आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट हाऊसवर बॉम्बफेक, कोणतेही नुकसान नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसवर मंगळवारी रात्री बॉम्ब फेकण्यात आला. व्हाइट हाऊसच्या कंपाउंडवर बॉम्ब पडताच धुराचे लोट उडाले. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना हा बॉम्ब फेकण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या बॉम्बफेकीबद्दल ऑक्युपाय आंदोलकांवर संशय व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी रात्री व्हाइट हाऊसच्या बाहेर ऑक्युपाय वॉल स्ट्रीट चळवळीचे सुमारे एक हजार कार्यकर्ते निदर्शने करीत होते.त्याचवेळी ही घटना घडली.कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही बॉम्ब थेट व्हाइट हाऊसच्या प्रांगणात पडल्याने सिक्रेट सर्व्हिस संस्थेचे अधिकारी चक्रावून गेले. व्हाइट हाऊस आणि राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सिक्रेट सर्व्हिस या फेडरल गुप्तचर संघटनेकडे आहे. बॉम्ब पडताच व्हाइट हाऊस तात्पुरते बंद करण्यात आले.लगोलग आसपासच्या परिसरातही नाके बंदी करण्यात आली.आंदोलकही गुपचूपपणे परिसरातून निघून गेले व हा परिसर एकदम रिकामा करण्यात आला. या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. व्हाइट हाऊसच्या कंपाउंडवर नेमके काय फेकले याचा तपास सुरू असल्याचे सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते जॉर्ज ऑग्लिव्ही यांनी स्पष्ट केले.
पत्रकारही अडकले
ओबामांसोबत परतीच्या प्रवासावेळी काही पत्रकारही व्हाइट हाऊसला आले होते. त्यांच्याशी पत्रकार कक्षात 45 मिनिटे हितगूज केल्यानंतर या पत्रकारांना व्हाइट हाऊसच्या अधिका-यांनी दुस-याच मार्गाने बाहेर नेले.एक्झिक्युटिव्ह इमारतीमधून त्यांना थेट 17 स्ट्रीट मार्गावर नेण्यात आले.
ओबामा दाम्पत्य हॉटेलमध्ये
बॉम्बफेकीची घटना झाली त्यावेळी सुदैवाने राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे कुटुंबीय व्हाइट हाऊसमध्ये नव्हते. मिशेल यांचा 48 वा वाढदिवस असल्याने राष्ट्राध्यक्ष आपल्या कुटुंबासह डिनरसाठी हॉटेलमध्ये गेले होते.व्हाइट हाऊसला परत येईपर्यंत सर्व काही ठीकठाक झाले होते.

‘त्या’ हल्लेखोरावर हत्येच्या कटाचा आरोप
गतवर्षी व्हाइट हाऊसवर गोळीबार करणा-या हल्लेखोराविरुद्ध फेडरल ग्रँड ज्युरींनी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवला आहे. ऑस्कर रामिरो ऑर्टेगा असे त्या तरुणाचे नाव असून 11 नोव्हेंबर रोजी त्याने व्हाइट हाऊस बाहेर अंदाधुंद गोळीबार केला होता.त्यात इमारतीच्या काचा फुटल्या होत्या.
कोलंबिया जिल्ह्याचे फेडरल ग्रँड ज्युरींनी ऑर्टेगाविरुद्ध एकूण 17 आरोप ठेवले आहेत.16 नोव्हेंबरपासून तो तुरुंगात आहे. हत्येच्या कटाच्या आरोपाबरोबरच त्याच्याविरोधात फेडरल अधिका-यांवर प्राणघातक शस्त्राने हल्ला केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. याशिवाय कोलंबिया राज्याच्या कायद्याची पायमल्ली केल्याचा ठपकाही ज्युरींनी ठेवला आहे.या प्रकरणी त्याला आता जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.