आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उन्हाळी शिबिरांत ढकलण्या आधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परीक्षा संपल्या रे संपल्या की मुलांना उन्हाळी शिबिरं, छंदवर्गांत घालण्याची फॅशन ग्रामीण भागांतही पसरलीय. पण असे वर्ग आवश्यक नाहीत व त्यासाठी पैसे टाकून मुलांची सुटी वाया घालवण्याऐवजी घरच्या घरी काय करता येईल, हे सांगताहेत एक प्राथमिक शिक्षक. त्यांचे अनुभवाचे बोल जणू.

 

आपल्या मुलांना उन्हाळी शिबिरे, छंदवर्ग, संस्कार वर्गामध्ये दाखल करताय?
थोडं थांबा, विचार करा.


मूल पूर्ण शैक्षणिक वर्षात नियमित वेळेवर शाळेत जाते. वेगवेगळ्या क्लासला जाते. शाळेचा अभ्यास, क्लासचा अभ्यास वर्षभर चालू असतो. तेव्हा दररोज त्याच दैनंदिनीमुळे काही ठरावीक काळात पठारावस्था येते, थकवा येतो. तो दूर करण्यासाठी, रिफ्रेश होण्यासाठी उन्हाळी सुटी असते. मात्र, पालकांच्या अति महत्त्वाकांक्षेपोटी बालकांची उन्हाळी सुटीही वेगवेगळ्या क्लासमध्ये जाते. उन्हाळ्यात शेतकरीही आपल्या जमिनीची नांगरणी करतो/ उन्हाळखर्डा (उन्हाळ्यातील मशागत) घालून विश्रांती देतो, ती मृगाचा पाऊस पडेपर्यंत. मात्र शिक्षित पालक (सुशिक्षित नाही) उन्हाळी सुट्टीतही आपल्या नियोजनाप्रमाणे बालकाला गुंतवून ठेवतात.

 

इतरांनी क्लास लावला मग माझ्याही मुलाला हवाच क्लास अशी मानसिकता. बरं एखाद्याने क्लास नाही लावला तर एवढे पैसे खर्च करत नाही तुम्ही लेकरासाठी, असे टोमणे बसतात.

विचार करा, वर्षातील १० महिने क्लासला जाणारे मूल एक महिना आईबाबांसोबत खेळले, आजी-आजोबांसोबत गप्पागोष्टी करत राहिले, मामा/आत्याच्या गावाला जाऊन खेळले तर काहीच शिकत नाही का यातून? नक्की शिकते. आईवडिलांच्या, आजी-आजोबांच्या प्रेमातून मूल संस्कार शिकते, मानवतावादी दृष्टिकोन शिकते. कौटुंबिक प्रेमामुळे बालकांमध्ये आत्मविश्वास येतो. घरातही प्रेमळ सहवासात राहून मूल छोटीछोटी कौशल्ये आत्मसात करते. छंद जोपासते.आणि त्यातूनच बालकाची नैसर्गिक आवड, छंद काय आहे हे पालकांना विनासायास लक्षात येते. यासाठी कशाला हवा छंद वर्ग? आणि हो, संस्कार वा मूल्ये कुठे क्लासने मिळणारी गोष्ट नाही, ती कुटुंबातून आपसूक प्राप्त होणारी गोष्ट आहे.

 

हा त्यासाठी कुटुंबानेही त्याची काळजी घेतली पाहिजे. आपले घरच छंदवर्ग होऊ शकतं. पटलं तर पाहा प्रयोग करून एकदा. पाहा कौटुंबिक स्नेह बालकाला किती प्रेरणा, उत्साह व पुढील शिक्षणासाठी ऊर्जा देतो ते.
उन्हाळ्यातील उपक्रम
१) आवडीची चित्रे काढून रंग भरणे
२) शेंगा स्वतः फोडून खाणे
३) सुईमध्ये दोरा ओवणे, धावदोरा घालणे.
४) गोट्या खेळzणे
५) सागरगोटे खेळणे
६) लगोर पाडणे
७) छोटे अॅक्टिविटी बुक सोडवणे
८) चित्रयुक्त गोष्टीची पुस्तके वाचणे
९) वाचलेल्या गोष्टीतील पात्रांची नावे, कामे एका शब्दांत लिहीणे
१०) पालकांच्या मार्गदर्शनात पोहणे, धावणे
११) घरची छोटी छोटी कामे करणे (उदा. झाडांना पाणी देणे, अंथरूण घालणे व काढणे, भाजी निवडण्यास मदत करणे, इ.)
१२) वर्तमानपत्राचे निरीक्षण, आवडीची चित्रे कापणे, चिकटबुकवरती चिकटवणे
१३) टायर खेळणे इ.
१४) चित्र फाडून जुळवणे 
१५) गाण्याच्या भेंड्या 
१६) गावांच्या नावांच्या भेंड्या 
१७) नकाशा वाचन, सुची शोधणे
१८) नाते संबंधित कोडी 
१९) सामान्य ज्ञानावर आधारित चर्चा 
२०) पक्षी निरीक्षण व टिपणे ठेवणे 
२१) पारंपरिक गाणी म्हणणे
२२) जात्यावरील ओव्या ऐकणे
२३) घरातील धान्याची माहिती देणे 
२४) एखाद्या अशिक्षित व्यक्तीस लिहिण्या-वाचण्यास मदत करणे 
२५) बँक, पोस्ट यांचे व्यवहार शिकणे 
२६) सूरपारंब्या, विटीदांडू हे खेळ खेळणे 
२७) आपले शैक्षणिक साहित्य आवरणे 
२८) कोऱ्या पानांची वही बनवणे 
२९) दैनंदिनी लिहिणे
३०) खारवणे, वाळवणे या उन्हाळी कामात सहभागी होणे
३१) चिकटपट्टी व पुट्ठे वापरून फोटो फ्रेम करणे 
३२) परसबाग वृक्ष संगोपन करणे 
३३) वडीलधाऱ्या मंडळींशी गप्पा मारणे 
३४) शेतीकाम, घरगुती उद्योग याची माहिती मिळवणे 
हे आणि यांसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, एकाग्र चित्त, सौंदर्यदृष्टी, स्वअध्ययन, प्रयत्नवादी जिज्ञासू वृत्ती, लक्ष केंद्रीकरण व अवयवांचा समन्वय या गोष्टींचा विकास होतो, जे पुढील आयुष्यातील स्वयंअध्ययनासाठी उपयोगी आहे. आणि स्वयंअध्ययन म्हणजे यशाचा मार्ग.

 

उन्हाळी शिबिरात मुलांना घालण्याबद्दल अनेक वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशकांना याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला.

 

ऐश करूया सुटीची- श्वेता मराठे (मुंबई)

आज सकाळी पेपर वाचत होते. ‘सँडविच स्कूल’च्या संकल्पनेविषयी बातमी होती. उन्हाळी सुटी कमी करून पुढच्या शैक्षणिक वर्षातला अभ्यासक्रम शाळा सुरू करत आहेत, आणि जी काही एक-दीड महिना सुटी मुलांना मिळते त्यातली पालक मुलांची रवानगी वेगवेगळ्या लर्निंग कॅम्प्समध्ये करत आहेत. हे चित्र पाहून मन उदास होतं. माझ्याकडे आठवी इयत्तेतला एक मुलगा समुपदेशनासाठी आला होता. तो सुटीत गिटार, गाणं, आणि नृत्य अशा तिन्ही क्लासना जावा, अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. 

 

शिवाय रोजचा अक्षर सुधारण्याचा वर्ग होताच. तो मुलगा म्हणाला, ‘उन को मुझे देने के लिए टाइम कहाँ है, इस लिए इतने सारे क्लासेस लगाना चाहते है!’ म्हणजे सुटी सुरू झाल्यानंतर मुलांना शाळेसारखंच गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळे कॅम्प्स.


मुळात सुटी कशासाठी असते?

शाळेत असतानाचा नियमित दिनक्रम, वेगवेगळ्या वर्गांना जाण्याची गडबड, परीक्षांचा, स्पर्धांचा ताण विसरण्यासाठी. मग जसे पालक शाळा सुरू असतानाच्या दिनक्रमाविषयी विचार करतात, त्यासाठी तयारी करतात, असाच सुटीविषयी, त्यात मुलं काय करणार आहेत, त्यातून त्यांना नवीन काय मिळणार आहे, कशाची मजा येणार आहे, हाही विचार करायला हवा.

 

सुटीत मुलांनी एकत्र खूप खेळायला हवं. पत्ते, कॅरम, उनो असे बैठे खेळही, आणि क्रिकेट, लपाछपी, बॅडमिंटन, सायकलिंग असे मैदानी खेळही. एकमेकांचं समजून घेऊन, कधीकधी वादावादी करून, एकमेकांमधले गुण समजून घेऊन, सर्वांना घट्ट धरून पुढे जायचं आहे. सामाजिक गुणवत्ता आणि भावनिक गुणवत्ता वाढवण्याची सुटी ही एक छान संधी आहे. पालकांनी मुलांसोबत बसून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी राेज एखादा अक्षरांचा, आकड्यांचा, शब्दांचा खेळ खेळण्यासाठी, चित्रं रंगवण्यासाठी, गोष्टी/बालनाट्यं वाचून दाखवण्यासाठ, त्यांच्यासोबत भसाड्या आवाजात गाण्यासाठी, घरातल्या वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांची मदत घेऊन त्यांना धन्यवाद असं म्हणण्यासाठी... थोडक्यात सुटीची पूर्ण मजा घेण्यासाठी सुट्टी असते.  पालकांनो, फक्त आपण किती पैसा खर्च करतो हे महत्त्वाचं नसतं. तुम्ही आणि तुमच्या मुलांनी मिळून सुटीची, सुटीच कशाला कोणत्याही गोष्टीची, किती मजा घेतलीत ते महत्त्वाचं. चला तर मग, सुटीवर.

 

मुलांमधल्या प्रचंड ऊर्जेचं करायचं काय?- डॉ. अपर्णा अष्टपुत्रे (औरंगाबाद)

औरंगाबादच्या डॉ. अपर्णा अष्टपुत्रे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. शिवाय पाथ फाइंडर संस्थेच्या उन्हाळी शिबिरांमध्येही त्या मार्गदर्शन करतात. मुलांना छंदवर्गाला घालण्यासंदर्भात त्यांची मतं काहीशी वेगळी आहेत. कुठल्या छंदवर्गाला मुलांना घातलं जातं यावर खूप काही अवलंबून असल्याचं त्या म्हणतात. आजकाल विभक्त कुटुंबपद्धती आहे.

 

अशा छोट्या कुटुंबात एकच मूल असतं. आईवडील दोघेही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे ते मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. पूर्वीसारखं पूर्ण सुट्या मामाच्या गावाला घालवणं आता सर्वच दृष्टींनी गैरसोयीचं आहे. 

 

त्यामुळे  मुळातच एकटी असणारी मुलं अधिकाधिक एकलकोंडी बनत जाताहेत. टीव्ही, मोबाइल, व्हीडीओ गेममध्ये ही मुलं रमण्यापेक्षा त्यांना समवयस्कांच्या शिबिरात दाखल केलं तर काय बिघडलं, असा प्रश्न त्या विचारतात. एखादा विषय घेऊन नाटक बसवणं,जाहिरात तयार करणं यांसारख्या गोष्टींतून मुलांच्या कल्पकतेला वाव मिळेल, अशा शिबिरांमधून जरूर घालावं, असं त्या म्हणतात.

 

एकटेपणामुळे आपल्याच कोषात गुरफटलेली मात्र प्रचंड ऊर्जा असलेली ही मुलं स्वत:च्या भावना अशा शिबिरांमधून व्यक्त करतात, ही खूप मोठी जमेची बाजू असल्याचं त्यांना वाटतं. समुपदेशक डॉ. संदीप सिसोदे यांचंही असंच मत आहे. दीर्घ कालावधीची शिबिरं असू नयेत असं त्यांना वाटतं. उन्हाळी शिबिरांचा कालावधी जास्तीत जास्त दोन आठवडे इतकाच असावा. खेळ, छंद, विचार आणि भावना व्यक्त करायला लावणारे विविध उपक्रम असं या शिबिराचं स्वरूप असावं. शैक्षणिक उपलब्धी वाढवण्यासाठी म्हणून मुलांना शिबिरात दाखल करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे असं ते म्हणतात. 

 

kawalea90@gmail.com

बातम्या आणखी आहेत...