आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Joke: पत्रकाराच्या मृत्यूनंतर स्वर्गात झाली धम्माल, वाचून पोट धरून हसायला लागाल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका पत्रकाराचा मृत्यू झाला. स्वर्ग-नरकाच्या द्वारावर त्याने चित्रगुप्ताला सांगितलं की मला स्वर्गात जायचंय.
चित्रगुप्त म्हणाला, तुझ्यासाठी फार बोअरिंग जागा आहे ती. कसलीही खळबळ नाही, दु:ख नाही, स्कँडल नाही, वाईट काही घडत नाही, बातमी देण्याजोगं काहीच नाही. तिथे जाऊन तू काय करणार? त्यापेक्षा नरकात जा. तिथे बातम्याही खूप आहेत आणि गल्लोगल्ली वर्तमानपत्रं आहेत, टीव्ही चॅनेल आहेत. तुझ्यासारख्याची तीच जागा आहे.
हा पत्रकारांना स्वर्गात प्रवेश नाकारण्याचा कटच आहे. बातमीसाठी मला नरकात जाण्याची गरज नाही. इथेच माझी मृत्यूनंतरची पहिली बातमी मला सापडली आहे, हे तुझ्या लक्षात आलंय का?
चित्रगुप्त म्हणाला, वा रे बहाद्दरा, तू थेट चित्रगुप्तालाच बातमी देण्याची धमकी देतोयस! भारीच आहेस. हे पाहा, आता तुला खरी गोष्ट सांगतो. मुळात स्वर्गाला वर्तमानपत्रांची, बातम्यांची आणि पत्रकारांची गरजच नाहीये. तरीही आम्ही त्यांचं उपद्रवमूल्य लक्षात घेऊन स्पेशल कोटा तयार करून २४ पत्रकारांना स्वर्गात राहण्याची परवानगी देतो. त्या सगळ्या जागा आता फुल आहेत. त्यांच्यातल्या कोणा पत्रकाराने पुनर्जन्म घेतला किंवा नरकात बदली मागितली, तरच तुझी वर्णी लागू शकते.
पत्रकार म्हणाला, अरे, हे तर सोपं काम आहे. मला फक्त २४ तास दे. मी एकतरी जागा रिकामी करतो की नाही, बघ.
चित्रगुप्त हसला. स्वर्गसुख सोडून कोणी नरकात जायला तयार होईल, यावर त्याचा विश्वास नव्हता.
२४ तासांनी सगळेच्या सगळे २४ पत्रकार बदलीचे अर्ज घेऊन हजर झाले होते. चित्रगुप्त सटपटलाच. त्याने पत्रकाराला विचारलं, ही जादू तू कशी केलीस?
पत्रकार म्हणाला, मी त्यांना सांगितलं की नरकात नवा चॅनेल लाँच होतोय, नवे पेपर येतायत, त्यांच्यासाठी मोठ्या पॅकेजवर भरती चालू आहे आणि तुमच्यासारखे अनुभवी लोक इथे इतकं बोअरिंग आयुष्य कसं जगू शकतात? चला, कामाला लागूयात. आपल्या धर्माला जागूयात. ते निघाले सगळेच्या सगळे.
चित्रगुप्त म्हणाला, सॉलिडच आहेस. आता तुझ्यासाठी सगळ्याच जागा मोकळ्या झाल्यात.
पत्रकाराचा चेहरा बदलला. तो म्हणाला, मीही इथे राहणार नाही. मलाही नरकातच जायचंय.
चित्रगुप्त आता आणखी चकित झाला आणि म्हणाला, का रे?
पत्रकाराच्या नजरेत चमक आली, तो म्हणाला, अरे, मी सांगितलेल्या अफवेवर एवढ्या २४ लोकांचा विश्वास बसला. कोण जाणे अफवा खरी निघायची, बातमीच ठरायची. असा चान्स कोण सोडणार?