आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील लोकांच्या कल्याणासाठी अपार धन खर्चण्याची त्यांची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 30 वर्षांत जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाने जगाचा चेहरामोहराच बदलवून टाकला आहे. या घडामोडींनी अब्जाधीशांच्या नव्या पिढीला जन्म दिला आहे. आपल्या जीवनाच्या शिखरावर असलेल्या या लोकांचे लक्ष योजना, राजकारण आणि कल्याणकारी कार्याद्वारे जगाला आणखी चांगले बनविण्याकडे आहे. रॉकफेलर, कार्नेगी आणि मेलोनसारख्या व्यक्तींचे युगच जणू परतले आहे. ‘फेसबुक’च्या मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकेत सार्वजनिक शाळांच्या नियमांमधील सुधारणांवर दहा कोटी डॉलर खर्च केले आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील राजकीय जाहिरातींवरदेखील मोठ्या प्रमाणावर पैसा लावलेला आहे. विस्थापितांच्या सुधारणांसाठी काँग्रेसमध्येही पाठपुरावा केला आहे. जॉर्ज सोरोस आणि पीटर लुइस यांनी अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये मारिझुआना वैध करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. उद्योगपती डेव्हिड आणि चार्ल्स कोच ‘ओबामा केअर’च्या विरोधात मोहीम चालविणार्‍या समूहांना समर्थन देत आहेत. बिल गेट्स, एली ब्रॉँड आणि जिमी वॉल्टन यांचे सहकार्य नसते, तर शालेय शिक्षणातील सुधारणांचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा अनेक वर्षे मागे राहिला असता.
न्यूयॉर्कचे महापौर मायकेल रुयूबिन ब्लूमबर्गदेखील अशा व्यक्तींच्या गटात सामील झाले आहेत. लोकांच्या आरोग्यातील सुधारणा हा त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाचा मुद्दा बनविला आहे. न्यूयॉर्कमधील रेस्टॉरंटमध्ये जादा चरबीयुक्त खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आलेली आहे. सोड्याचे प्रमाण नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी करण्यात आलेली आहे. ब्लूमबर्ग यांनी फ्रान्समधून तंबाखूविरुद्धचे अभियान छेडले आहे. पॅरिसमध्ये नुकतेच जागतिक आरोग्य संघटना, मुलांना तंबाखूपासून वाचवा अभियान आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांच्या बैठकीत धूम्रपानविरोधी मोहिमेसंदर्भात मंथन करण्यात आले.
बैठकीत ब्लूमबर्ग म्हणाले की, आपण काही केले नाही, तर या शतकात तंबाखूमुळे एक अब्ज व्यक्तींचा मृत्यू होऊ शकेल. 2007 पासून त्यांनी धूम्रपानविरोधी अभियानावर 61 देशांमध्ये 10 कोटी 92 लाख 44,391 रुपये खर्च केलेले आहेत.
ब्लूमबर्ग यांनी सप्टेंबरच्या शेवटच्या सप्ताहात केलेल्या युरोप दौर्‍यात लंडन, पॅरिसच्या महापौरांसोबत चर्चा केली. इंग्लंडचे पंतप्रधान जेम्स कॅमेरॉन यांच्याबरोबरही चर्चा केली. न्यूयॉर्कच्या महापौरांनी 17 युरोपीय शहरांमधील सुशासनाकरिता स्पर्धा सुरू केली आहे. मलेरिया निर्मूलनासाठी त्यांनी आनुवंशिकदृष्ट्या चांगल्या प्रतिकारक्षम डासांची निर्मिती करण्याच्या संशोधनाकरिता दहा कोटी डॉलरपेक्षा अधिक रक्कम दिलेली आहे. पोलिओ निर्मूलनासाठी नायजेरिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये दहा कोटी डॉलर खर्च केले आहेत. आफ्रिकेत मातृत्व आरोग्य केंद्र उभारले आहे. हेल्मेट वापराबाबतच्या व्हिएतनाममधील अभियानाकरिताही मोठा निधी दिलेला आहे.
अमेरिकेमध्ये कोळशाद्वारे चालणारे वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यासाठी आणि निर्वासितांच्या सुधारणांसाठी ब्लूमबर्ग यांनी रुपर्ट मर्डोक यांच्यासोबत कॉँग्रेसपर्यंत आवाज पोचविला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या या नेत्याचे राजकारणातील वजनही वाढत आहे. त्यांनी स्थानिक, राज्य आणि केंद्रीय निवडणुकांत गन कंट्रोल, शैक्षणिक सुधारणांना पाठिंबा देणार्‍या उमेदवारांना समर्थन दिलेले आहे. संपत्तीत होणार्‍या वाढीबरोबरच त्यांनी सार्वजनिक सुधारणांकरिता जास्त पैसा द्यायला सुरुवात केली आहे. 2001 मध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदाच महापौरपदाची निवडणूक लढविली, तेव्हा त्यांची संपत्ती चार अब्ज डॉलर होती. हा पैसा त्यांनी वृत्तवाहिन्या आणि आर्थिक क्षेत्रातील माहितीविषयक कंपन्यांमधील कारभाराद्वारे कमावला. यावर्षी 31 डिसेंबरला तीन वेळच्या कार्यकाळानंतर पदमुक्त होताना त्यांची संपत्ती 31 अब्ज डॉलर असेल.

समाजाला परत देण्याचे सुख

अनेक अब्जाधीश अमेरिकींनी शिक्षण, आरोग्यासह विविध क्षेत्रांमधील कल्याणकारी योजनांकरिता अब्जावधी रुपयांची मदत दिलेली आहे.

बिल आणि मेलिंडा गेट्स
मायक्रोसॉफ्टद्वारे 72 अब्ज डॉलर कमावले. 1994 पासून 2004 पर्यंत आपल्या फाउंडेशनला 26 अब्ज डॉलर दिले. पुढील सहा वर्षांमध्ये पोलिओ निर्मूलनावर 1.8 अब्ज डॉलर खर्च करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.


कोच ब्रदर्स
कोच इंडस्ट्रीजद्वारे 72 अब्ज डॉलरचे साम्राज्य निर्माण केले. ते अनुदारवादी मानले जातात. तरीही वैद्यकीय संशोधनासाठी 30 कोटी आणि आर्ट म्युझियमकरिता त्यांनी सहा कोटी 50 लाख डॉलर दिले आहेत.


जिम वाल्टन
वॉलमार्ट रिटेल स्टोअर्सद्वारे 34 अब्ज डॉलरची संपत्ती कमावली. 2009 पासून वाल्टन परिवाराने शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरिता 60 कोटी 80 लाख डॉलरची मदत केलेली आहे.


मायकेल ब्लूमबर्ग
ब्लूमबर्ग एलपी कंपन्यांनी 31 अब्ज डॉलर कमावलेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाला एक अब्ज डॉलरहून अधिक मदत दिली आहे. गेल्या वर्षी सरकारी संशोधन, आरोग्य, कला संरक्षणासाठी मदत दिली.


जॉर्ज सोरोस
सोरोस फंड मॅनेजमेंटद्वारे 20 अब्ज डॉलर कमावले आहेत. सोरोस उदारमतवादाचे समर्थक आहेत. त्यांनी 2004मध्ये जॉर्ज बुश यांना पराभूत करण्याकरिता दोन कोटी डॉलरपेक्षा अधिक खर्च केला होता.