आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झरदारी-कयानी यांच्यात पॅचअप? तणाव निवळणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांची लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी यांनी भेट घेतली. लष्कर व सरकार यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून विकोपाला गेल्याचे सांगितले जात होते. मात्र कयानी यांनी शनिवारी झरदारी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्या भेटीनंतर झरदारी हे प्रसन्न व हसतमुख दिसत होते. त्यामुळे झरदारी व कयानी यांच्यात पॅचअप झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यानंतर पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनीही लष्कर आणि सरकार यांच्यात एकोपा असल्याचे म्हटले आहे. सरकार-लष्कर यांच्यातील वाद टोकाला पोचलेला असताना गिलानी यांच्या वक्तव्याला महत्त्व देण्यात येत आहे. तसेच उद्यापासून झरदारी यांच्यावर सुप्रीम कोर्टात खटला दाखल करण्याची शक्यता लक्षात घेता या घडामोडींना मोठे महत्त्व आहे.
'मेमोगेट' प्रकरणावरून वादळ उठल्यानंतर प्रथमच कयानींनी झरदारींची भेट घेतली. झरदारी यांच्या निवासस्थानी तासभर झालेल्या या बैठकीबाबत अधिकृतरीत्या काहीही सांगण्यात आले नाही. मात्र, झरदारी प्रसन्न दिसत होते व कयानींसोबत खेळीमेळीत बोलत होते, असे दृश्य वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले. विशेष म्हणजे पंतप्रधान गिलानी हे नियोजित संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक घेणार होते. तत्पूर्वीच काही वेळ कयानी-झरदारी भेट झाली.
त्यानंतर गिलानी यांनी कयानी यांच्यासह वरिष्ठ लष्कर अधिकारी, मंत्री यांच्या उपस्थितीत संरक्षणविषयक समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर गिलानी म्हणाले, पाकिस्तानी लष्कर हे देशाच्या लवचिकपणाचा व ताकदीचा स्तंभ आहे, देशसंरक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. लष्कर व सरकार यांच्यात कोणताही वाद नाही. आम्ही एकत्रितपणे काम करीत आहोत, भविष्यातही करीत राहू. त्याद्वारे देशाचे भविष्य घडवू आणि जगातील देशांमध्ये आपल्या देशाला मानाचे स्थान प्राप्त करून देऊ शकतो. राष्ट्रीय एकोपा ही या घडीची गरज आहे व ती सरकार-लष्करात यांच्यात दिसून येत आहे. लष्कराला नागरिकांच्या हितासाठी कार्यरत राहण्याची मुभा देणे व सहकार्य करणे हे आमच्या सरकारचे धोरण आहे. लोकशाही परंपरेला सुदृढ ठेवण्याच्या इच्छेतूनच आम्हाला संसदेतून ताकद मिळते, असे सांगत सरकार व लष्करात एकोपा कायम असल्याचे सूचित केले.
झरदारी व कयानी यांची भेट घडविण्यात पाकिस्तान पीपल्स पाटीर्तील काही नेते आणि परदेशी राजनीतीज्ञांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या दोघांत 'पॅचअप' झाल्याच्या बातम्या येत आहेत. लष्करप्रमुख कियानी व 'आयएसआय'चे प्रमुख पाशा यांच्याबाबत जाहीर व टीकास्पद वक्तव्ये करणे गिलानींनी टाळावीत अशी गळ कियानींनी झरदारींकडे घातल्याचे समजते. त्यांची अट झरदारी यांनी मान्य केल्याचे समजते. त्यानंतर लगेचच गिलानी यांनी लष्कर व सरकार यांच्यात एकोपा असल्याचे म्हटले आहे. उद्या सोमवारी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचे १७ सदस्यांचे खंडपीठ, झरदारी व अन्य काही जणांविरुद्धच्या भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा सुरू करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सहा कलमी अल्टिमेटमवर सरकारची बाजू ऐकणार आहे. आतापर्यंत सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र कयानी-झरदारी यांच्यात पॅचअप झाल्याने पाकिस्तानमधील तणाव निवळणार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांची फाइल स्वत:चाच पक्ष उघडणार!
सरकार व लष्कर यांच्यात ताण-तणाव मला नको आहे- झरदारी