आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉयलेट-एक थरार कथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनकर्त्यांना प्रतिमा उंचावण्याचा भारी सोस. या नादापायी केंद्रापासून राज्यापर्यंत "ठोकून देतो ऐसा जे की' अव्याहत सुरू. म्हणजे, समस्त जनता आपल्या प्रेमात पडलीय असं समजून खुद्द पंतप्रधान आठवडाभरात साडेआठ लाख शौचालये बांधल्याची बेधडक घोषणा करतात, त्यांचे पट्‌टसाथी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र दिन हाकेच्या अंतरावर असताना आपले राज्य हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करतात. आता, त्यांचा इरादा नेक आहे, सार्वजनिक आरोग्याची कळकळही समजून घेण्यासारखी आहे, पण वर्तणुकीत सहजासहजी न होणारा बदल नावाची काही गोष्ट आहे की नाही? "सवयीचे गुलाम' नावाचे सार्वजनिक त्रांगडे आहे की नाही? 


हर प्रयत्न करूनही ‘झाली’च नाही, तेव्हा सरपंचांनी नाद सोडून दिला. पाण्याचं डबडं नुसतंच ओतून देऊन धोतर खोचत ते बाहेर आले. बाहेर आले आणि वैतागाने त्यांनी संडासाचं दार ओढून घेतलं. जवळच्या बादलीतून पायावर पाणी ओतून घेतलं आणि अस्वस्थपणे ओसरीवर फेऱ्या मारायला लागले. मध्येच आठवण होऊन त्यांनी भिंतीतल्या देवळीतला कट्टा उचलून त्यातून एकदम दोन बिड्या काढल्या, दोन्ही पेटवल्या आणि दोन्ही नाकपुड्यातून असा काही भसासा धूर सोडला, की बस्स. गावाशेजारच्या कडकेश्वर साखर कारखान्याची चिमणीच जणू. अशी नाकातोंडाची फुल्ल चिमणी करून पोटाचा बोजा सावरत ओसरीवर इकडून तिकडं आणि तिकडून इकडं चकरा मारत नाकातोंडातून घनघोर धूर सोडत हिंडत असतानाच चहाची कपबशी घेऊन सरपंचीन बाई बाहेर आल्या. कपबशी तिथल्या स्टुलावर ठेवली आणि वळून त्यांनी बारकाईने सरपंचांच्या तोंडाचं निरीक्षण केलं. त्यांचं तोंड सरपंचीन बाईंना फार कष्टी दिसलं. आजही त्यांना ‘झाली’ नाही, हे वर्तमान कळून त्या विलक्षण कळवळल्या. 


खरं पाहता, सुरुवातीला काही दिवस त्याही हेच भोगत होत्या. आता हळूहळू त्यांना सवय झालीय, पण ‘मालकां’चा अजून ‘मेळ’ बसत नाही. आत गेल्यावर काही केल्या ‘होतच’ नाही. तसा घरात बऱ्याच वर्षांपासून संडास बांधलेला आहे. पण सरपंच त्याचा लाभ घेत नसत. एक तर घरातल्या घरात बायामाणसांच्या समोर तिथल्या तिथंच संडासात जाऊन बसायचं म्हणजे एरवीसुद्धा महामुश्कीलच काम. मुदलात यांना बंदिस्त जागेत होत नाही, कितीही करा आणि काहीही करा. नाही होत म्हणजे नाहीच होत. त्यातूनही जोर मारायचा तर यांना ग्यासचा भलता प्राब्लेम. सारखं पोटात वायू धरलेला असतो. घरातल्या संडासात बंद दाराआड अंग चोरून बसल्यावर रात्रभर पोटात तटून असलेल्या वायूचा एकेक हप्ता बाहेर सुटायचा म्हणजे अवघड काम ! ग्रामपंचायतीच्या नळाला पाणी सोडल्यावर घरोघरच्या नळांतून आधी जोरकस वारा बाहेर येऊ लागल्यावर येत, तसले ‘फुस्स... स्स्स... सार्र.. सुर्र.. सटाक’ असले नाना तऱ्हेेचे चमत्कारिक ध्वनिविशेष बाहेर येत. त्यानंतर मिनिट-दोन मिनिटे जोर लावल्यावर मग एकाएकी दिवाळीत भल्या पहाटे पोट्ट्यांनी सटासट औटगोळे उडवावे तसले दणकेबाज बार लागोपाठ होत. सगळा आसमंत दणाणून जाई. आत सरपंचांचा जीव लाजेनं, आणि बाहेर बाहेरच्यांचा जीव सरपंचांच्या बिनलाजेनं, भयंकर कानकोंडा होऊन जाई. एरवी रानामाळावर असली काय अडचण नसते. तिथे निसर्गाच्या सान्निध्यात कसलाही औटगोळा म्हणजे चिल्लर काम. घरातल्या घरात ही आवाजी आतषबाजी त्यांना नको वाटते. तसं,जन्मल्यापासून मोकळ्या जागेत बसायची लागलेली सवय या वयात बदलणं म्हणजे महाकठीण कर्म. तरीही  आपल्याला ‘व्हावी’, म्हणून काय करायचं बाकी ठेवलेलं नाही त्यांनी. रात्री झोपताना तांब्याभर गरम पाणी पिण्यापासून ते सकाळी उठल्यावर आधी चहा, मग लागोपाठ काही बिड्या किंवा गायछापचा बार ठासणं – असं जे सुचलं ते त्यांनी केलंय. तरीही व्हायचं तेच होतंय. मध्येमध्ये सकाळीसकाळी उठल्याउठल्या ‘गुड मॉर्निंग पथक’ नावाची मंडळी गावंदरीला वास घेत हिंडायला लागली आणि त्यांनी काहीजणांचे तांबे जप्त करून नेले, तेव्हाही इतकं काही मोठं वाटलं नाही त्यांना. पण चार दिवसांपूर्वी बाजूच्या आडमुठवाडीचा खुद्द सरपंच गुडमॉर्निंगवाल्यांना ‘रंगेहाथ’ म्हणजे ‘रंगेपार्श्वभाग’ सापडला. त्याचे नुसत्या पट्ट्यापट्ट्याच्या रेघाळ्या अर्ध्या चड्डीतले फोटो त्यांनी ‘व्हाट्साप’वर व्हायरल केले तेव्हापासून तर धास्ती खाऊन सरपंचांनी दीड मैल लांब असलेल्या मळ्यातच झोपायला जायला चालू केलं. सकाळी मळ्यातच सगळं निवांत उरकून निर्मळ मनाने ते गावात येऊ लागले.
पण आता दिवस खूप कठीण आलेत.  म्हणजे सकाळी उठल्यावर आधी चूळ भरून ते एक कपभर कडक चहा मारतात. मग गायछापचा एक ठसठशीत बार ओठांच्या आड ठासतात आणि एखाद्या मुनीने तपाला बसावे तितक्या एकाग्रतेने चित्त ‘तिथे’ एकवटून ते ‘किक’ची वाट पाहू लागतात. आतून ऑलरेडीच दाटून आलेलं असल्यामुळे काही वेळाने त्यांना किकची भावना होते. त्यांची गात्रं ना गात्रं रोमांचित होतात आणि मग पटकन दार ढकलून ते आत शिरतात. लगबगीने पादुकांवर बसतात आणि डोळे मिटून घेऊन ‘त्या’ सुखाच्या प्राप्तीची वाट बघत राहतात. ते अक्षरश: वॉर फूटिंगवर प्रयत्न करतात, पण नाही होत म्हणजे नाहीच होत. 


कुंथून कुंथून त्यांचा चेहरा कुणीकडच्या कुणीकडे ताणला जातो. मघाशी सरसरून आलेली तुडुंब किक कुठल्या कुठे गायब होते, ‘हेचि फल काय मम तपाला?’ असं तोंड करून आणि अग्गदी गरीब गाढवागत कान पाडून ते गपचिप बाहेर येतात. कपडे करून घराबाहेर येतात आणि पंचायतीकडे जायच्या ऐवजी उलट्या दिशेने वावराकडे चालू लागतात. जसजशी मोकळी हवा मस्तकाला लागेल तसतश्या त्यांच्या चित्तवृत्ती फुलून येऊ लागतात आणि मळ्यात पोहचेपर्यंत तर त्यांना अनावर होऊन जातं. अतोनात घाई करून ते गोठ्याबाहेर असलेलं डबडं भरून घेतात आणि त्याहून अतोनात घाई करून उभ्या पिकात शिरतात. क्षणार्धात बॉंबगोळे फुटल्याचे आवाज आसमंतात उठतात. पाच-पंधरा मिनिटांनी अतिशय प्रसन्न मुद्रेने ते धोतर खोचत बाहेर पडतात आणि "हर फिक्र को धुँवे में उडाता चला गया' स्टाइलीत बिडी शिलगावतात... 


‘शंभर टक्के मुक्ती’ झाल्याचं सरकारनं जाहीर करून टाकलं तेव्हापासून सरपंच जवळजवळ रोजच अशी तारेवरची कसरत करतात. खरं तर सरकारनं ही मुक्तीची बोंब सुरु करण्याआधीच सरपंचांनी बंद दाराआड बसण्याचे प्रयोग चालू केले असते तर ‘आतच करण्यात’ आतापर्यंत त्यांनी यश मिळवलेही असते. पण तेव्हा याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं नाही. दर संडासामागे बारा हजाराचं अनुदान आहे म्हटल्यावर पहिलेछूट त्यांनी केलं काय, तर आपल्या बाहेरगावी नोकरीत असलेल्या दोन्ही भावांच्या नावावर दोघांचं मिळून वट्ट चोवीस हजार रुपये अनुदान उचललं. उचललं म्हणजे अक्षरश: ‘उचललं’. संडास तर त्यांनी दोन- तीन वर्षांपूर्वीच बांधलेला. घरातली बायापोरं तिथं जातातही, पण स्वत: सरपंचांनी त्याचा वापर आजवर केला नाहीय. ‘ती’ गोष्ट मोकळ्या हवेत पार पाडण्याइतकं सुख कशातच नाही, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. हे सरकार सुक्काळीचं काही तरी नसत्या कुरापती उकरून काढतं. सरपंच म्हणून त्यांना सरकारविरोधात बोलता येत नाही पण ‘गावाशेजारी बसण्याने कधी कुणाला रोग होऊन तो मेलाय, असं एकतरी उदाहरण दाखवा’, असं जाहीर आव्हान ते खाजगीत अनेकदा देतात. आणि त्यांचं म्हणणं गावकऱ्यानाही पटतं. खरंच नाही तर काय! पूर्वी प्लेगानं, पटकीनं, कॉल-यानं माणस मरायची. खुद्द हगवण लागूनही मरायची. पण इतरांच्या हगण्याने कुणी मेलेलं माहितेय का कुणाला? हल्ली लोक मेलेच तर फक्त आक्शिडनमध्ये मरतात किंवा हार्टट्याट्याकने मरतात. पैकी आक्शिडनचं सोडा; तो काय आजार नसतो. गावंदरीतून येणाऱ्या वासामुळे कुणाला हार्टट्याट्याक आला आणि तो मेला असं कधी ऐकलंय काय कुणी? 

रिक्कामा फाजीलपणा!
शंभर टक्के ‘मुक्ती’ झाल्याचं सरकारने जाहीर केलं याचा सोपा अर्थ हे आपलं गावही मुक्त झालेलं आहेच, असा होतो. सर्वे करायला आलेल्या माणसांनी पंचायतीला आणि मग पंचायतीने त्याच माणसांना तसं सांगितलेलं आहे. परस्परांनी परस्परांच्या कागदांवर तसे सहमतीचे शिक्केही मारलेले आहेत. गावातल्या पाचशे तेवीस घरांपैकी बेस लाइनमध्ये असलेल्या चारशे पंचाण्णव घरांमध्ये संडास बांधलेला आहे, असं निदान कागदोपत्री तरी सिद्ध होऊ शकतं. बेस लाइनमध्ये म्हणजे,ज्या घरांनी संडास बांधण्याची मागणी केली अशी. किंवा तशी मागणी त्यांनी केलीच आहे असं समजून त्यांची नावे त्या यादीत नोंदवली आहेत, अशी. उरलेल्या घरांनी का मागणी केली नाही?  किंवा सरपंचांनी त्यांची नावं बेसलाइनमध्ये का घातली नाहीत? तर, समजा, सरपंचांनी त्या लायनीत नाव नसलेल्या त्यांच्या शेजारच्याच खंडबाला विचारलं असतं की, बाबा खंडबा, आपल्या दारी संडास असावा असं तुला का वाटत नाही? तर खंडबा काय म्हणाला असता? खंडबा म्हणाला असता, आपल्या घरी खायलाच काय नसतं तर आपल्याला हगायची जरूरच काय? या विचाराने आपल्या दारी संडास नसावा असं मला वाटतं.


खंडबाचं सोडा, ज्या चारशे पंचाण्णव घरांमध्ये संडास बांधला आहे त्यातल्या कैकाना आपल्या घरी संडास बांधलेला आहे याची खबरबातच नाही. कारण त्यांच्या घरीदारी किंवा अंगणा-परसात तसा संडास खरोखरच बांधलेला नाही. त्यांनी फक्त अनुदान उचललेलं आहे आणि ते ‘खाऊन’ टाकलेलं आहे. आता त्यांना एकट्याला ते खाता येणं अवघड होतं, म्हणून काही थोडं सरपंचांनी, काही थोडं ग्रामसेवकाने आणि उरलेलं काही थोडं गाव शंभर टक्के मुक्त घोषित करणा-यांनी खाल्लं. ‘संडास’ या पदार्थाशी निगडीत एखादी गोष्ट अशी सबंध खाऊन टाकायची म्हणजे एकंदरोत अवघडच काम, पण एकमेकांना सहकार्य करण्याच्या उदात्त भावनेनं हे करावं लागतं. अर्थात काहीजण असेही आहेत की गावात असली काही ‘इस्किम’ चालू असल्याचा त्यांना पत्ताच नाही. त्यांच्याही घरासमोर संडास बांधलेले आहेत. फक्त ते संडास त्यांना किंवा गावातल्या कुणालाच दिसत नाहीत. ते फक्त सरपंच, ग्रामसेवक आणि काही वरचे अधिकारीलोक एवढ्यांनाच दिसतात...


...ओसरीवर फेऱ्या मारता मारता सरपंच एकदम एक थांबले. त्यांनी चोरासारखं इकडंतिकडं पाहिलं. मग हळूच एका पायावर जोर देऊन आणि दुसरा पाय जरासा हवेत उचलून ते दोन क्षण दबा धरून बसल्यासारखे उभे राहिले आणि एका विवक्षित क्षणी जोर एकवटला तेव्हा मागच्या बाजूने एक लांबलचक ‘टर्रर्र ठुस्स ठांय!!!’ असा सुरम्य ध्वनीविशेष त्यांनी ओसरीत सोडून दिला. मग सावधपणे माल वळवून चौफेर आढावा घेतला आणि याक्षणी जवळपास कुणीही नाही हे कळून त्यांना आनंद वाटला.


त्यांनी पायतान पायात सरकवलं आणि ते वाड्याबाहेर पडले. मुकाट विचार करत मळ्याच्या वाटेने चालू लागले.
“रामराम, मालक..” मध्येच आवाज आला तेव्हा तंद्रीतून जागं होऊन सरपंचांनी पांदीतून टमरेल घेऊन परत घराकडे निघालेल्या शिवराम पंचाला रामराम घातला. 
“येम्टीच निगाले, मालक? टमरेल दिऊ काय ह्ये भरून आणून?” पंचानं नम्रपणाने विचारलं.
सरपंचांनी डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे बघितलं. सालं मुद्दाम विचारतंय की काय हे बेणं? शिवराम पंच गालातल्या गालात हसतोय की काय असाही त्यांना भास झाला. मनातला संताप मनात दाबून ते म्हणाले, “टमरेल? लेका शिवराम, तुला काय लाजशरम हाय का न्हाई? आं? आरं, गाव आपलं शंभर टक्के हगणदारीमुक्त झालंय, पेपरात वाचलं न्हाईस काय बावळ्या? फुक्कट तिच्यामारी तुला पंच केला आमी पंचायतीचा.. मळ्यात निगालोय मी, चल सोड वाट..”
धोतराचा सोगा हातात धरून शिवरामला वळसा घालून पुढे जाण्याच्या नादात सरपंचांनी पाय उचलला आणि खाली टेकवता टेकवता त्यांच्या लक्षात आलं. तेवढ्यातल्या तेवढ्यात दुसरीकडे इकडेतिकडे पाय टेकवण्यासाठी ते अतोनात धडपडले. पण –
- पण, त्या क्षणी ते शक्य झाले नाही. भसदिशी त्यांचं पायतान... भुईवरच्या अर्ध्याएक किलोच्या ऐवजात शिरलं आणि अजून ताज्याच असलेल्या त्या गरम उबदार पदार्थाचा एक जाड थर पायाच्या घोट्यापर्यंत चहूबाजूंनी वर चढला.
केविलवाण्या आणि रडकुंड्या चेहऱ्याने सरपंचांनी शिवराम पंचांच्या तोंडाकडे पाहिलं. मेल्याहून मेल्यासारखं वाटून शिवरामने त्यांची नजर चुकवली आणि तो स्वत: उगाच इकडेतिकडे पाहत राहिला...


सरपंचांचा पाय बुडाला, तसल्याच नाना रंगांच्या आणि आकारमानाच्या ऐवजाने अवघी पांदण रांगोळ्या काढल्यासारखी भरून गेलेली होती.


- बालाजी सुतार
majhegaane@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९३२५०४७८८३

बातम्या आणखी आहेत...