आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत विमान अपहरण करून हल्ल्याचे अतिरेक्यांचे मनसुबे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेवर पुन्हा 2001 सारख्या दहशतवादी हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींवर विमान धडकवून केलेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचे अतिरेक्यांचे मनसुबे आहेत. त्यामुळे सावध राहा आणि विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्यास अतिरेक्याला तेथेच गोळी घाला, अशी सूचना पायलट्स असोसिएशनकडून देण्यात आली आहे.
देशातील वैमानिकांची प्रमुख असलेल्या संघटनेने 5 हजार वैमानिकांना यासदंर्भात पत्र पाठवून दक्षता बाळगण्यास सांगितले आहे. विमान अपहरणाचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यासाठी दहशतवाद्यांनी अलीकडेच ‘ड्राय रन ’ केले आहे. विमानात तैनात असलेल्या एअर मार्शल्सने अतिरेकी हालचाली दिसून येताच त्याला आणि त्याच्या मदतीसाठी येणार्‍यास देखील गोळी घालावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजे यातून विमानातील इतर लोकांचे प्राण वाचवणे शक्य होऊ शकेल. अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 मध्ये पहिला दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी अतिरेक्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून पाच प्रवासी विमानांचे अपहरण केले होते. यातील दोन जुळ्या टॉवरला धडकवण्यात आले होते. त्यात सुमारे चार हजार लोकांचा मृत्यू झाला होता

दोन सप्टेंबरच्या घटनेमुळे इशारा
वॉशिंग्टनच्या रेगन इंटरनॅशनल विमानतळावर 2 सप्टेंबर रोजी एक संशयास्पद घटना घडली. ओरलँडोच्या दिशेने जाणार्‍या विमानात एक प्रवासी घाईत उठला आणि वैमानिकाच्या केबिनमध्ये पळत दाखल झाला. त्याचवेळी अनेक प्रवाशांनी आपापली आसने बदलली होती. वाहतूक सुरक्षा प्रशासनाकडून या घटनेस दुजोरा देण्यात आला आहे. घटनेनंतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे विमान परतताना यातील आठ महिलांचा नव्याने तपास करण्याचे आदेश वैमानिकाने दिले आहेत.

हल्ला कठीण करता येईल, अशक्य नाही

विमानावरील हल्ला कठीण करण्याचे काम आपण करू शकतो. परंतु त्या अशक्य बनवणे हाती नाही. आता आम्हाला 100 टक्के असावे लागेल, असे गुप्तहेर विभागाचे माजी संचालक कर्नल माइक फेनेगर यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी तालिबानच्या म्होरक्यास अटक
अमेरिकेच्या लष्कराने तेहरिक-ए-तालिबन या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. लतीफ मेहसूद असे या म्होरक्याचे नाव आहे. परंतु त्याला कधी व कोठे अटक करण्यात आले याची माहिती मात्र अमेरिकी अधिकार्‍यांनी दिली नाही. अमेरिकी दलाने त्याला अटक केल्याच्या वृत्तास मी दुजोरा देतो, परंतु त्याविषयीचा तपशील मात्र माझ्याकडे उपलब्ध नाही, असे गृह खात्याचे उपप्रवक्ते मेरी हार्फ यांनी स्पष्ट केले.