नवी दिल्ली - जगभरात कॅन्सरच्या निदान आणि उपचारांवर होणारा खर्च हाँगकाँगच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाएवढा असल्याचा दावा नव्या अहवालात करण्यात आला आहे. कतार येथे १७-१८ फेब्रुवारीदरम्यान होणार्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये (डब्ल्यूआयएसएच) हा अहवाल मांडण्यात येणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा होत आहे. अहवालाच्या माध्यमातून या आजाराच्या जनजागृतीबाबत भर देण्यात आला आहे.
उच्च उत्पन्न गटाच्या देशांमध्ये २००३ ते २०३० पर्यंत कॅन्सरच्या प्रमाणात ६५ टक्क्यांनी वाढ होईल. मध्यम उत्पन्न गटामध्ये ८० टक्के, तर गरीब देशांमध्ये हे प्रमाण १०० टक्के असेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. हाँगकाँगची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी ३५ वी अर्थव्यवस्था आहे. २०१३ च्या आकडेवारीनुसार हाँगकाँगचा जीडीपी २७४ अब्ज डॉलर होता.
धोका कमी करण्यासाठी जनजागृती आवश्यक
"विश'च्या अहवालानुसार आगामी दहा वर्षांत नव्या कॅन्सर निदानाच्या खर्चात मोठी वाढ होईल. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये २०१५ पर्यंत हा खर्च ४२-६६ टक्क्यांपर्यंत वाढेल. कॅन्सरचा वाढता धोका कमी करण्यासाठी जगातील सरकारे, आरोग्य संस्थांनी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. श्रीमंत देशांमध्ये आरोग्य सेवेवरील ५-७ टक्के खर्च कॅन्सरवर होतो. २०१० मध्ये या देशांनी २९० अब्ज डॉलर खर्च केल्याचे स्पष्ट करण्यात आले.