आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife Of Carl Slime Wrote Pre Date Letter, Tata Motors MD Death

पत्नीने लिहिली कार्ल स्लिम यांची मृत्यूपूर्व चिठ्ठी, टाटा मोटर्सच्या एमडींच्या मृत्यूला वेगळी कलाटणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. कारण हॉटेलमधील खोलीतून आढळून आलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्यांच्या पत्नीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मात्र पोलिसांनी ही घटना हत्येचा प्रकार नसल्याचा दावा केला आहे.
टाटा मोटर्सचे संचालक स्लिम (51) यांचा मृत्यू रविवारी झाला होता. त्यानंतर थायलंड पोलिसांनी ते उतरलेल्या हॉटेलमधील खोलीची झडती घेतली. त्यात तीन पानांची मृत्यूपूर्व चिठ्ठी आढळून आली. परंतु चिठ्ठीतील हस्ताक्षर स्लिम यांचे नसून त्यांची पत्नी सॅली (30) यांचे आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. परंतु मंगळवारी पोलिसांनी ही हत्या नसल्याचे स्पष्ट केले. शांग्री-ला हॉटेलच्या 22 व्या मजल्यावरील ही घटना आहे. स्लिम हे कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी येथे दाखल झाले होते. ब्रिटनचे नागरिकत्व असलेल्या स्लिम यांची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे दिसून आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कार्ल यांच्या रुपाने चांगला सहकारी गमावला. त्यांनी आव्हानात्मक काळात नेतृत्व दिले होते, अशा शब्दांत टाटा मोटर्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. टाटा मोटर्समध्ये येण्यापूर्वी स्लिम यांनी चीनच्या एसजीएमडब्ल्यू मोटर्समध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यानंतर 2007-11 या काळात ते जनरल मोटर्सचे व्यवस्थापकीय सदस्य होते. त्यांनी दोन दशके टोयोटा आणि जनरल मोटर्ससाठी जगभरातील विविध ठिकाणी काम केले होते.
हत्या नसल्याचा थायलंड पोलिसांचा दावा
काय आहे चिठ्ठीत ?
स्लिम उतरलेल्या हॉटेलमधील खोलीत तीनपानी चिठ्ठी सापडली आहे. त्यात घरगुती समस्या लिहिण्यात आलेल्या आहेत. ही चिठ्ठी सॅली यांच्या हस्ताक्षरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चिठ्ठी थाई भाषेत भाषांतरित करण्यात येणार आहे. जेणेकरून पुढील तपास सोपा होणार असल्याचे पोलिस अधिकारी सोमयॉत यांनी सांगितले.
नेमके काय घडले ?
26 जानेवारी रोजी स्लिम यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळून आला. त्या वेळी खोलीत त्यांची पत्नी सॅलीदेखील होत्या. परंतु त्या झोपेत होत्या. सकाळी हॉटेलच्या कर्मचाºयांकडून त्यांना ही पतीच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यानंतर जगभरातील उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली.
चिठ्ठी वाचून कृत्य
कार्ल स्लिम यांनी आत्महत्या केली आहे, असा जबाब सॅली यांनी दिला आहे. त्यामुळे ही आत्महत्याच आहे. सॅली यांनी लिहिलेली घरगुती समस्यांची चिठ्ठी वाचल्यानंतर कदाचित आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे पोलिसांना वाटते. पोलिसांनी त्याव्यतिरिक्त चिठ्ठीतील अतिरिक्त तपशील दिला नाही.
कंपनीचा आधार : टाटा मोटर्सची ऑटो क्षेत्रातील वाटचाल निराशाजनक असतानाच्या काळात स्लिम यांनी कंपनीला गर्तेतून बाहेर काढले होते. 2012 मध्ये ते व्यवस्थापनावर आल्यानंतर त्यांनी कंपनीला काही महिन्यांतच भारतीय बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवून दिले होते.