आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबदबा असलेले 42 वर्षीय वाङ्मय मंडळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव महाविद्यालयाच्या स्थापनेपासून माजलगाव येथे मराठी वाङ्मय मंडळ सुरू आहे. जवळपास मागील 42 वर्षांपासून सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात या मंडळाचा वरचष्मा राहिला असून विद्यार्थ्यांकडून मराठी-साहित्य-भाषाविषयीचे संशोधन प्रकल्पही तयार करून घेण्यात आले. दरवर्षी मंडळाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिकांच्या हस्ते करण्यात येते.


1958 मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. मंडळाची धुरा माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांच्याकडे असताना. त्यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी 1971 मध्ये म. शि. प्र. मंडळाचे माजलगाव महाविद्यालयाच्या रूपाने एक रोपटे लावले. सुरुवातीला 200 विद्यार्थी असलेल्या या महाविद्यालयात आज चार हजार विद्यार्थी आहेत.


मराठीसह सांस्कृतिक मंडळही :
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून या ठिकाणचे मराठी वाङ्मय मंडळ सुरू आहे. आज जवळपास 42 वर्षे पूर्ण झाली असून, मंडळाची वाटचाल सुवर्ण महोत्सवाकडे सुरू आहे. कै. श्याम पाठक यांनी या मंडळाला नावारूपाला आणण्यासाठी मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नामुळे मराठी वाङ्मय मंडळाला जोडून सांस्कृतिक मंडळही स्थापन करण्यात आले.


मराठी भाषा, साहित्य, संस्कृती संवर्धन व विकास :
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती संवर्धन व विकास घडवण्यात पाठक सरांचे मोठे योगदान राहिले. पुढे साहित्याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात या मंडळाचा मोठा दबदबा निर्माण होत गेला. 1987 मध्ये माजलगावात मधुमंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली सहावे ग्रामीण साहित्य संमेलन झाले. त्यात महाविद्यालयाच्या मंडळाचा मोलाचा सहभाग होता. त्यानंतर डिसेंबर 2004 मध्ये माजलगावात माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली येथे 26 वे मराठवाडा साहित्य संमेलन याच महाविद्यालयात झाले असल्याने मंडळाला संमेलनात वाव मिळाला. ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी लाजरे-बुजरे असतात त्यांना बोलते-लिहिते करण्यासाठी मंडळाचा महत्त्वाचा वाटा राहिला. या शिवाय काव्यवाचन, कथाकथन, वादविवाद स्पर्धा हे उपक्रम महाविद्यालयात राबवले जातात तसेच समन्वय या वार्षिक अंकातून विद्यार्थ्यांच्या साहित्याला प्रसिद्धी मिळत असल्याने या उपक्रमातून रामप्रसाद तौर, प्रभाकर साळेगावकर, प्रदीप सोळंके, अनिल साळवे, श्रावण जाधव, पंचशीला डावकर, सुशील धसकटे अशा साहित्याच्या प्रांगणात राज्यभर गाजणारी पिढीच निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांकडून येथे संशोधन प्रकल्प तयार करून घेण्यात येत आहेत. शुक्लेश्वर तीर्थक्षेत्र, केसापुरी केशवराज मंदिर, मंजरथ येथील हेमाडपंती मंदिर अशा विषयावर मंडळाने विद्यार्थ्यांकडून संशोधनात्मक प्रकल्प तयार करून घेतले आहेत. विद्यार्थ्यांना साहित्यिकांची ओळख व्हावी त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून प्रत्येक वर्षी मंडळाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिकांच्या हस्ते ठेवण्यात येते. यातून विद्यार्थ्यांना आंनद मिळतो. आतापर्यंत कवी विठ्ठल वाघ, इंद्रजित भालेराव, भास्कर चंदनशिव,फ. मुं. शिंदे, सय्यद अल्लाउद्दीन, सूर्यकांत डोळसे, प्रभाकर साळेगावकर यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधित केलेले आहे.


शब्दांकन : दिलीप झगडे, माजलगाव