आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुवादकांसाठी उत्‍तम मार्गदर्शक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमा कुलकर्णी. प्रसिद्ध अनुवादक. या उमाताईंच्या आयुष्यातले कौटुंबिक आणि अनुवादक म्हणून काम करतांना आलेले अनुभव उलगडून सांगणारं पुस्तक म्हणजे संवादु-अनुवादु. हे पुस्तक आत्मकथनपर असलं तरी संपूर्ण कथनात केवळ वैयक्तिक आठवणींवर भर दिलेेला नाही. अनुवादक म्हणून उमाताई कशा घडत गेल्या, हे जाणण्यासाठी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.


का नडी लिहिता वाचता येऊ लागल्याने माझी कानडी-मराठी अशी धडपड सुरू होती. त्या निमित्ताने उमाताईंजवळ अनेकदा फोनवर बोलणं होत होतं. त्या कानडी भाषा शिकलेल्या नाहीत आणि त्यांचे यजमान त्यांना कानडी पुस्तकं वाचून दाखवतात व ते ऐकून त्या त्याचा मराठीत अनुवाद करतात, हेही कानावर आलेलं होतं. अशा पद्धतीने त्या इतके अनुवाद कशा काय करू शकतात, हा प्रश्न माझ्यापुढे कायमच असायचा. त्यामुळे त्यांचं आत्मकथन येतंय हे कळल्यावर मी कमालीची उत्सुक होते. ४२६ पानांचं हे पुस्तक हातात आल्यावर तिसऱ्या दिवशी पूर्ण वाचूनच खाली ठेवलं. एकदा वाचून समाधान झालं नाही म्हणून परत वाचून काढलं. सुंदर सोप्या भाषेत लिहिलेलं पुस्तक. विशेष म्हणजे त्यात कुठे ‘मी’चं अस्तित्वच जाणवत नाही. सनसनाटी मजकूर नाही, कुठली तक्रार नाही, प्रौढी नाही. जीवन समोर आलं तसं स्वीकारल्याचा आनंद आणि त्याविषयीचे असंख्य अनुभव. आपल्यातलीच वाटावी अशी एक सामान्य गृहिणी आपल्याजवळ गप्पा मारत आहे, आपले अनुभव शेअर करत आहे, असा सगळा मामला. 


आत्मचरित्र म्हटलं की, त्यात कौटुंबिक भाग असणं अनिवार्यच. पण उमाताई त्यात जास्त रेंगाळलेल्या दिसत नाहीत. या पुस्तकात फक्त सत्तर-ऐशी पानांमध्ये  हा कौटुंबिक भाग आलेला आहे. माहेर बेळगाव. या माहेरच्या सुषमा कुलकर्णी. शिस्तशीर वडील व उत्तम गृहिणी असलेली आई यांच्या छत्रछायेखाली या सात भावंडांचं मजेत, सुखात गेलेलं बालपण. घरकामाबरोबरच सायकलिंग, पोहणं, वाचन याचे बालपणीच झालेले संस्कार. बेळगावमधील त्या काळातल्या खूप आठवणी आपल्याला इथे वाचायला मिळतात. सासर गावातलंच, पण कानडी. त्या घरात सगळी कानडी बोलत असत. परंतु त्यांचे यजमान विरूपाक्ष यांना मराठी येत असल्याने उमाताईंना फारसं कठीण गेलं नाही. तसं त्यांनाही थोडंफार कानडी समजत होतं पण बोलता येत नव्हतं.  काहीशा कर्मठ असलेल्या या भल्यामोठ्या कुटुंबाची ओळख उमाताई अगदी मोकळेपणी करून देतात. तेथील सोवळंओवळं, देवपूजा, व्रतवैकल्ये याविषयी वाचताना सत्तरच्या दशकातील कर्नाटकातील कानडी कुटुंब डोळ्यासमोर उभं राहतं. ही ओळख तशी थोडक्यात असली तरी त्यांचे कुटुंबीय पुस्तकात प्रसंगानुरूप आपल्याला पुन्हा पुन्हा भेटत राहतात.


लग्नानंतर त्या पुण्याला बिऱ्हाडात येतात व त्यांच्या आयुष्यातील नवीन पर्व सुरू होतं. याच काळातली एक गंमत. एके दिवशी विरूपाक्ष सांगून टाकतात, ‘आजपासून आपल्या घरातली भाषा कानडी असेल.’ त्यानंतर उमाताई प्रयत्नपूर्वक छान कानडी बोलायला शिकतात. एका बाजूला बीएची परीक्षा, नंतर चित्रकला विषय घेऊन एमए, त्यानंतर पीएचडीसाठी भटकंती असं सगळं सुरू असतानाच, साहित्याची आवड असणाऱ्या विरूपाक्षांबरोबर कानडी-मराठी साहित्यावर भरपूर गप्पा होत असत. एकमेकांची साहित्याची आवड परस्परांकडून जोपासली गेली हे त्या मनापासून सांगतात.


एवढा कौटुंबिक भाग सोडला तर उरलेल्या संपूर्ण पुस्तकात त्यांनी केलेले विविध पुस्तकांचे अनुवाद, त्या अनुषंगाने होणाऱ्या लेखकांच्या, साहित्यिकांच्या गाठीभेटी, कर्नाटकातील विविध स्थळांना दिलेल्या भेटी आणि त्या त्या वेळेचे अनुभव व किस्से वाचायला मिळतात. 


अनुवादित केलेल्या काही कादंबऱ्यांची त्यांनी या पुस्तकात ओळख करून दिली आहे. काही कथानकं, काही कादंबऱ्यांची पार्श्वभूमी  सांगितली आहे. ‘तनामनाच्या भोवऱ्यात’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकरूपात आलेल्या अनुवादित कादंबरीची पार्श्वभूमी थरारक वाटते. घरात नातेवाईक, साहित्यिक, मित्रमैत्रिणी अशा पाहुण्यांची अखंड वर्दळ असते. अशा वेळी गृहिणीपणाचा आब राखून, दुसरीकडे त्यांचं अखंड लेखन चालू असतं. यावरून अनुवादाच्या कामात त्यांनी किती झोकून देलं आहे, याची कल्पना करता येते.


आज सर्वोत्तम अनुवादक अशी ओळख असलेल्या उमाताईंच्या हातून पहिला अनुवाद कसा घडला याचा मजेशीर किस्सा आहे. ७८-७९ मध्ये कन्नड लेखक शिवराम कारंथ यांच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. त्या कादंबरीत एवढं काय असावं, ही उत्सुकता उमाताईंना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना स्वतःला तर कानडी वाचता येत नव्हतं. अखेर विरूपाक्षांनी त्यांना ती कादंबरी थोडी थोडी वाचून दाखवली, व ती ऐकता ऐकता उमाताईंनी ती मराठीत लिहून काढली. नंतर त्यांच्या लक्षात आलं की, आपल्या हातून एका कानडी कादंबरीचा मराठीत अनुवाद केला गेलाय. अनुवाद कार्याचं बीज असं इथे रुजलं.


कानडीतील अनेक नामवंत लेखकांच्या उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी मराठीत आणल्या आहेत. कथा-कादंबऱ्यांबरोबर काही नाटकं व थोडंफार काव्यही त्यांनी अनुवादित केलं आहे. अर्थात वैचारिक साहित्यापेक्षा सृजनात्मक साहित्यामध्ये त्या जास्त रमतात, असं दिसून येतं. अनुवादाविषयी इतके अनुभव व किस्से त्यांनी आपल्यापुढे ठेवले आहेत की, अनुवादकांसाठी हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शकच आहे. परंतु हे मार्गदर्शन करताना त्यांनी कुठेही शिक्षकाची भूमिका घेतलेली नाही. फक्त अनुभव सांगितले आहेत. अनुवादाला सुरुवात करण्यापूर्वी मूळ लेखकाची परवानगी कशी आवश्यक आहे, अनुवादित पुस्तकाच्या नावालाही किती महत्त्व असतं, पुस्तक प्रकाशनातही कशा अडचणी येतात हे त्या वेगवेगळे किस्से सांगत आपल्यापुढे मांडतात.


त्यांची अनुवादाची एक पद्धत आहे. पुस्तक हातात आल्या आल्या त्या अनुवादाला सुरुवात करत नाहीत. पुस्तक संपूर्ण वाचून, समजून घेऊन, विरूपाक्षांबरोबर चर्चा करून अनुवाद करावा का ते ठरवतात. त्याबरोबरच लेखकाजवळ संपर्क साधून, शंकानिरसन झाल्यावरच अनुवादाला सुरुवात होते. लेखकाचं व्यक्तिमत्त्व परिचित झाल्यावर त्याचं साहित्य कळायला सोपं जातं असं त्यांना वाटतं.


या साहित्यसेवेच्या प्रवासात विविध टप्प्यांवर त्यांना अनेक माणसं भेटत गेली. अनिल अवचट, कमल देसाई, पु.ल. व सुनीताबाई, सुमित्रा भावे, गिरीश कर्नाड आणि अशी अनेक ज्यांच्यामुळे त्यांचं अनुभवविश्व समृद्ध होत गेलं. ही सगळी माणसं आपल्याला वेळोवेळी पुस्तकात भेटत राहतात. 


‘सोनियाचा उंबरा’ या दूरदर्शन मालिकेचं लेखन त्यांनी केलं होतं. त्या मालिकेच्या दरम्यानचे अनेक अनुभव त्यांनी दिले आहेत. गाजलेल्या कन्नड मालिकेवर आधारित असलेली ही मालिका मराठीतही प्रचंड लोकप्रिय झाली होती. आकाशवाणीसाठीही त्यांनी लेखन केलेलं आहे. केतकर वाहिनी ही त्यांची स्वतःची कादंबरी. त्या चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरतात. त्या उत्तम फोटोग्राफर आहेत. पण यांपैकी एकही गोष्ट त्यांनी ठळकपणे पुस्तकात संगितलेली नाही. 


भैरप्पा, कारंथ, तेजस्वी हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्याबरोबरचे अनुभव पुस्तकात विस्ताराने आले आहेत. कर्नाटकात सासर-माहेर असल्याने व अनेक साहित्यविषयक समारंभांच्या निमित्ताने उमाताई अनेक वेळा कर्नाटकात जातात. पुस्तक वाचता वाचता लक्षात येतं की, उमाताईंनी आपलं बोट धरून कर्नाटकातील अनेक ठिकाणी आपल्याला फिरवून आणलं आहे.


अनेक वर्षांपूर्वी गावाकडच्या गुग्गुळ नावाच्या पारंपरिक विधीला या दांपत्याला सामोरं जावं लागलं होतं. हा कुलदैवतेच्या पूजेचा गावासमोर करण्यात येणारा विधी, यांना न विचारताच मामीने ठरवलेला असतो. सगळं अवघड असतं. पण हा प्रसंग लिहिताना न चिडता, न संतापता उमाताई लिहितात, ‘मी त्यांच्या भावनाचा अव्हेर नाही करू शकले.’ इतकंच. असे चटका लावणारे प्रसंग वाचताना अस्वस्थ व्हायला होतं व अंतर्मुखही.


त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांपैकी साहित्य अकादमीचा  पुरस्कार हा अत्यंत महत्त्वाचा. पण तो जेव्हा जाहीर झाला त्या आठवड्यातील गोंधळाचे किस्से वाचताना आपणही गडबडून जातो. कारंथ आपल्याकडे मुक्कामाला येत आहेत हे कळल्यावर या दांपत्याची उडलेली गडबड, विरूपक्षांची वरणगावला झालेली बदली, घरमालककडून आलेली नोटीस, असे अनेक किस्से. सुधा मूर्तींची पोस्टाच्या रांगेत उभं असताना झालेली पहिली ओळख व नंतर त्यांच्या काही पुस्तकांचे उमाताईनी केले अनुवाद, असे अनेक प्रकारचे अनुभव. काही बरेवाईट प्रसंग, पण ते आपल्यापर्यंत पोचतात ते अगदी सहज, ओघात सांगितल्याप्रमाणे. कुठेही कटुता नाही, उद्वेग नाही की फुशारकी नाही. आजच्या भाषेत खरं तर त्या सेलिब्रिटी आहेत. मात्र हा सेलिब्रिटीपणा त्यांच्या आसपासही फिरकलेला दिसत नाही.


उमाताईंना त्यांच्या कामात विरूपाक्षांची भक्कम साथ आहे. त्यांचंही मराठीतून कन्नड असं अनुवादाचं काम अव्याहत चालू आहे. विरूपाक्षांना आलेले त्याविषयीचे बरेवाईट अनुभवही उमाताईंनी आपल्यासमोर ठेवले आहेत. उमाताईंच्या घरात कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा हातात हात घालून साहित्यसेवा करत आहेत व त्याचं विलोभनीय चित्र ‘संवादु अनुवादु’ या आत्मकथनातून त्यांनी आपल्यासमोर मांडलं आहे. अनुवाद हा विषय केंद्रस्थानी ठेवून वाचकांजवळ मारलेल्या त्या गप्पा आहेत. त्यात आपणही सहभागी व्हायलाच हवं. 


- संवादु अनुवादु - आत्मकथन 
मेहता प्रकाशन 
पृष्ठसंख्या ४२६ 
किंमत ४५० रुपये


- अपर्णा नायगांवकर, मुंबई
aparna.s@rediffmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...