मॉस्को - रशियाच्या दक्षिणकडील व्होल्गाग्राद शहर 24 तासांतील सलग दुसर्या अतिरेकी हल्ल्याने हादरले. जेरिंस्की भागातील अतिरेक्यांनी सोमवारी एका ट्रॉली बसला स्फोटकांनी उडवून दिले. यात एक वर्षाच्या मुलासह 15 जणांचा मृत्यू, तर 23 जखमी झाले आहेत.
सरकारी चॅनलवरील दृश्यांनुसार स्फोटातील बसच्या अक्षरश: चिंधड्या झाल्याचे दिसत होते. दरम्यान, राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सुरक्षेवर अधिक काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. रशियात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वे-बसस्थानके, विमानतळ व इतर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे.
तीन हल्ले, दोन महिला फिदायीन : रविवार व सोमवारचे स्फोट 21 ऑक्टोबरच्या स्फोटांसारखेच होते. रविवारच्या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला होता. 21 ऑक्टोबरच्या स्फोटात 7 ठार झाले होते. यापैकी दोन हल्ले महिला फिदायीन अतिरेक्यांनी घडवले आहेत.
दरम्यान, रशियन सुरक्षा दलांनी उत्तर काकेशस परिसरात एका घरात लपून बसलेल्या तीन अतिरेक्यांना गोळ्या घालून ठार केले.