आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'याहू'चे सह-संस्‍थापक जेरी यांग यांचा राजीनामा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रॅन्सिस्को - इंटरनेटच्‍या विश्‍वातील आघाडीचे पोर्टल म्‍हणून गणल्‍या गेलेल्‍या 'याहु' या कंपनीचे सह-संस्थापक जेरी यांग यांनी आज त्‍यांच्‍या पदाचा राजीनामा दिला. यांग यांनी 'याहू'च्‍या संचालक मंडळासोबतच कंपनीच्या इतर सर्व पदांचा राजीनामा दिला. याशिवाय जपानमधील याहू जपान कार्पोरेशन तसेच अलिबाबा ग्रुप ऑफ होल्डिंग लिमिटेड या कंपन्‍यांच्‍या संचालक मंडळातूनही राजीनामा दिला आहे. या कंपन्‍यांमध्‍ये याहूची भागीदारी आहे. दोन आठवड्यापूर्वी याहूच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी पदावर स्‍कॉट थॉमसन यांची नियुक्ती करण्‍यात आली होती. त्‍यानंतर यांग यांनी हा निर्णय घेतला आहे. थॉमसन हे यापुर्वी 'इ-बे' या कंपनीचे सीईओ होते.
याहूचे अध्यक्ष रॉय बोस्टाक यांना लिहिलेल्या पत्रात यांग यांनी म्हटले आहे, 'माझ्यासाठी याहू व्यतिरिक्त आणखी काही विचार करण्याची वेळ आली आहे. सुमारे १७ वर्षापूर्वी ज्या कंपनीच्या स्थापनेत माझा वाटा होता, त्यापासून मी आता वेगळा होत आहे. हा कालावधी माझ्या आयुष्‍यातील सर्वात उत्‍साहवर्धक होता.'
याहुच्या कार्यकारी प्रमुखपदी स्कॉट थॉमसन यांची नियुक्तीबद्दल आणि याहूच्या नेतृत्वाबद्दल समाधानी असल्‍याचे सांगून त्‍यांनी थॉमसन यांना पाठींबाही दिला. कंपनीमध्‍ये गेल्‍या नोव्‍हेंबरपर्यंत यांग यांचा 3.8 टक्‍के वाटा होता. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये याहूचे उत्‍पन्‍न तसेच लोकप्रियतेवरही मोठा परिणाम झाला आहे. तसेच कंपनीचे बाजारातील मुल्‍यही कमी झाले आहे.
१९९०च्या दशकात याहु हे जगातील पहिल्या क्रमांकाचे इंटरनेट पोर्टल होते. आजही जगात मोठ्या प्रमाणात याहुचा वापर होतो. याहुची यांग आणि डेव्हिड फिलो या दोघांनी मिळून १९९५ मध्ये स्थापना केली होती. कंपनीची 1996मध्‍ये समभाग विक्री करुन सार्वजनिक करण्‍यात आली होती. यांग हे 'चीफ याहू' या पदावर होते. त्‍यांनी जून 2007 ते जानेवारी 2009 या कालावधीत कंपनीच्‍या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली होती. मायक्रोसॉफ्टने याहूच्‍या खरेदीसाठी 47.5 बिलीयन डॉलर्सची ऑफर दिली होती. ती ऑफर यांग यांनी फेटाळली होती. यांग यांच्‍या जागेवर कॅरोल बार्ट्झ यांची नियुक्ती करण्‍यात आली होती. परंतु, बार्ट्झ यांची गेल्‍या वर्षी हकालपट्टी करण्‍यात आली होती.