आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त \'मराठी\' प्रौढांसाठी !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 ‘श्वास’च्या यशानंतर आशय-विषयाच्या अंगाने प्रयोगशीलता जपणारा मराठी सिनेमा मनोरंजनाच्या चौकटीत लैंगिकतेचं दर्शन-प्रदर्शन करण्यात कायमच सोवळेपण जपत आला. मात्र नुकत्याच प्रदर्शित ‘शिकारी’ नावाच्या सिनेमाने हा सोवळेपणा झटकल्याचे दिसत आहे. मात्र, प्रश्न हा आहे की, मराठी प्रेक्षक आपल्याच भाषेत ‘बोल्ड’ दृश्ये पचवण्याइतका पुरेसा ‘प्रौढ’ झालाय का?


तीन आठवड्यांपूर्वी  मराठी मनोरंजन विश्वात खळबळ माजवणारी एक घटना घडली. दिग्दर्शक विजू माने यांच्या ‘शिकारी’ सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आणि एकच मतमतांतराचा गलबला उडाला. ट्रेलरमध्ये  मराठी सिनेमामध्ये कधी न आढळणारं अंगप्रदर्शन, बोल्ड दृश्य, बिनधास्त डॉयलॉग या गोष्टी असल्याने या ट्रेलरची चर्चा होणार होती, तशी ती झालीच. मात्र, माझ्या बघण्यातल्या अनेकांच्या प्रतिक्रिया, "शी! काय हे.’, ‘मराठी सिनेमांची सुद्धा भोजपुरी सिनेमा होण्याकडे वाटचाल सुरु झालीय,' ‘या लोकांनी असले प्रयत्न करण्यापूर्वी हॉलिवूड सिनेमाकडून काही शिकायला पाहिजे’ अशा प्रकारच्या होत्या. नर आणि मादीचं शारीरिकदृष्ट्या जवळ येणं, हे पडद्यावर दाखवणं म्हणजे काही तरी वाईट आहे असा प्रेक्षकांमधल्या एका वर्गाचा समज आहे, हे समजू शकतो. पण अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमे बघणाऱ्या आणि वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हलचं एक्स्पोजर असणाऱ्या मराठी सिनेमा इंडस्ट्रीमधल्या निर्माता दिग्दर्शकांचं पण असंच मत असावं, हे आश्चर्यकारक आणि न पटण्यासारखं होतं.  अर्थात, सिनेमाच्या ट्रेलरला तब्बल अठरा लाखाहून अधिक हिट्स मिळाल्या.  एक समाज म्हणून दांभिकता या निमित्ताने नव्याने उघड झाली. 


असो.या उत्साही हिट्सचा मी काढलेला अन्वयार्थ असा की, अभिजन वर्ग वरवर का होईना, ट्रेलरला नाक मुरडत असला तरी परवाच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या त्या सिनेमाबद्दल ‘मासेस’ला प्रचंड उत्सुकता  आहे. माझं हे मत अनेकांना आश्चर्यकारक वाटेल किंवा आवडणार नाही, पण माझं मत ट्रेलरबद्दल वा प्रत्यक्ष सिनेमाबद्दलही वेगळ्या अर्थाने का होईना थोडं सकारात्मकच आहे. आता हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत काही क्रांती करणार आहे किंवा पुढचा ‘श्वास’ ठरणार आहे, असला गैरसमज या सिनेमाच्या निर्माता-दिग्दर्शकांनाही नसेल. पण मराठी सिनेमाने दशकानुदशके जपलेल्या ‘सोवळेपणातून' बाहेर पडण्याचं धारिष्ट्य ‘शिकारी’ हा सिनेमा दाखवेल, असं तरी खात्रीने मला वाटत आहे.


मराठी मनोरंजन विश्वातल्या बोल्डनेसची व्याख्या मिनाक्षी शिरोडकरांचं ‘यमुनाजळी खेळ खेळू कन्हैय्या', ‘पिंजरा'मध्ये दिसणारी संध्याबाईंची मांडी आणि ‘तप्तपदी’ सारख्या सिनेमातली काही दृश्य याच्यापलीकडे कधी गेलीच नाही, याचं मला कायमच सखेद आश्चर्य वाटत आलंय. दादा कोंडके यांच्या सिनेमात द्व्यर्थी संवाद असायचे, पण नायक-नायिकेचं पडद्यावर शारीरिकदृष्ट्या जवळ येणं वा त्याचं प्रत्यक्ष सूचन त्यांच्या सिनेमात नसायचं. शारीरिक जवळीक दाखवणारी दृश्य आंबटशौकीन प्रेक्षकांसाठीच्या सिनेमातच असावीत, असा काही नियम नाही. अनेकदा कथानकाची गरज म्हणून पण बोल्ड दृश्य सिनेमात असू शकतात. पण मराठी सिनेमा कायमच या शक्यतांपासून दूर का राहिला?


एकूणच मराठी सिनेमाचा आणि जडणघडणीचा जो काळ होता (साठ आणि सत्तरचं दशक) त्यावर मराठीमधल्या मध्यमवर्गीय अभिजन वर्गाचा ठसा आहे. हा वर्ग शिकलेला होता, गाजलेल्या आंतरराष्ट्रीय कलाकृतींशी त्याचा संपर्क येत होता, तरी सेक्सविषयक अभिव्यक्तींबाबत किंवा रांगड्या सांस्कृतिक अभिव्यक्तीबद्दल या अभिजन वर्गाच्या मनात अढी होती. म्हणूनही कदाचित या वर्गाने तयार केलेले कलेच्या अभिव्यक्तीच्या सोवळेपणाचे नियम पुढच्या पिढ्यांनी तोडण्याची बंडखोरी दाखवली नाही. मराठी साहित्यामध्ये भाषेच्या अंगाने प्रक्षोभक ‘राडा’ कादंबरी लिहिणारे भाऊ पाध्ये, भालचंद्र नेमाडे (ते स्वतःच नंतर प्रस्थापित झाले), नामदेव ढसाळ यांच्या रूपाने जी नियमांचे साचे मोडणारी जहाल बंडखोरीची परंपरा होती, ती मराठी चित्रपटांमध्ये कधी आलीच नाही. 

अर्थातच, काही सन्माननीय अपवाद आहेत. परंतु मराठी सिनेमा कायमच एका ट्रेंडला (तमाशापट, सचिन-महेश कोठारेंचे विनोदीपट, सध्याचे काही स्मरण रंजन करणारे चित्रपट) कवटाळून बसण्यात धन्यता मानत गेला. ‘श्वास’च्या यशानंतरच मुख्यत: अनेक तरुण दिग्दर्शक वेगवेगळ्या विषयांची हाताळणी करू लागले. पण दोन पात्रांमधले  शारीरिक संबंध पडद्यावर दाखवणे या बाबतीतला ‘टॅबू’ मात्र कायमच राहिला.  राजीव पाटीलचा ‘जोगवा’ आणि निखिल महाजनचा ‘पुणे -52’ हे काही प्रमाणात त्याला सन्माननीय अपवाद. इतर वेळी मुंबईतच कार्यरत असणाऱ्या आणि बोल्डनेसच्या बाबतीत उत्तरोत्तर धाडसी होत गेलेल्या बॉलिवूडशी  स्पर्धा करण्यापेक्षा, आपण आपलं सोवळेपणातलं वेगळेपण जपावं असं मराठी दिग्दर्शकांना वाटायचं, ते प्रत्यक्षातही यायचं.


या संदर्भात मराठी प्रेक्षकांचीही मानसिकता पडताळून बघणं, ही एक रोचक गोष्ट ठरावी.बॉलिवूड चित्रपटांमधली चुंबनदृश्य, हॉलिवूड सिनेमातली बोल्ड दृश्य मोठ्या पडद्यावर चवीने बघणारा मराठी प्रेक्षक मराठी सिनेमांमध्ये असं काही दिसलं की, अस्वस्थ व्हायला लागतो. ‘कसं होईल आपल्या महान मराठी संस्कृतीचं?’ या छापाची कुजबूज करायला लागतो. मराठी नायिकांच्या अंगप्रदर्शनाच्या बाबतीत तर तो कमालीचा ‘संवेदनशील’ असतो. याबाबतीत एक प्रसंग आठवतो. मध्यंतरी एका सिनेमामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरने बिकिनी घातली होती. तेव्हा वर्तमानपत्रामध्ये आलेल्या यासंबंधीत बातमीच्या कॉमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देणाऱ्यांची गर्दी उसळली होती. त्यातल्या बऱ्याचशा कॉमेंट्स असभ्य शिवीगाळ करणाऱ्या होत्या. आणि काही सभ्य भाषेत का होईना, पण टीका करणाऱ्या होत्या. त्या सगळ्या कॉमेंट्सचा गाळीव अर्क असा होता की, एक मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली असूनही सई असे कपडे घालूच कशी शकते? रात्र रात्र जागवून दाक्षिणात्य आणि भोजपुरी नायिकांची ‘मिडनाईट मसाला’मधली उत्तेजक गाणी बघणारा मराठी प्रेक्षक आपल्या समभाषिक नायिकेबद्दल इतका हळवा असतो, हे बरचसं रोचक आणि थोडं विनोदीसुद्धा आहे. 


कारण, या विचारसरणीत बराचसा पुरुषी वर्चस्ववादी मानसिकतेचा वाटा आहे. स्वतःच्या बहिणीला घरात डांबून ठेवून, तिने काय घालावे आणि काय घालू नये, याची कडक नियमावली बनवून अनेकजण नाक्यावर इतरांच्या बहिणींकडे बघून शिट्ट्या वाजवायला आणि त्यांची छेडछाड करायला मोकळे होतात. हा त्यासारखाच प्रकार आहे. याचा एकच अर्थ आहे - र .धों .कर्वेंच्या महाराष्ट्रात हा पुरुषी दांभिकपणा अजूनही चांगलाच मूळ धरून आहे.


याबाबतीत मराठी सिनेमांपेक्षा बंगाली, भोजपुरी, दाक्षिणात्य चित्रपट जरा तरी वेगळे आहेत. बंगाली सिनेमातली बोल्ड दृश्य अतिशय हळूवारपणे आणि जबाबदारीने चित्रित केलेली असतात. बंगाल आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये अनेक ऐतिहासिक सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक साम्यस्थळं आहेत, असं म्हणण्याची एक फॅशन आहे. पण बंगाली भद्र जन पडद्यावरच्या बोल्ड आविष्कारांना नाक न मुरडता त्यांच्याकडे कलात्मक दृष्टीने बघू शकतो. काही अपवाद वगळता मराठी अभिजन वर्ग अजूनही या सगळ्यांकडे तुच्छतेने बघतो, हा फरक जाणवण्यासारखा आहे. भोजपुरी सिनेमांमधली उत्तेजित करणारी गाणी ही पिटातल्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेली असतात. द्वयर्थी शब्दरचना, भडक वस्त्र परिधान केलेल्या नायिका, अश्लील डान्स स्टेप्स ही या गाण्यांची व्यवच्छेदक लक्षणं आहेत. दाक्षिणात्य सिनेमांची वेगळीच तऱ्हा आहे. दाक्षिणात्य सिनेमांमधला बोल्ड गाण्यांमधला भडकपणा हा पण प्रेक्षकानुनयी असला तरी वेगळा आहे. त्याला दाक्षिणात्य पुरुषी मनोवृत्तीचे अस्तर आहे. दक्षिणेतल्या अनेक आघाडीच्या नायिका, या उत्तर भारतीय किंवा पंजाबी आहेत. काळासावळा राकट दाक्षिणात्य नायक जेव्हा पडद्यावर गोऱ्या वर्णाच्या उत्तर भारतीय नायिकेला पटवतो आणि गाण्यांमध्ये तिच्यासोबत पुरुष प्रेक्षकांच्या फॅन्टसी चेतवणारं जे जे करतो, ते बघून उत्तर भारतीय लोकांबद्दल सुप्त अढी मनात बाळगून असणारा दाक्षिणात्य प्रेक्षक एकदम सुखावतो. 


मध्यंतरी नायिकेच्या नाभीबद्दल दाक्षिणात्य निर्माता-दिग्दर्शक-प्रेक्षक यांना इतकं ऑब्सेशन का आहे, याबद्दल बऱ्याच चर्चा झडल्या होत्या. भोजपुरी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नायिकेचं किंवा एकूणच स्त्रियांचं अपरिहार्य ‘वस्तूकरण’ होतं, हे ही खरं आहे. ‘शिकारी’च्या ट्रेलरमध्येसुद्धा ही बाब खटकतेच. यात असामी, ओरिया फिल्म इंडस्ट्री  याबाबतीत मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या पुढे आहेत, हेही आपल्या ध्यानात येतं. 


आपण एक भाषिक फिल्म इंडस्ट्री म्हणून दाक्षिणात्य किंवा भोजपुरी सिनेमांचं आंधळं अनुकरण करण्याची अर्थातच गरज नाहीये. स्त्रीचं वस्तूकरण होऊ देणं, हे आजच्या बलात्काराच्या आणि क्रौर्याच्या असुरक्षित युगात जितकं टाळू तितकं आवश्यक आहे. मुळात बोल्ड दृश्य आणि गाणी केवळ प्रेक्षकांना चेतवण्यासाठी न येता ती कथानकाची गरज म्हणून यायला हवीत. मराठी निर्माता-दिग्दर्शक-लेखक यांनी याच्यापासून दूर पळण्याची मुळीच गरज नाहीये. प्रेक्षकांनी पण फक्त मराठी चित्रपटांबद्दल असणारी ‘संस्कारी’ भावना बदलण्याची नितांत गरज आहे. सुदैवाने मराठीमध्ये नागराज मंजुळे, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर यांच्यासारखी अशा दृश्याचं अतिशय नजाकतीने, त्यात कुठलीही अश्लीलता येऊ न देता चित्रण करू शकणारी 


दिग्दर्शकांची फळी आहे. रवी जाधवचा अतिशय वेगळ्या संवेदनशील विषयाचं चित्रण असणारा ‘न्यूड’ हा मराठीमध्ये अनेक चांगले ट्रेंड सुरु करण्याची शक्यता बाळगून आहे. पण आतातरी ‘शिकारी’ ने धाडसाने एक  ट्रेंड सुरु करण्याची धमक दाखवली आहे, हे मान्यच करावे लागेल. आपण हा ट्रेंड स्त्रीच वस्तूकरण न होऊ देता कलात्मक दृष्टीने पुढे कसा नेऊ हे बघणं महत्वाचं ठरेल. पण तूर्तास  महाराष्ट्राचे लोकनेते शरद पवारांच्याच भाषेत सांगायचं झालं, तर भाकरी फिरवण्याची प्रक्रिया जरी ‘शिकारी’च्या निमित्ताने झाली, तरी खूप आहे. Lets give devil his due...


amoludgirkar@gmail.com
लेखकाचा संपर्क : ७४४८०२६९४८

बातम्या आणखी आहेत...