आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Walk Away, English Movie Release Online In India

वॉक अवे हा इंग्लिश चित्रपट भारतात ऑनलाइन प्रदर्शित होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूजर्सी- वॉक अवे हा इंग्लिश चित्रपट भारतात ऑनलाइन प्रदर्शित होणार आहे. न्यूयॉर्कमधील स्वतंत्र चित्रपट निर्मात्या शैलजा गुप्ता यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या आठवड्यात भारतातील दर्शकांना हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग भारतात पहिल्यांदाच होत आहे. भारतीय-अमेरिकन असलेल्या या इंग्लिश चित्रपटात हलके-फुलके विनोदी नाट्य दाखवण्यात आले आहे. शाहरुख खानने चित्रपट निर्मितीसाठी सहकार्य केले. त्याचबरोबर त्याच्या प्रदर्शनासाठीही शाहरुखच्या रेड चिलीजने मदत केली. त्याच्यामुळेच आपले स्वप्न सत्यात उतरल्याचे गुप्ता यांनी सांगितले. शैलजा या रेड चिलीज कंपनीच्या अमेरिकन प्रमुख आहेत.
हा चित्रपट खूप सुंदर आहे. अगदी मनापासून केलेला प्रयत्न म्हणावा लागेल. सर्वांनी हा चित्रपट जरूर पाहावा, असे शाहरुखने म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपण या चित्रपटाच्या निर्मितीवर काम करत होतो. हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. चित्रपटाचे प्रदर्शन असे आॅनलाइन करण्याची ही पद्धत भारतात नवीन आहे. आॅनलाइन चित्रपट प्रदर्शनाचा हा पर्याय चांगला आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांपुढील अनेक समस्या दूर होतील. चित्रपट वितरणानंतर होणारी धावपळ यामुळे बंद होणार आहे.
न्यूयॉर्कमध्ये दक्षिण आशियातील चांगले अभिनेते म्हणून परिचित असलेले मनू नारायण, सम्राट चक्रवर्ती, मनीष दयाल, सानिव्ह जव्हेरी, दीप्ती गुप्ता, कॅरी अ‍ॅन जेम्स, पल्लवी शारदा, अमी शेठ यांच्या यात भूमिका आहेत. विशाल -शेखर, राम संपत, सागर देसाई, मनू नारायण, कुरूश मिस्त्री, सम्राट चक्रवर्ती या आंतरराष्ट्रीय कलावंतांनी या चित्रपटात आपली कला दाखवली आहे. या शिवाय आॅस्कर विजेत्या रेसुल पुकुट्टीने वॉक अवे या चित्रपटाला साऊंड मिक्सिंग केली आहे. रेड चिलीजने पोस्ट प्रॉडक्शनची जबाबदारी सांभाळली आहे.
चार जोडप्यांची गोष्ट- वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या चार जोडप्यांची ही गोष्ट आहे. त्यांच्यातील पारंपरिक व आधुनिक संस्कृतीत मोठे झालेल्या व्यक्तींमधील तानेबाने विनोदी ढंगाने दाखवण्यात आले आहेत.
आठ गाणी- इंग्लिश, फ्रेंच, हिंदी, मारवाडी, तमिळ अशा विविध भाषेतील आठ गाणी या चित्रपटात आहेत.