आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voting Machine Of Indian Use In Bhutan For The Election

भारताच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर भूतानमध्ये आज मतदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थिम्पू - चीनसोबतच्या वाढत्या सलगीमुळे शेजारी राष्ट्र असलेले भूतान चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी देशात सार्वत्रिक निवडणूक होणार असून भारताच्या दृष्टीने ही प्रक्रिया द्विपक्षीय पातळीवर निर्णायक ठरणार आहे.
देशात लोकशाही मार्गाने होणारी ही दुसरी निवडणूक आहे. भयमुक्त वातावरणात ही प्रक्रिया पार पडावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे भूतानचे मुख्य निवडणूक आयुक्त कुंझांक वांगडी यांनी स्पष्ट केले. द्रुक फुनसम शोंगपा (डीपीटी) या पक्षाची सत्ता आहे. डीपीटीचे जिग्मे थिनले देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना भूतानमध्ये लॉनचेन (पंतप्रधान) म्हटले जाते. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) हा मुख्य विरोधी पक्ष आहे.


शेरींग तोगबे हे विरोधी पक्षनेते आहेत. दोन्ही पक्षांत ही लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत पीडीपीला 47 पैकी केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला होता. देशातील पहिली निवडणूक 2008 मध्ये झाली होती. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान पार पडल्यानंतर त्याच केंद्रांवर मतमोजणीला तत्काळ सुरुवात होईल. शनिवारी रात्रीच नऊ वाजता निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे.


दोन हजार इलेक्ट्रॉनिक यंत्रे भेट
भारताने मित्रराष्ट्राला नेहमीप्रमाणे सहकार्य केले आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारताने भूतानला दोन हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. 2008 मध्ये देशात पहिली निवडणूक झाली होती. त्या वेळीही भारताने भूतानला पाठिंबा दिला होता.


संसदेचे स्वरूप कसे आहे?
भूतानमध्ये लोकशाहीची संसदीय रचना असून त्यात नॅशनल कौन्सिल अर्थात वरिष्ठ सभागृह व नॅशनल असेंब्ली- कनिष्ठ सभागृह आहे. नॅशनल कौन्सिलचे 25 सदस्य असतात. यातील पाच जागा राजाकडून नियुक्त केल्या जातात, तर 20 जणांची वीस जिल्ह्यांतून निवड केली जाते. नॅशनल असेंब्ली 47 जागांची आहे.


प्रचारात भारताचा मुद्दा
भूतानमधील निवडणूक प्रचारात भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधाचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. सत्ताधारी डीपीटीच्या नेतृत्वाखालील सरकार चीनच्या बाजूने झुकले. त्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. त्यापाठोपाठ भारताने केरोसीन व घरगुती गॅसवरील अनुदान बंद केले. त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर झाला. म्हणूनच विरोधी पक्ष पीडीपीने आठ दिवसांच्या प्रचारात हा जिव्हाळ्याचा मुद्दा उचलला आणि सत्तेवर आल्यानंतर भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे आश्वासन दिले आहे.


निवडणूक आकड्यांत
47 जागा
94 उमेदवार
48,000 पोस्टल मतदार.