आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xi Jinping Narendra Modi Meeting News In Marathi, Chinese President, Divya Marathi

साबरमतीच्या साक्षीने मैत्रीचे नवे पर्व सुरू, जिनपिंग यांचे शानदार स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बहुप्रतीक्षित दौ-याला बुधवारपासून सुरुवात झाली. श्रीलंकेहून थेट येथे सपत्नीक दाखल झालेले जिनपिंग यांच्या स्वागताला गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली, मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची उपस्थिती होती. साबरमतीच्या रिव्हर फ्रंटच्या साक्षीने उभय देशांतील मैत्रीच्या नवीन पर्वाला सुरुवात झाल्याचे मानले जाते.

पत्नी पेंग लियॉन यांच्यासह जिनपिंग यांचे बुधवारी दुपारी एअर चायनाच्या विशेष विमानाने आगमन झाले. हा तीन दिवसांचा भारत दौरा असून त्याची गुजरातपासून सुरुवात झाली. जिनपिंग यांना पोलिसांकडून सलामी देण्यात आली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी कम्युनिस्ट नेतृत्वाखालील चीनला अनेक वेळा भेट देऊन सुदृढ संबंध प्रस्थापित केले होते. आता पंतप्रधान म्हणून काम करताना मोदींनी हे संबंध आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिनपिंग यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचंड कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुसरीकडे पाकिस्तानशी असलेले सख्य, सरहद्दीवरील कुरापतींमुळे दोन्ही देशांतील तणाव या दौऱ्याने निवळणार आहे; परंतु तीन दिवसांच्या भेटीत जिनपिंग मैत्रीच्या कितीही आणाभाका घेणार असले तरी आपली वचने ते कितपत पाळतील, यावर प्रश्नचिन्ह असल्याचे िदसून येते.

हिंदी चिनी भाई-भाई की...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हयात हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे स्वागत केले. त्या वेळी हस्तांदोलनासाठी सुरुवातीला मोदींनी हात पुढे केला.

गुजरातशी झाले तीन करार
गाँगझू आणि अहमदाबाद ‘सिस्टर िसटी’ म्हणून विकसित करण्यासंबंधी दोन्ही प्रांतांत सहमती करार बुधवारी झाला. आैद्योगिक पार्क उभारण्यासाठी दोन्ही राज्ये परस्परांना सहकार्य करतील. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल उत्पादनांच्या निर्मितीला त्यामुळे चालना िमळणार आहे. त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरही देवाण-घेवाण होईल.

प्रोटोकॉल सोडून आतिथ्य
जिनपिंग यांचे िवमानतळावरून हयात हॉटेलमध्ये आगमन झाले. त्या वेळी खुद्द मोदी यांनी त्यांना रिसिव्ह केले. पंतप्रधान म्हणून असलेला प्रोटोकॉल सोडून मोदींनी त्यांचे भारतीय परंपरेनुसार स्वागत केले.

रिव्हरफ्रंटच्या झोपाळ्यावर
गुजरातच्या भेटीत जिनपिंग यांना मोदींनी आपला साबरमती नदीवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प रिव्हरफ्रंट उद्यानाची सैर करून आणली. त्याचबरोबर तेथील झोपाळ्यावर बसून उभय नेत्यांनी मनमोकळा संवादही साधला. यानिमित्ताने गुजराती लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या नृत्य-संगीताचा कार्यक्रमही सादर करण्यात आला.

जॅकेट भेट, जिनपिंग यांनी चरखा चालवला
अहमदाबादमध्ये आल्यानंतर मोदींनी जिनपिंग यांना पांढऱ्या रंगाचे खादीचे जॅकेट भेट दिले. हेच जॅकेट जिनपिंग यांनी परिधान करून आश्रमाला भेट िदली. या वेळी जिनपिंग यांनी आश्रमात काही वेळ चरखा चालवून पाहिला. जिनपिंग यांनी तेथील व्हिजिटर डायरीमध्ये त्यांनी स्वाक्षरी देखील केली.

गुजराती पदार्थांचा आस्वाद
जिनपिंग यांच्यासमवेत २२ जणांचे िशष्टमंडळ आले आहे. त्यात उद्योगपती व उच्चाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासह िशष्टमंडळाच्या पाहुणचारात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून सर्व प्रकारची बडदास्त ठेवण्यात आली होती. रिव्हरफ्रंटच्या रमणीय वातावरणात पाहुण्यांनी रात्री गुजराती पदार्थांचा आस्वाद घेतला.