आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4084 एक चांगला अनुभव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालीस चौ-यासी (4084) - नावापासूनच वेगळेपण दर्शवणारा हा चित्रपट खरोखरच वेगळा आणि मनोरंजक आहे. वेगळ्या प्रकृतीचे चार कलाकार घेऊन दिग्दर्शक हृदय शेट्टीने मनोरंजनाची एक चांगली भेळ बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो ब-यापैकी यशस्वीही झाला आहे. मात्र, मोठे कलाकार नसल्याने आणि चांगला प्रचार न झाल्याने प्रेक्षकांचा या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, माउथ पब्लिसिटीमुळे आणखी थोडे दिवस या चित्रपटाला जीवनदान अवश्य मिळाले. प्लेयर्सप्रमाणे दुस-याच आठवड्यात जास्त चित्रपटगृहांतून उतरण्याची पाळी या चित्रपटावर आली नाही.
केवळ एका रात्रीची कथा असलेल्या या रोमांचक चित्रपटात नसिरुद्दीन शाह (पंकज सुरी), अतुल कुलकर्णी (बॉबी), के. के. मेनन (पिंटो) आणि रवी किशन (शक्ती) हे चार मुख्य कलाकार असून प्रत्येकाने आपले काम उत्कृष्टरीत्या केलेले आहे. सगळ्यात जास्त कौतुक करावे लागेल ते अतुल कुलकर्णीचे. बॉबीच्या भूमिकेत त्याने कमाल केली आहे. आतापर्यंत त्याने साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका अत्यंत वेगळी असून त्याने याचे वेगळेपणही चांगलेच जपले आहे. के. के. मेननबरोबरची त्याची केमिस्ट्री चांगलीच जुळल्याचे दिसते. हे चौघे गुन्हेगार एकदाच मोठी चोरी करून आयुष्य सुखात घालवण्याचे ठरवतात. त्यामुळे बोगस नोटा बनवणा-यांकडून 20 कोटी रुपये लुटण्याची योजना ते आखतात. यासाठी ते खोटे पोलिस बनतात आणि पोलिसांची गाडीही चोरतात. गाडीचा नंबर 4084 असतो म्हणून चित्रपटाचे नाव 4084 ठेवले आहे. त्यानंतर त्यांच्या या मोहिमेत खरे पोलिस, गुन्हेगार येतात आणि जी गंमत, रंजकता निर्माण होते त्याचे चित्रण म्हणजे हा चित्रपट. चारही कलाकारांनी विनोदाचे टायमिंग उत्कृष्टरीत्या साधले आहे. नसिरुद्दीन शाह अशा वेगळ्या भूमिका खूपच एंजॉय करतात आणि ते या चित्रपटातूनही त्यांनी दाखवून दिले आहे. सुरुवातीला चित्रपट थोडा रेंगाळतो; परंतु नंतर चित्रपट पकड घेतो आणि आपण क्लायमॅक्सला कधी पोहोचतो तेच कळत नाही. मात्र, यश आणि विनय यांनी पटकथेवर आणखी काम केले असते तर चित्रपटातील ही उणीव आणखी काही प्रमाणात कमी करणे शक्य झाले असते. संवाद तेवढ्यापुरते मजा आणतात; परंतु ‘डर्टी पिक्चर’प्रमाणे ते लक्षात राहत नाहीत. ललित पंडित यांच्या संगीतात काही विशेष बाब नाही. मात्र, ‘हवा हवा’ गाणे देऊन त्यांनी हे गाणे पुन्हा लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्कृष्ट अभिनय आणि चांगले दिग्दर्शन यामुळे चित्रपट सुसह्य झाला आहे. एकदा हा चित्रपट पाहण्यास हरकत नाही, असेच सुचवावे वाटते.