वॉशिंग्टन - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी झालेल्या चर्चेतील अनेक गुपिते कायम आहेत. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासंबंधी नेमकी काय चर्चा झाली याबद्दल भाष्य करण्यास अमेरिकेने स्पष्ट नकार दिला.
"डी' कंपनीसह लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांना मिळणारी आर्थिक मदत थांबवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या नेत्यांनी म्हटले होते.
दाऊद इब्राहिम अर्थात "डी' कंपनीसह दहशतवादी संघटनांना मिळणा-या आर्थिक मदतीचा ओघ थांबवणे असा हा मुद्दा उपस्थित करण्यामागे उद्देश असला तरी अमेरिकेच्या सहायक परराष्ट्र मंत्री निशा देसाई बिस्वाल यांनी यावर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.
ओबामा-मोदी यांच्यात झालेल्या चर्चेत
आपण सहभागी नव्हतो, असे सांगून त्यांनी विषय टाळला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान त्यांचे स्वागत करण्यासाठी तसेच त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर बिस्वालच उपस्थित होत्या. ओबामा यांनी मोदींशी नियोजित वेळेपेक्षा अधिक चर्चा केली होती. त्याकडे लक्ष लागून होते.
मोदी यांनी अमेरिकी नेत्यांना मागे टाकले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आता फक्त भारतापुरतीच मर्यादित राहिली नसून जगभरात ते प्रचंड लोकप्रिय होत आहेत. नुकतेच अमेरिका दौ-यावरून परतलेले मोदी यांनी
फेसबुकवर अमेरिकेतील सध्याचे नेते, गव्हर्नर आणि अन्य लोकप्रिय लोकांना मागे टाकले आहे. सामाजिक संकेतस्थळांवरील अकाउंटचे रेकॉर्ड ठेवणाऱ्या सोशलबेकर्स या संकेतस्थळाचा हवाला देत न्यूयॉर्क टाइम्सने सांगितले आहे की, बुधवारी फेसबुकवर मोदी यांच्या समर्थकांची संख्या १ लाख ७० हजार ५२९ होती. ही संख्या अमेरिकेतील २१ मोठे नेते आणि अिधकारी सोडले तर इतर सर्वांपेक्षा खूप जास्त होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता.
गुंतवणुकीसाठी अमेरिकाच उत्तम : ओबामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचा उल्लेख आर्थिक महासत्ता असा केला होता. परंतु आता त्यांचे सूर बदलेले आहेत. गुंतवणुकीसाठी भारत आणि चीनपेक्षा अमेरिकाच आकर्षक आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. इतरांच्या तुलनेत २१ व्या शतकात जगाचे नेतृत्त्व करण्यास अमेरिका अधिक सक्षम असल्याचे ओबामांनी म्हटले आहे.