आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yokren President Reject To Deal With European Union

युक्रेनच्या अध्यक्षांचा युरोपियन संघाशी करार करण्यास नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कीव - युक्रेनच्या अध्यक्षांनी युरोपियन संघाशी करार करण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेले हजारो लोक सरकारचा बंदी आदेश झुगारून रविवारी रस्त्यावर उतरले. राजधानी कीवच्या मध्यभागी असलेल्या इंडिपेंडन्स स्क्वेअरमध्ये निदर्शने करण्यास सरकारने बंदी घातली होती, तरीही पोलिसांशी झटापट करत जवळपास एक लाख लोक आंदोलनात उतरले आणि त्यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला. क्रांतीच्या गगनभेदी घोषणांनी इंडिपेंडन्स स्क्वेअर दणाणून गेला होता.
आठवडाभरापासूनच युक्रेनमध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली, परंतु रविवारी आंदोलनाला झालेली गर्दी प्रचंड होती. पश्चिम युक्रेनमध्ये युरोपीय संघ समर्थकांची मोठी संख्या आहे. बहुतांश आंदोलक पश्चिम युक्रेनमधूनच आले होते. आम्ही कमालीचे संतप्त झालेलो आहोत. नेतृत्वाने आता राजीनामा दिलाच पाहिजे. आम्हाला युरोप आणि स्वातंत्र्य हवे आहे, असे मायकोला सॅप्रोनोव या 62 वर्षीय निवृत्त व्यावसायिकाने सांगितले.
अशी पडली ठिणगी
युक्रेनचे अध्यक्ष व्हिक्टोर यानुकोवीच यांनी युरोपीय संघ आणि युक्रेनमध्ये मुक्त व्यापार आणि दृढ राजकीय सहकार्य करार करण्यास नकार दिला आहे. रशियाशी असलेले व्यापार संबंध तोडणे युक्रेनला परवडणारे नाही, असे सांगत यानुकोवीच यांनी आपल्या निर्णयाचे समर्थनही केले आहे. गेल्या शुक्रवारी युक्रेन आणि युरोपीय संघात या करारावर स्वाक्ष-या होणार होत्या, पण यानुकोवीच यांनी नकार दिला आणि संतप्त झालेले नागरिक अध्यक्षांच्या या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत.
...आणि भडका उडाला
शनिवारी इंडिपेंडन्स स्क्वेअरमध्ये आंदोलन करणा-या निदर्शकांवर दंगलविरोधी पोलिसांनी लाठीमार केला होता. या लाठीमारात अनेक निदर्शक जखमी झाले. काहींची डोकी फुटली. सरकारच्या या कृतीमुळे लोक भडकले आणि रविवारी ते हजारोंच्या संख्येने इंडिपेंडन्स स्क्वेअरमध्ये उतरले. पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडून लोकांचे लोंढे चौकाच्या दिशेने येत असलेले पाहून पोलिस स्वत:च चौक सोडून गेले.