आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निखळ वनमानव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झपाटून टाकणे या क्रियेचा अर्थ समजावून घ्यायचा असेल, तर ब्लादिमीर अर्सेनिव्हलिखित आणि जयंत कुलकर्णी अनुवादित‘देरसू उझाला’ कादंबरीस पर्याय नाही. हा देरसू निसर्गाशी एकरूप झालेला आहे. निसर्गासारखाच निखळ आणि निर्मळ आहे...

 

साधारणतः एकोणीशे ऐंशीच्या दरम्यान अमृत गांगर या सिनेमा समीक्षकाच्या पुढाकाराने मुंबईत "स्क्रीन युनिट’ या नावे सिनेमा मंडळ कार्यरत होते. वार्षिक वर्गणी पाचशे रुपयांत महिन्याला दोन अथवा तीन प्रादेशिक आणि जागतिक सिनेमा बघायला मिळत. सभासदांची संख्याही 
तीनशे -साडेतीनशे अशी मर्यादित होती. अमोल पालेकरांच्या पुढाकाराने असेच दुसरे "प्रभात सिनेमा मंडळ’ पुण्यात प्रसिद्ध होतेच.

 
मोबाइलमधील यूट्यूब आणि विकिपीडियावर एकट्याने काहीसे खासगी पातळीवर ज्ञान मिळवण्याची वा मनोरंजन करण्याची आणि पर्यायाने माणसाला समाजविमुख बनवण्याची उत्तराधुनिक आत्मकेंद्री  पद्धत त्या काळात फारशी प्रचलित नव्हती. गरम हवा, मेघे ढाके तारा, घटश्राद्ध,  पाथेर पांचाली, अपराजितो, चोमान्ना डुडी, शंकर या बंगाली लेखकाच्या कादंबरीवरील "जनअरण्य', राजस्थानी विजयसिंह देठांच्या कथेवरील दुविधा, गजानन माधव मुक्तिबोधांच्या कथेवरील केतन मेहतांचा ‘सतह से उठता आदमी’, उत्पल दत्तांची अजोड भूमिका असलेला भूवनशोम, ऋत्विक घटकांचा ‘अजांत्रिक’, गुरुदत्तांचा ‘प्यास’, कागज के फुल यांसारखे भारतीय सिनेमा जसे आम्ही पाहिलेत, तसेच बायसिकल थीव्हज, व्हर्जिन स्प्रिंग, दी ग्रेट डिक्टेटर, दी कीड, मॉडर्न टाइम, दी ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय, फेअरवेल्स टू आर्म्स, ग्रेप्स ऑफ द राथ यांसारखे जगभरात गाजलेले अभिजात युरोपियन सिनेमासुद्धा पाहिलेत.


याच काळात पेडर रोडच्या सोव्हिएत कल्चर हाऊसमधे आम्ही एकोणीसशे पंचाहत्तरला प्रदर्शित झालेला अन् थोड्याच अवधीत ‘सोव्हिएतसह संपूर्ण जगात गाजलेला सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमा’ म्हणून ऑस्करने सन्मानित केलेला अकिरा कुरोसोवा यांचा ‘देरसू उझाला’  पाहिला. तेव्हापासून आजपर्यंत ‘देरसू उझाला’ या आदिम मानवीय व्यक्तिमत्त्वाने मी संमोहित झालेलो आहे. व्यासांनी आपल्या प्रतिभेच्या कुंचल्याने शतक दरशतकांच्या प्रदीर्घ प्रवासातून अनेक पात्रे आपल्यापर्यंत पोहोचवली. पण कर्ण-कृष्ण-भीष्माच्या व्यक्तिमत्त्वाने मोहित होत असताना प्रसंगी व्यासांना विसरून जातो, तसाच मी ‘देरसू उझाला’चा प्रत्यक्ष रचेता कोण हे आजवर विसरून गेलो होतो.


दरम्यान, ‘सिमेंट काँक्रीटच्या जंगलात निर्माण होत नाहीत देरसू उझाला, तिथे अलौकिक म्हणून आपल्याच व्यक्तिमत्त्वाचा कसा वेगळा ठसा उमटवावा...’


अशा ओळीत, माझ्या कवितेच्या अनुबंधात मी ‘देरसू उझाला’ला बांधून ठेवलेलाच होता. पृथ्वीच्या या अफाट विस्तृत पटलावर अाधुनिक माणसाची पावलं जिथे उमटलेली नाहीत, अशा एकाद्या निबिड अरण्यात, सर्वदूर असीम बर्फाळ आसमंतात, अथवा नजर जिथपर्यंत पोहोचते अन् त्यापलीकडे जिथून सुरू होतं, भ्रमांचं मृगजळ त्या वैराण वाळवंटातही कोणी राहत असेल का?’ आहे त्या परिस्थितीला जुळवून घेत, संवाद साधत, प्राप्त साधन सामग्रीचा गरजेइतकाच वापरत करत, प्रत्येक सजीवाला "माणसाची’ उपाधी देत एकादा खराखुरा देरसू उझाला असेल का? असाच मला आजवर प्रश्न पडलेला होता. जो कुणा सार्जंट सैनिक सर्व्हेयर वा तुमच्या- माझ्यासारखा संवेदनशील माणसाला कवी- लेखकाला भेटला असेल, याचा विचारच मी नव्हता केलेला.


परवा,अचानक माझे मित्रसंग्राहक स्नेही कृष्णा किंबहुने यांनी राजहंस प्रकाशनाचे मूळ रशियन लेखक व्लादिमीर अर्सेनिव्हलिखित आणि पुण्यातील जयंत कुलकर्णी  अनुवादित  साक्षात ‘देरसू उझाला’ हे पुस्तक पाठवले. पुढचे दोन दिवस झपाटून टाकणारे हे पुस्तक मी  वाचून काढले. त्यानंतर यूट्यूबवर अकिरा कुरोसोवांचा ‘देरसू उझाला’ हा दोन भागांतील सिनेमाही पाहिला. लक्षात आले, कुरोसोवांचा हा भव्य सिनेमा मूळ लेखकाच्या पुस्तकाचा केवळ ट्रेलर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे हे प्रगाढ व्यक्तिमत्त्व समजावून घेण्यासाठी ‘देरसू उझाला’ हे पुस्तक वाचणेच अनिवार्य आहे.


‘देरसू उझाला’चे लेखक व्लादिमीर अर्सेनिव्ह रूढार्थाने कथा- कादंबरी लिहिणारे नाहीत, तर क्रांतिपूर्व रशियन सैन्यातील ते एक सर्व्हेयर आहेत. रशिया आणि चीनच्या सरहद्दीवर युसोरी नदीच्या प्रदेशातील नकाशे तयार करण्याच्या माहिमेवर निघालेले. प्रत्यक्ष जागेवर जाऊन नकाशे तयार करणे, हे त्यांचे काम. युसोरी या महान नदीचा हा सगळा प्रदेश निबिड, सूचिपर्णी अरण्याचा, गोठवणाऱ्या थंडीचा, बर्फाळ वादळांचा तसाच वारंवार पात्र बदलणाऱ्या अमूर आणि उसुरी नदीमुळे तयार झालेल्या दलदलयुक्त पाणलोट क्षेत्राचाही. 


या  प्रदेशात त्यांच्यासोबत एक सैनिकांची तुकडी आहे. त्याच्या कामाचे स्वरूप जसे प्रदेशाचे नकाशे बनवणे आहे तसेच प्राणी, वनस्पती, पक्षी, आणि यासोबत मानवसमूहाचा अभ्यास करणेहेसुद्धा आहेच. देरसू उझालाच्या स्वतंत्र सैनिकांच्या तुकडीसह एका अनोळख्या मानवी वस्तीच्या विरळ टापूत वावरताना मला या लेखकाचा माणूस, निसर्ग अन् वन्यजीवन यांच्याकडे बघण्याचा समग्र मानवीय दृष्टिकोन प्रचंड भावला. त्यामुळेच देरसूसारख्या रूढार्थाने ‘वनमाणसा’सोबत त्याला अकृत्रिम मैत्रीचे संबध प्रस्थापित करता आले. एका अर्थाने माणसाने निसर्गासोबत कसे संवादी होऊन जगले पाहिजे याचा परिपाठ आहे हे पुस्तक आहे.


गोष्टीचा गोषवारा साधारणतः असा : सैबेरियन जगप्रसिद्ध ‘तैगा’च्या जंगलात फिरत असताना  निबिड अरण्यातील रात्रीच्या नीरव शांततेच्या वेळी सैनिकांच्या वस्तीवर देरसू एकाद्या श्वापदासारखा अवतरतो. रायफलचा घोडा रोखलेल्या एका सैनिकाशी तो तुटपुंज्या भाषेत म्हणतो, ‘बंदूक नको, मी माणूस.’ एका अस्तंगत होणाऱ्या गोल्डी या आदिवासी जमातीचा तो, ज्याच्या चेहऱ्याची अन् शरीराची ठेवण मंगोलियन आहे, वाक्यात तो कर्माला क्रियापदात अंर्तभूत करतो. हा तैगाचा आदिमानव आणि अर्सेनिव्ह यांची प्रगाढ मैत्री होत जाते.


सर्वग्रासी एका महामारीत त्याची बायको, मुलगा, मुलगी सगळे मरून गेल्याने तो एकटाच केवळ शिकारीवर गुजारण करणारा जंगलातल्या ‘अंबा’ वाघासारखा, अरण्याचा फिरस्ता बनतो. निसर्गासोबत तो बोलतो. भूतकाळाला तो सांप्रत जगण्याशी जोडून घेतो. जगणं, हेच त्याचे अंतिम ध्येय. प्रत्येक सजीवाला तो "मानवाची’ संज्ञा देतो. तो म्हणतो, या सर्वदूर पसरलेल्या तैगाच्या अरण्यालासुद्धा एक जीव आहे. कारणाशिवाय तो कुठल्याही प्राण्याची हकनाक शिकार करत नाही. उर्वरित राहिलेले खाद्य दुसऱ्या सजीवाचे अन्न आहे, याची त्याला उपजत जाणीव आहे. रात्री निवाऱ्याला थांबलेल्या जंगलातल्या झोपडीत, भविष्यात भरकटलेला कोण मुसाफिर चुकून जर आलाच, त्याच्यासाठी पसाभर तांदूळ, मीठ, अन् अडचणीला सरपणाची सोय करून ठेवतो. त्याच्या मते, प्रत्येक नैसर्गिक वस्तूला आत्मा असतो. त्यामुळे प्रत्येक सजीव वस्तूत त्याला माणूस दिसतो. सजीव वस्तूंमधे तो पंचमहाभूतांनीही सामील करतो. 


लिहिताना मला जाणवले, "सुंबरान मांडलं’ या माझ्या दीर्घ कवितेला देरसू मला दिसतोय.ज्याला संपूर्ण अरण्य कळते, अर्सेनिव्ह त्याला ‘जंगलाचा यक्ष’ समजतो.
युसोरीच्या तीन मोहिमांत देरसूने अर्सेनिव्हला तीन वेळा मृत्यूच्या दारातून वाचवले. त्यातील पहिला प्रसंगच, मी सांगतोय. एकदा हे दोघं जवळच्या एका तलावाची पाहणी करून रात्री मुक्कामाच्या तळावर येणार असतात. सोबतीला रात्रीच्या निवाऱ्याचे सामानही अर्सेनिव्ह घेत नाही. देरसू मात्र निघाल्यापासून बेचैन असतो. म्हणतोही तो, मला काळजी वाटतेय, मागं फिरूयात. पण दुरून तर दिसत असतो, तलाव अन्् अचानक रक्त गोठवून टाकणारे बर्फाळ वादळ. त्या झंझावातात हे रस्ता चुकतात. सर्वदूर पसरलेल्या उंच गवतांशिवाय काहीच नाही. देरसू ऑर्डर सोडतो, कपितान, गवत काप, एकत्र जमा कर. मधेच चाकू पडतो. म्हणतो, हाताने उपट. बाजूच्या उंच गवताची पेढ्यात पेढी अशी हा वेणी घालतो. अन् गवताखाली अर्सेनिव्हला बसवतो. भुरभुरणाऱ्या बर्फाचे थर चढत असताना देरसू अर्सेनिव्हजवळ सरकतो. रात्रभर बर्फ अन् गवताच्या आत ऊब. सकाळी हा लवकर उठून, अर्सेनिव्हला म्हणतो, ‘कसा, बाहेर पड सकाळ झालीय, अस्वल्या...’


हा  निष्णात नेमबाज. कोणताही बार त्याचा वाया जाणार नाही. पण वयाने नजर अधू होते अन्् निसर्गात शिकारीशिवाय जगायचं कसं, म्हणून दयनीय होतो. अपार प्रेम अन्् देरसूच्या संभाव्य काळजीने तो त्याला शहरात नेतो. शहरात  सगळंच विकतचं. पाणी आणि सरपणही. वर  शिकारही करता येत नाही. हे तळातल्या बदकाचे जगणे, 
तो मान्य करत नाही. अर्सेनिव्हने दिलेली नवी रायफल 
घेऊन तो शहराबाहेर त्याच्या अरण्याच्या जगात परततो अन् त्याचा घात होतो. पुस्तकात अर्सेनिव्ह जंगलांचेे पशू अन् नानाविध पक्ष्यांचे जे वर्णन करतो, त्यासाठी अन्् या मानवीय निखळ मैत्रीसाठी पुस्तक वाचायलाच  हवे. मर्यादित जवळच्या मित्रांशिवाय पुण्याचा माझा तसा संबंध नाही. मुंबईच्या तुलनेत ते कसं "सावकाश’ असे माझे पूर्वग्रह. पण अरण्यात एकटं राहून आयुष्यभर एका ध्येयाने काम करणारी माणसं 
काही आहेत इथं. पैकी दत्ता देसाई. शिवाय या पुस्तकाचे अनुवादक जयंत कुलकर्णी हे मला माहीत असलेले आणखी एक. एकूणच अनुवादाचे केवढ्या निष्ठेनं काम 
करताहेत, हे. त्यांना नमस्कार केल्याशिवाय या पुस्तकाचे परीक्षण शक्य नाही.

 

anandwingkar533@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...