आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Th And 12 Th Failed Pearson Have High Education Chance

10-12 वी नापासांनाही उच्च शिक्षणाची सुसंधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शैक्षणिक आयुष्यात 12वीची परीक्षा फार महत्त्वाची आहे. त्याचे एक कारण म्हणजे काही नोक-या अजूनही 12वीच्या आधारावर मिळू शकतात. शिवाय पुढील व्यावसायिक शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बारावीचे प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरते. त्यातही गंमत अशी की नुसत्या या प्रमाणपत्राने तुम्हाला कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतच नाही. तुम्हाला पुन्हा प्रवेश परीक्षा ही द्यावी लागतेच आणि ब-याचदा प्रवेशासाठी जबरदस्त देणगीही उकळली जाते. यामुळे ‘शिक्षण सर्वांसाठी’ या संयुक्त रा ष्‍ट्रांच्या धोरणाचा आपल्या नेहमीच्या व्यवहारात प्रत्यक्ष अंगीकार करणा-या मुक्त विद्यापीठाने आपला ‘पूर्वतयारी’ हा शिक्षणक्रम गेली 23 वर्षे राबवला आहे. त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की उच्च ‘शिक्षण सर्वांसाठी’ उपलब्ध असावे किंवा एखादा विषय येत नाही म्हणून कुणाला आयुष्यभर प्रगतीची संधी नाकारली जाऊ नये. गणित, इंग्रजी या विषयांचा बाऊ न करता शिकायची इच्छा असलेल्या सर्वांना पुढील उच्च शिक्षण घेता यावे यासाठी मुक्त विद्यापीठ कार्यरत आहे.

गेल्या वर्षीचे उदाहरण घेतले तरी धक्कादायक आकडेवारी हाती येते. मार्च 2012 ला शालांत परीक्षेसाठी 13,43,602 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1,89,410 तर त्याही आधीच्या वर्षी नापास झालेले पुन:परीक्षार्थी होते. ह्या सर्व विद्यार्थ्यांपैकी 9,00,865 पास झाले. म्हणजे 4,42,737 विद्यार्थी मार्च 2012 ला नापास झाले. त्यांना निश्चितच निराशेने घेरले असले पाहिजे. कारण यापैकी ऑ क्टोबरच्या परीक्षेस केवळ 1,89,134 विद्यार्थीच बसले. पहिल्या अपयशाने निराश झालेल्या आणि पुन्हा प्रयत्न करणा-या या मुलांपैकी केवळ 32,831 विद्यार्थी या वेळी ऑ क्टोबरला पास झाले. म्हणजे पुन्हा 1,56,303 विद्यार्थी नापासच झाले. मागच्या दोनच परीक्षांचा विचार केला तर राज्यात 4,09,906 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी दोनदा परीक्षा देऊनही त्यांना यश मिळालेले नाही. त्यांच्याकरिता पारंपरिक शिक्षणपद्धतीत प्रगतीचा मार्ग कायमचा बंद झालेला आहे.

ऑक्टोबर 2012मधील या केवळ 19.03% टक्के उत्तीर्ण विद्यार्थ्यापैकी विज्ञान आणि वाणिज्य शाखेची परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. कारण त्यांचा निकाल केवळ 17.56% लागला आहे. म्हणजे असेही म्हणता येईल की गणित आणि इंग्रजी ह्या दोन विषयांनी नेहमीप्रमाणे मोठी कत्तल केली आहे.

केवळ इंग्रजी आणि गणित येत नाही म्हणून कुणाला कायमचे अपात्र ठरवणे न्याय्य नाही. मात्र अजिबात इंग्रजी न येताही प्रगती करणे अवघड जाईल म्हणून मुक्त विद्यापीठाने आपल्या पदवी पूर्वतयारी शिक्षणक्रमात इंग्रजीसाठी Learning through language हा त्या भाषेची प्राथमिक ओळख करून देणारा अभ्यासक्रम ठेवला आहे. गणिताचा परिचय करून देणारा ‘सर्वांसाठी गणित’ हा अभ्यासक्रमही या शिक्षणक्रमात समविष्ट केला आहे. याशिवाय मुक्त विद्यापीठातील शिक्षण ‘अध्ययन कौशल्य’ असे विषय असल्याने केवळ 12वीच काय अगदी 9 वी 10 वी नापास विद्यार्थीही ‘पूर्वतयारी’ शिक्षणक्रमास प्रवेश घेऊन आपला पदवीचा मार्ग खुला करून घेतात. या 6 महिन्यांच्या शिक्षणक्रमानंतर येत्या जून 2013 मध्ये विद्यार्थी सरळ पदवीच्या प्रथम वर्षास प्रवेश घेऊ शकतील. बी.ए.किंवा बी.कॉम या पदव्यांनाच केवळ प्रवेश मिळतील असे नाही तर पूर्वतयारीचा शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अनेक व्यावसायिक शिक्षणक्रमांना तसेच संगणकाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकेल. त्यामध्ये दीड वर्षाचा डिप्लोमा इन हार्डवेअर मेंटेनन्स अँड नेटवर्किंग टेक्नॉलॉजी, बी.ए. पत्रकारिता, बी.ए. पब्लिक सर्व्हिसेस, ब्यूटीपार्लर व्यवस्थापन, योगशिक्षक पदविका, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अँड बुटिक व्यवस्थापन, बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज, बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अँड कॅटरिंग सर्व्हिसेस, बी. एस्सी इन ग्राफिक्स अँड अ‍ॅनिमेशन अशा आकर्षक शिक्षणक्रमांनाही प्रवेश घेता येऊ शकेल. पूर्वतयारी शिक्षणक्रमाची फी केवळ 600 रुपये असून राज्यभर असंख्य अभ्यास केंद्रावर जानेवारीपासून या शिक्षणक्रमाचे प्रवेश सुरू झाले आहेत.

प्रमुख, संस्थात्मक संप्रेषण, मुक्त विद्यापीठ