आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Winter Storm Nemo Snowfall Totals, Power Outages, Travel Problems

PHOTOS : न्यूयॉर्कसह अमेरिकेत ‘व्हाइट आऊट’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील ईशान्य राज्ये आणि कॅनडाला शनिवारी बर्फाच्या वादळाने झोडपले.अमेरिकेच्या पाच राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तुफान बर्फवृष्टीमुळे न्यूयॉर्कसह इतर भागातील वीजपुरवठा पुरता कोलमडला असून पाच लाख लोक अंधारात आहेत. बर्फाच्या ढिगामुळे मेट्रो, रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक पूर्णत: बंद आहे. एरवी गजबजलेल्या न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात बर्फाचे ढीग जागोजागी दिसत होते.

मॅसाच्युसेट्स, -होड आयलंड, न्यूयॉर्क, कनेक्टिकटसह अनेक भागांमध्ये महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सुमारे 4 हजार 300 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यात न्यूयॉर्क शहरातील तीन विमानतळांचा समावेश आहे. शहराच्या उत्तरेकडील सर्व रेल्वेसेवाही रद्द करण्यात आली आहे. ओंटारिओ, न्यू ब्रुन्सविक, नोवा स्कोटिआ, न्यू फंडलँड या भागांत वादळी बर्फवृष्टी अनुभवण्यात आली. ओंटारिओमध्ये वाहनांचे 200 अपघात झाले आहेत. त्यात 3 जणांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्कमध्येही एका वयस्कर व्यक्तीचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघाती मृत्यू झाला. प्रांतातील काही भागांत वारे ताशी 75 किमी वेगाने वाहू लागले आहेत. त्यामुळे तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तसे झाले तर तीन फुटी बर्फाचा थर साचण्याची भीती हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

‘घरातच थांबा, मजा करा’ - तीन लाखांहून अधिक घरे अंधारात बुडाली आहेत. अनेक भागांत दोन फुटांपर्यंत बर्फ साचला असून पाच राज्यांत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. बर्फवृष्टीमुळे लोकांनी घरातच राहावे. खा, प्या,
चित्रपट पाहा असा सल्ला न्यूयॉर्कचे महापौर मायकल ब्लूमबर्ग यांनी जनतेला दिला आहे. रस्त्यावर साचलेल्या बर्फाला हटवण्यासाठी अडीच टन मीठ तयार असल्याची माहिती त्यांनी दिली.

इंधनाच्या तुटवड्यामुळे पंपांवर रांगा - वादळामुळे कनेक्टिकट आणि न्यूयॉर्क शहरात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पंपांवर वाहनधारकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यात जनरेटर असलेल्या लोकांचाही समावेश होता. आणीबाणीच्या परिस्थितीत जनरेटरची गरज भासणार असल्याने नागरिक इंधन भरण्यासाठी घाई करत होते.

वादळामुळे हल्लेखोराचा शोध थांबला - लॉस एंजलिस - तीन जणांची हत्या करून फरार झालेल्या एका हल्लेखोराचा तपास पोलिसांना थांबवावा लागला. ख्रिस्तफर डॉर्नर असे त्याचे नाव असून त्याने एका जोडप्याला मारून चार अधिका-यांवर गोळीबार केला. गुरुवारी त्याने हा हल्ला केला होता. त्याचबरोबर त्याने पोलिस खात्यामधील आणखी काही कर्मचा-यांना मारण्याची धमकी दिली आहे. तो मूळचा लॉस एंजलिसमधील ला पामा भागात रहिवासी आहे. गुरुवारपासून त्याच्या शोधासाठी 100 अधिकारी डोंगराळ भागात भटकंती करीत होते.

अणुप्रकल्पही अंधारात - मॅसाच्युसेट्समधील वीजपुरवठा खंडित झाल्याने तेथील अणुप्रकल्पाचा ऊर्जापुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे तेथील काम स्थगित करावे लागले आहे.