आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनवाणी पायांचा आवाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकाची असली तरीही उपरोधिक भावनेत परहिताची सद्भावना दडलेली असते. छद््मीपणाचं मात्र तसं नसतं. त्यात फक्त विखार आणि तिरस्कार असतो. मानसिक असुरक्षितता असेल, स्वत:चा अवास्तव मूल्यांकनातून आलेला अहंगंड असेल वा इतरांप्रति असलेली असंवेदनशीलता कष्टकरी शेतकरी-आदिवासींच्या ‘लाँग मार्च’कडे समाजातल्या एका सुखवस्तू वर्गाकडून असेच छद््मीपणे बघितले गेले. मोर्चेकऱ्यांच्या जखमी, रक्तबंबाळ पावलांची छायाचित्रं पाहत उद्दाम सवाल विचारले गेले. शंका रास्त असेल तर कोण विरोध करील, पण अनेक लोक अनुदार उद््गार काढेपर्यंत वाहवत गेले. पै पैचा हिशेब मागते झाले. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया ढवळून काढणारी छायाचित्रं टिपणाऱ्या पत्रकार अलका धुपकरांचं मनोगत आणि  कलेच्या अंगाने या छायाचित्रांचा घेतलेला हा वेध. आज साजऱ्या होणाऱ्या गुढी पाडव्याला आनंदाचे तुषार अंगावर घेताना संवेदनशीलतेची-सहवेदनेची गुढीसुद्धा प्रत्येकाने आपल्या मनांत उभारावी या अपेक्षेसह... 


दिवासी आणि शेतकरी निकराचा लढा म्हणून नाशिक ते मुंबई पायी चालत मोर्चा घेऊन येत होते. शेतकरी सात हजार आहेत की पंचवीस हजार यावरून आंदोलनाची खिल्ली उडवली जात होती. शेतकऱ्यांनी हाती ‘माकप’चे झेंडे घेतले होते आणि डोक्यावर लाल रंगाच्या टोप्या त्यांनी घातल्या होत्या. त्यावरून ते ‘पेड आंदोलक’ असल्याच्या पोस्ट्स सोशल मीडियावरून पसरवल्या जात होत्या...


 २०११ मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यांतील हजारो आदिवासी वन जमीन हक्कांच्या प्रश्नांसाठी मुंबईत असाच पायी मोर्चा घेऊन आले होते. त्यांचं अस्तित्वही मान्य न करता खिल्ली उडवण्याचा चावटपणा एकीकडे होता, दुसरीकडे होती रखरखीत वस्तुस्थिती. १८० किलोमीटर पायी चालत निघालेले, हे आदिवासी ना ब्रॅण्डेड चप्पल, शूज, साॅक्स घालून आले होते, ना त्यांच्याकडे ग्लुकाॅनडी सारखी किंवा प्रोटिनयुक्त काही पेयं होती. ३२-३४ सेल्सियस डिग्रीच्या उन्हात डांबरी रस्त्यावरून निश्चयाने, शांततेत आणि शिस्तीत चाललेली, ही पावलं खरंतर खूप ताकदीची होती. कर्जत घाटातील माेर्चाचा व्हिडिओ मी पाहिला होता. पण भिवंडीमध्ये सकाळी आठ वाजता मोर्चा कव्हर करायला गेल्यावर एक प्रसंग घडला. पाचव्या सहाव्या रांगेत चालणाऱ्या राधा मोरे या महिलेच्या पायात रस्त्याच्या कडेला अपघातानंतर पडलेल्या काचेचा तुकडा घुसला. माेर्चेकऱ्यांनी लाऊडस्पीकरवरून घोषणा करून सगळ्यांना थांबवलं. तिच्या पावलातून रक्त येत होतं. पण ती महिला दोन मिनिटं स्तब्ध उभी राहिली. कुणीतरी कपड्याची एक पट्टी काढली, बांधायला, पण त्याला माती लागलेली होती. मग कुणीतरी स्वच्छ रूमाल बांधला. ती महिला चप्पल पायात सरकवून चालायला लागली. अॅम्ब्युलन्स किंवा कारमध्ये ती बसली नाही. मी तिला विचारलं, का चालताय तुम्ही एवढं लागलंय तर... त्यावर ती म्हणाली, की आमच्या पुढच्या पिढीला असं चालावं लागू नये म्हणून...!
 
 
मी त्या संपूर्ण मोर्चामध्ये किमान तीन ते चार वेळा मागे-पुढे-मध्ये अशी चालले. मागचे थकलेले मोर्चेकरी एकमेकांना कशी साथ देत चालतात. हे बघायचं होतं. माझ्या समोरच्या दोन महिलांकडे लक्ष गेलं. एक बाई दुसरीला तिचं एक चप्पल देत होती. आता तिच्या पायात एकच चप्पल होती. दुसरा पाय अनवाणी. तिची चप्पल चालता चालता तुटली. ती थांबली नाही, की तिला थांबावसं वाटलं नाही. त्यांच्याकडे वेळच नव्हता. निश्चय दृढ होता. दुसऱ्या महिलेने रस्त्याच्या कडेला पडलेली, एक तार लावून तुटलेली चप्पल जोडायचा प्रयत्न केला, तेही चालता चालता. तिसरी आज्जी अनवाणीच चालत होती. तिच्या बोटांना आणि पायांना फोड झाल्याचं दिसत होतं. मी तिला विचारलं, चप्पल का घालत नाहीस, ती म्हणाली पायाला फोड आलेयत आणि पाय सुजलेत. चप्पल घालून चालायचा वेग कमी होतो. चौथी आज्जी... तिची चप्पल तुटली होती, ते तिने सुतळीने पावलात बांधली होती... माझ्यासाठी ही सगळी पावलं, हे आंदोलकांचे पाय बिनचेहऱ्याचे पाय नव्हते. टाचेवरची एकेक भेग कष्टाची कहाणी सांगणारी होती.


२०११ मध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने आणि अाता ‘अच्छे दिन’ची ग्वाही देणाऱ्या भाजप सरकारने वर्षानुवर्षे नाडलेल्या आदिवासींच्या आयुष्याचा लढा, त्या रक्ताळलेल्या-भेगाळलेल्या पायांमध्ये मला दिसला होता.


करियरमधला माइलस्टोन किंवा मला वाहवा मिळावी म्हणून मी हा मोर्चा कव्हर केला नाही, की त्यासाठी या माय-माऊलींच्या पायांचे फोटो मी काढले नाहीत. पत्रकार म्हणून मोर्चात कोणंती पावलं चालतं आहेत, हे बाहेरच्या जगाला सांगणं, मला माझं कर्तव्य वाटतं. सात वर्ष इलेक्ट्रॉनिक माध्यमात मी काम केलंय. त्याआधी फोटोग्राफीचा कोर्स केलाय. स्वत: कष्टाची शेतीकामं केलेली आहेत. एकदाच पण हाफ मॅरेथाॅन धावलेय आणि अनेकदा पावलं दुखेपर्यंत पायपीट सुद्धा केलीय. आदिवासी-शेतकऱ्यांच्या तुलनेत सुखी आयुष्य जगणारी मी, माझ्या पायांची वेदना, किती दिवस कुरवाळते... वेदनेचा हा व्यक्तिगत अनुभव... आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचं केलेलं आतापर्यंतचं कव्हरेज ही माझी अनुभवाची शिदोरी आहे.


सभोवलातलं बटबटीत बेसूर शब्दबंबाळ वातावरण. या कल्लोळात त्या अनवाणी पायांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत घुमत होता. म्हणूनच शहरातील ट्रॅफिकपासून ते मोर्चेकऱ्यांच्या संख्येपर्यंत कव्हरेजची दिशा बदलण्याचे प्रयत्न होत होते. ती ताकदवान पावलं चाल करून नव्हती येत, ती हक्क मागायला येत होती. पिढान््पिढ्यांचे हिशेब मागत हाेती. बळीराजाच्या डोक्यावर वामनाने पाय ठेवल्याच्या पौराणिक (भाकड) कथांचा वचपा काढणारी, ही पावलं आहेत, एवढंच मला पत्रकार म्हणून सांगायचं होतं...


- अलका धुपकर,

असिस्टंट एडिटर, मुंबई मिरर (टाईम्स आॅफ इंडिया ग्रुप) 
alaka.dhupkar@gmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...