आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Lakhs Books Sold In Sangamner Books Fair Within Three Days

संगमनेरच्या पुस्तक जत्रेत अवघ्या तीन दिवसांत 15 लाखांची ग्रंथविक्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तीन वर्षांपूर्वी संगमनेरमध्ये अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन झाले होते. संगमनेरच्या साहित्य इतिहासातील ते सुवर्णपान ठरले. त्यानंतर अलीकडेच झालेल्या ‘पुस्तक जत्रा’ या उपक्रमात अवघ्या तीन दिवसांत 15 लाखांहून अधिक किमतीची पुस्तके विकली गेली. हल्ली कोणी पुस्तके वाचत नाही हा समज या उपक्रमाने खोटा ठरवला.

अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे शाखाध्यक्ष व मालपाणी उद्योग समूहाचे डॉ. संजय मालपाणी यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम प्रथमच संगमनेरसारख्या ग्रामीण भागात पार पडला. मालपाणी परिवार तसा व्यवसायापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून काम करणारा म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात हा उपक्रम कितपत यशस्वी होईल याबाबत साशंकता होती. मात्र, ग्रामीण लोक आजही वाचतात हे दाखवून देतानाच येथील वाचक चळवळ समृद्ध असल्याचे प्रतिसादातून स्पष्ट झाले.

ग्रामीण भागात जत्रांना गर्दी लोटते. पुस्तक जत्रेलाही अशीच मोठी गर्दी झाली होती. डॉ. संजय मालपाणी यांनी कल्पकतेने प्रकाशन संस्था एकत्र आणून ही जत्रा भरवली. लहानांबरोबर मोठी माणसंही डोळ्यासमोर ठेवल्याने हा उपक्रम सर्वांसाठी पर्वणी ठरला. कवी अनंत फंदी यांच्यापासून संगमनेरला साहित्य परंपरा लाभली आहे. आजही येथील साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण टिकून आहे.

अफलातून प्रसिद्धी, विविध उपक्रमही
पुस्तक जत्रेच्या माध्यमातून संयोजकांनी शहराजवळच्या 25 शाळांशी संपर्क साधून पुस्तक जत्रेची माहिती देणारी पत्रके वितरीत केली. मोबाइल, ई-मेलच्या माध्यमातून प्रसिद्धी केली. पुस्तक प्रदर्शनासाठी मुले पालकांकडे हट्ट धरतील आणि त्यांच्याबरोबर पालकदेखील येतील हा दृष्टिकोन समोर ठेवत लहानांसाठी बालसाहित्याबरोबर मोठ्यासाठी दर्जेदार प्रकाशक, लेखकांची पुस्तके हे या उपक्रमाचे वैशिष्ठ ठरले. केवळ पुस्तके हाच पुस्तक जत्रेचा एकमेव उद्देश नव्हता. जत्रेदरम्यानच्या तीन दिवस संयोजकांनी विविध उपक्रमांचेही आयोजन केले. यात बालभवनाच्या मुलांचा ‘पपेट शो’, कुंदन जेधे याचे जादूचे प्रयोग, ‘पुस्तकाची जादू’, डॉ. संजय मालपाणी व रेखा मुंडदा यांचे कथाकथन, पडद्यावर मुलांना प्रश्न विचारून त्यांची उत्तरे जाणून घेण्याचा ‘ध्रुव’च्या प्राचार्य अलका वैद्य यांचा ‘कौन बनेगा वाचस्पती’, प्रकाश पारखे यांचा ‘पाठ्यपुस्तक कवितांचा ऑर्केस्ट्रा’, बालसाहित्यातील अजरामर पात्र फास्टर फेणे याचा आवाज काढण्याची प्रा. संजय दळवी यांनी घेतलेली स्पर्धा आणि त्यात ध्वनिमापक यंत्राचा झालेला वापर यामुळे दिवसभर थांबूनसुद्धा मुले कंटाळली नाहीत. याचा परिणाम दिवसभर स्टॉलवर होणारी गर्दी थांबवण्यासाठीही झाल्याने मोठ्या वाचकांना पुस्तकांची खरेदी व्यवस्थित करता आली.

30 शाळांतील मुलांची पुस्तक खरेदी
प्रख्यात लेखक वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, नाथ माधव यांच्यापासून आजच्या संदीप वासलेकर, अच्युत गोडबोले, चेतन भगत आदींसह तीन-चार पिढ्यांतील लेखकांना मोठा प्रतिसाद मिळाला. 14 ते 30 वर्षे वयोगटातील तरुण, तरुणी, गृहिणींचा मोठा प्रतिसाद या पुस्तक जत्रेला लाभला. बालसाहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. जवळपास तीस शाळांमधील विद्यार्थ्यांनी या पुस्तक जत्रेचा लाभ घेतला. शाळांसाठीही मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी झाली. मराठीतील बालसाहित्य या जत्रेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. अनुवादित व माहितीपर साहित्याकडेही वाचकांचा कल होता. विक्रेत्यांनी सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करुन दिली. ‘श्यामची आई’सारख्या गाजलेल्या पुस्तकाच्या काहींनी अनेक प्रती खरेदी केल्या.

राज्यातील वीस प्रकाशन संस्था सहभागी
मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातील वीस प्रकाशन संस्था या जत्रेत सहभागी झाल्या होत्या. वाचाल तर वाचाल, जीवनात मोठे होण्यासाठी कोणताच शॉर्टकट नाही, वाचल्यानेच माणसे मोठी होतात असा संदेश या पुस्तक जत्रेतून मिळाला. डॉ. मालपाणी यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय आरोटे, संतोष खेडलेकर, संदीप वाकचौरे, प्रकाश पारखे, प्रा. अरुण लेले, दत्ता भांदुर्गे, कुंदन जेधे, श्याम तिवारी, रेखा मुंडदा आदींनी पुस्तक जत्रा यशस्वी करण्यासाठी मदत केली. आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री बी. जे. खताळ, राज्याचे शिक्षण सहसंचालक दिनकर पाटील यांच्यासह मान्यवरांनी या जत्रेला भेट देत वाचन संस्कृती समृद्ध होत असल्याचा निर्वाळा दिला.

सत्कारालाही पुस्तकेच
पुस्तक जत्रेत विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती फुलवणारे कार्यक्रम झाले. त्यात मुलांना मंचावर येऊन म्हणणे मांडण्याची संधी मिळाली. संस्कृत, मराठी व इंग्रजींवरील कथाकथन व वक्तृत्व स्पर्धाही होत्या. हजारावर विद्यार्थी सहभागी झाले. त्यात विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तक खरेदीसाठी पुस्तक खरेदीचे कुपन बक्षीसरूपाने देण्यात आले. मान्यवरांचा सत्कार पुस्तके भेट देऊन झाला. स्पर्धांतील विजेत्यांनाही पुस्तके देण्यात आली.