Home | International | Other Country | year 2012, international relation & politics

आंतरराष्ट्रीय : 2012 वर्ष ठरविणार जगाची पुढील चार वर्षांची दिशा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 31, 2011, 04:00 PM IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर २०१२ वर्ष हे एक महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या वर्षात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुक होणार आहे.

 • year 2012, international relation & politics

  आंतरराष्ट्रीय पातळीवर २०१२ वर्ष हे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या वर्षात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ओबामांनी ४ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सिनेटर जॉन मॅककेन यांचा ३६५ विरुद्ध १६५ मतांनी पराभव केला होता. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले. आता पुन्हा एकदा २०१२ मधील नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणूकीत अमेरिकेतील नागरिक ज्या उमेदवाराला निवडून देतील तो नेता जगाच्या आगामी चार वर्षाची दिशा ठरविणार आहे. कारण अमेरिका आजही महासत्ता आहे.
  डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार पुन्हा बराक ओबामा असतील, हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. पण तरीही या निवडणुकीला सुमारे दहा महिन्यांचा कालावधी आहे. ओबामांनी त्या दृष्टीने सुरुवात केली आहे. रिपब्लिकन पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळते, यावरही ओबामांचे भवितव्य ठरेल. सध्या रिपब्लिकन पक्षाकडून बरेच जण इच्छुक आहेत. त्यात मिशेल बेचमन, सराह पालिन, भारतीय वंशाचे व सध्या लुईझियाना राज्याचे गव्हर्नर असलेले बॉबी जिंदाल, मिट रोमनी तसेच माजी राष्ट्राध्यक्ष जार्ज बुश (धाकटे) यांचे लहान बंधू जेब बुश यांची नावे आघाडीवर आहेत.
  अमेरिकेला आर्थिक मंदीचा फटका मागील काही वर्षे सलग बसत आला आहे. जार्ज बुश यांच्या शेवटच्या टप्प्यातील (२००६-०७) कार्यकाळापासून अमेरिकेला बऱयाच प्रश्नांनी घेरायला सुरुवात केली होती. याच काळात अमेरिकेची आर्थिक पडझड सुरु झाली. चीन, भारतासारख्या विकसनशील देशांनी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी आघाडी घेतली. त्यातच बुश यांनी इराकबाबत जे धोरण राबविले त्याला अमेरिकेत मोठा विरोध झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेला याबाबत बरीच टीका सहन करावी लागली. इराक धोरणाचा अमेरिकेला राजकीय व आर्थिक पातळीवर मोठा फटका बसला. राष्ट्राध्यक्ष बुश यांचे आंतरराष्ट्रीय धोरण पुरते चुकले होते. त्याच काळात अमेरिकेत बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. भारतीय, चीनी कंपन्यांनी बहुतांश कामे पटकावली होती. त्यामुळे अमेरिकन तरुणांत बुश यांच्या धोरणाचा चुकीचा संदेश गेला. त्याचाच फायदा घेत डेमोक्रटिक पक्षाचे उमेदवार म्हणून बराक ओबामाची निवड झाली. त्यांनी पक्षातील सिनेटर व माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची पत्नी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला. त्यांची तरुणांत विशेष क्रेझ होती. तरुणांचीच भाषा ते बोलत होते. त्यांच्या जीवावरच त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सिनेटर जॉन मॅककेन यांचा मोठा पराभव करीत निवडणुक जिंकली होती.
  पण मागील तीन वर्षांत जागतिक स्तरावर बऱयाच घडामोडी घडल्या असून, नव्या देशांचा आंतरराष्ट्रीय आर्थिक पातळीवर दबदबा वाढलाय. त्यात भारत, चीन यासारख्या देशांचा समावेश होता. २००८ मध्ये 'सबप्राईम'मुळे ढासळलेल्या अमेरिकेची स्थिती नंतरच्या तीन-चार वर्षांतही फारशी चमकलेली नाही. आजही अमेरिकची आर्थिक गाडी मोठ्या प्रमाणात घसरली आहे.
  युरोपची स्थिती तर अमेरिकेपेक्षा वाईट झाली आहे. युरोपातील २७ देशांनी एकत्र येत युरोपियन महासंघाची स्थापना केली. युरोपच्या भरभराटीसाठी युरो हे सार्वत्रिक चलन म्हणून स्वीकारण्यात आले. पण त्यामुळे युरोपची भरभराटी सोडाच पण पुरते वाटोळे झालेले. ग्रीक, इटली, पोर्तुगाल अगदी जर्मनीही युरोप कर्जसंकटाच्या समस्येतून सुटू शकली नाही. याला जबाबदार ठरलेल्या नेतृत्त्वात बदल करण्यात आले आहेत. पण यावर किमान २०१२ मध्ये तोडगा निघेल व समस्या सुटेल, अशा चिन्हे आतातरी कुठेही दिसून येत नाहीत. त्यामुळे २०१२ हे वर्ष जागतिक पातळीवर आर्थिक मंदीतच जाईल, असे तज्ज्ञ सांगतात. दुसरीकडे भारत, चीन, ब्राझीलसारख्या देशांनी आपला विकासदर चांगला राखला आहे. पण अमेरिका व युरोपमधील मंदीचा फटका या देशांना हळूहळू बसू लागला आहे. २०१२ साली तो आणखी गडद होऊ शकतो.
  आंतरराष्ट्रीय राजकारणात आशिया खंडातील देशांचे महत्त्व या वर्षात आधोरेखित होईल. त्यामुळेच अमेरिकेने मागील काही दिवसापासून चीनची अरेरावी थोपविण्यासाठी ऑस्ट्रेलिया, भारताबरोबरचे संबंध सदृढ करण्यावर भर दिला आहे. चीन आज आशियातील महासत्ता आहे. तसेच जागतिक स्तरावरही अमेरिकेनंतर त्यांच्याच अर्थव्यवस्थेचा क्रमांक आहे. त्यामुळे राजकीय व आर्थिक पातळीवर चीन भविष्यात भारत, अमेरिकेसह आशियाई देशांना वरचढ ठरु शकतो. त्यामुळेच चीनने भारत व अमेरिकेचे अवघड जागेचे दुखणे असलेल्या पाकिस्तानसोबत धोरणात्मक निर्णय घेत घट्ट मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
  अमेरिकेचे इराकबाबत फसलेल्या धोरणाप्रमाणे अफगाणिस्तानमध्येही तशीच परिस्थिती उदभविण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे निवडणूक होण्याआधीच अडचणीत येऊ लागलेल्या 'हुशार' ओबामांना २०१४ पर्यंत अफगाणमधून नाटो व अमेरिकेचे सैनिक माघारी बोलवू, असे जाहीर करावे लागले. पाक-अमेरिका यांच्यातील वाढता तणाव हे त्यातील एक कारण आहे. ब्राझील, रशियाची वाटचाल शांततेने चालू आहे. रशियात पुतिन यांच्याच पक्षाने नुकतीच निवडणूक जिंकली आहे.

Trending