आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहापेक्षा कमी महिला असल्या तरच गप्पांचा फड, पुरुषही बडबडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - महिलांची बडबड किंवा महिलांच्या गप्पा हा विषय नेहमीच सर्वांच्याच चर्चेचा अन् जिव्हाळ्याचा विषय! अखेरीस ‘महिला म्हणजे कोठेही, कधीही आणि कितीही गप्पा मारणार...’ यावर शिक्कामोर्तब करून मोकळ्या होणा-या पुरुषांना थोडे थांबून विचार करायला लावणारी ही बातमी. महिला या पुरुषांपेक्षा जास्त बोलतातच हे सत्य जगभरात मानले जात असले तरी, हे कितपत खरे आहे, यावर अमेरिकेत नुकतेच संशोधन झाले आहे. त्यानुसार महिला नेहमीच पुरुषांपेक्षा जास्त गप्पा मारतात, हे सत्य नसल्याचे सिद्ध झाले आहे. दिवसभरातून महिला 20 हजार शब्द बोलत असतील तर पुरुष फक्त 7 हजार शब्द बोलतात, असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी यापूर्वी केला होता.

गप्पांचे प्रमाण विषय व सदस्यांवर अवलंबून
शैक्षणिक वर्तुळातील समूहात महिला पुरुषांपेक्षा जास्त बोलताना दिसल्या. मात्र, सहा पेक्षा कमी महिला असतील तेव्हाच महिला जास्त बोललेल्या आढळून आल्या. सहापेक्षा जास्त जणांच्या समूहात पुरुषच सर्वाधिक बोलत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुस-या निष्कर्षानुसार, महिलांना एकत्र मिळून काम करायला आवडते आणि एकत्र काम करताना ओघाने बोलावेच लागते. त्यामुळे महिला कायमच गप्पा मारतात, हे त्रिकालाबाधित सत्य नसून ते समूहातील सदस्य (पुरुष किंवा महिला), विषय आणि सदस्य यावर अवलंबून असते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

संशोधन कसे केले?
अमेरिकेतील नॉथ ईस्टर्न विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या संशोधनात माहिती गोळा करण्यासाठी ‘सोशिओमीटर’ या उपकरणाच्या मदतीने महिला आणि पुरुषांच्या बोलण्याचा वेळ मोजला. स्मार्टफोनसारख्या या उपकरणाच्या मदतीने संशोधकांनी विविध ठिकाणी जाणा-या या महिला आणि पुरुषांनी केव्हा, किती वेळ गप्पा मारल्या याचे मोजमाप केले. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना हे उपकरण देऊन 12 तासांतील त्यांच्या बोलण्याचे निरीक्षण करण्यात आले. तसेच अमेरिकेतील एका बड्या बँके मधील कॉल सेंटरचे कर्मचारी लंच ब्रेकमध्ये किती वेळ बोलतात, या दोन निरीक्षणांवरून संशोधनाचे निष्कर्ष काढण्यात आले.