आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Millennium Development Goal 2012 Achievement

सहस्रकातील अनेक उद्दिष्टे साध्य; दारिद्र्य निर्मूलन-झोपडपट्टीच्या समस्या घटल्या

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जगभरात आर्थिक संकटाचे थैमान सुरू असतानाही सहस्रकातील अनेक उद्दिष्टे पूर्ण करण्यात आली आल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या ‘मिलेनियम डेव्हलपमेंट गोल (एमडीजी)-2012’ या अहवालात म्हटले आहे.
दारिद्र्य निर्मूलन, पेयजलाची उपलब्धता आणि झोपडपट्टीचे प्रमाण कमी करण्याबाबत समोर ठेवण्यात आलेली उद्दिष्टे तीन वर्षांपूर्वीच यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत. दुसरीकडे, महिलांवर होणारे अत्याचार, लैंगिक भेदभाव, शिक्षण-संपत्ती आणि सरकारी भागीदारीच्या मुद्द्यांत महिलांबाबतीत असलेले भेदभाव अद्याप कायम आहेत.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी सोमवारी सहस्रक विकास लक्ष्य अहवाल 2012 जारी केला. यानुसार, प्रत्येक विकसनशील देशात गरिबी कमी होत आहे. यात आफ्रिकेतील देशांचाही समावेश आहे. जगातील सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण या देशांत आहे. 1990 मध्ये दररोज 1.25 डॉलर कमावणा-या लोकांची संख्या 2010 पर्यंत ब-याच प्रमाणात कमी झाली आहे. 1990 मध्ये 76 टक्के लोकसंख्येसाठी विकसित जल संसाधने होती. 2010 मध्ये त्यात वाढ होऊन ती 89 टक्क्यांवर गेली आहेत. याचा अर्थ असा की जगभरात दोन अब्ज जनतेला नळयोजना वा सुरक्षित विहिरींतून पिण्याचे पाणी मिळत आहे.
अहवालात नमूद केल्यानुसार, विकसनशील देशांत 2000 मध्ये 39 टक्के लोक झोपडपट्टीत राहत होते. 2012 मध्ये हे प्रमाण घटून 33 टक्के झाले आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी अहवालाच्या भूमिकेविषयी सांगितले की, सहस्रक विकासाच्या दिशेने आम्ही 8 पैकी 3 उद्दिष्टे 2015 पूर्वीच साध्य केली आहेत. मात्र अद्यापही अनेक क्षेत्रांत आव्हाने कायम आहेत. 2015 पर्यंत जगातील 60 कोटी जनतेला शुद्ध पेयजल मिळू शकणार नाही. इतकेच नव्हे तर एक अब्ज लोकांना दररोज 1.25 डॉलरच्या कमाईवर गुजराण करावी लागणार आहे. गर्भवती मृत्यूदर आणि भूकबळींचे प्रमाण व्यापक वैश्विक आव्हान म्हणून कायम राहील. विकसनशील देशांतील अर्ध्या म्हणजेच अडीच अब्ज जनतेला स्वच्छतेची सुविधा आजही मिळत नसल्याचे अहवालात म्हटले आहे. 2015 पर्यंत फक्त 67 टक्के लोकसंख्येलाच स्वच्छतेची साधने उपलब्ध होऊ शकतील. 2010 पर्यंत 65 लाख लोक एचआयव्ही वा एड्सने ग्रस्त असल्याच्या मुद्द्यावर अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. 2009 पर्यंत 14 लाख एड्सग्रस्तांवर
उपचार झाले होते.

उघड्यावर शौचाला जाणा-यांपैकी 60 टक्के संख्या भारतीयांची
नवी दिल्ली। जगभरात उघड्यावर शौचाला जाणा-या लोकांपैकी 60 टक्के लोक भारतातील आहेत. संयुक्त राष्टÑ संघाच्या ‘मिलेनियम डेव्हलपमेंट गोल (एमडीजी)-2012’ या अहवालात म्हटले आहे की, आर्थिक क्षेत्रात जबरदस्त प्रगती करूनही भारतात एकूण 62.60 कोटी लोकांना नाइलाजाने उघड्यावर शौचाला जावे लागते. मात्र गरीब समजल्या जाणा-या आफ्रिकन देशांमध्ये शौचालय वापरणा-यांची संख्या वाढत चालली आहे.
शौचालयांपेक्षा मोबाइल जास्त : जनगणना-2011 नुसार देशातील जवळपास 53.1 टक्के घरांमध्ये शौचालये नाहीत. मात्र 63.2 टक्के लोकांकडे मोबाइल आहेत. 2001 च्या तुलनेत टीव्ही घेणा-यांची संख्याही 50 टक्क्यांनी वाढली आहे. आकडेवारीनुसार भारतात 70 टक्के ग्रामीण आणि 19 टक्के शहरी लोक आजही उघड्यावर शौचाला जातात.