदाहरण होते. आम्हीदेखील शस्त्र उचलू शकलो असतो, परंतु आम्ही इजिप्तला गृह युद्धाच्या खाईत लोटू इच्छित नव्हतो, असे मुस्लिम ब्रदरहुडचा प्रवक्ता हद्दाद म्हणाला.


तीन तास गोळीबार
मुर्सी समर्थक रबा अल अदावियाजवळ आंदोलनाला बसले होते. त्या वेळी लष्कराने शनिवारी पहाटे तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत गोळीबार केला. सहा वाजेपर्यंत नागरिक विखुरले होते. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. जोरदार गोळीबार केला जात होता. काळ्या वेशात पोलिस अमानुषपणे गोळीबार करत होते. विद्यापीठाचे छत, आजूबाजूच्या इमारती, पूल यावरून पोलिसांनी आंदोलकांना घेरून गोळीबार केला.


फतव्याचा परिणाम नाही
लष्करप्रमुखांचे आदेश झुगारून द्या, असे आदेश कतारमधून मुस्लिम उलेमाने जनतेला दिले होते. मुर्सी समर्थकांनी रस्त्यावरून मागे हटणार नसल्याची भूमिका घेतली होती. अनेक शहरांत त्यांनी हिंसादेखील केली
होती. मुर्सी विरोधकांनी फतवा नाकारला. शुक्रवारपासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. रात्रभर देशातील अनेक भागांत मुर्सी समर्थक-विरोधकांत संघर्ष सुरूच होता. लष्कराने आता समर्थन देण्याचे आवाहन आंदोलकांना केले आहे.

वृत्तपत्रांचे मथळे : शनिवारी सकाळी देशातील वृत्तपत्र व टीव्हीमध्ये शुक्रवारच्या हिंसाचाराच्या बातम्या कमी होत्या, परंतु प्रमुख वृत्तपत्रांनी मुर्सी यांना जे हवे होते, ते या आंदोलनातून मिळाले असल्याचे नमूद केले. सरकारी नील टीव्हीनुसार दहशतवाद्यांचा निपटारा करण्यासाठी हा जनादेश आहे.