आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलैकिक अदाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वत्व आणि शैली याचा अपूर्व संगम असलेले  ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचा ११ डिसेंबर हा वाढदिवस. यंदा वयाची ९५ वर्षे पूर्ण करणाऱ्या या नटश्रेष्ठाच्या अभिनयातली सौंदर्यस्थळे उलगडून सांगणारा हा लेख... 
 

एकाच वेळी नट म्हणून सामान्यांना आवडणारा आणि त्याच वेळी आपल्या उत्तुंग अभिनयानं जाणकारांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणजे दिलीपकुमार. भरतमुनींनी नाट्यशास्त्रात नायकाचे धीरोदात्त, धीरोदत्त, धीरललित आणि धीरप्रशांत, असे चार प्रकार सांगितले आहेत. नाटक या पूर्ण प्रकारासाठी धीरोदात्त, धीरोदत्त या प्रकाराचा, तर प्रकरण या प्रकारासाठी धीरललित, धीरप्रशांत या प्रकृतीचा नायक असावा, असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक नाट्य प्रकारांचे वैशिष्ट्य, प्रकृती लक्षात घेऊन, ही वैशिष्ट्ये सांगितली आहेत. पण दिलीपकुमार हा असा अभिनेता आहे, ज्याने धीरोदात्त, धीरोदत्त या प्रकाराच्या नायकाच्या भूमिका केल्या आणि धीरललित, धीरप्रशांत प्रकारच्या नायकाशीही नाते घट्ट असल्याचे दाखवून दिले. 


नटाला ‘अदाकार’ असे म्हटले जाते. त्यातील अदा ही गोष्ट केवळ दिलीपकुमारकडेच दिसून येते. हिंदी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार अभिनेत्यांचा बारकाईने विचार केला, तर एक गोष्ट लक्षात येते. ते म्हणजे, त्यांचे व्यक्तिमत्व वेगळे आहेच, पण शक्तिस्थानेही वेगवेगळी आहेत. उदा. मोतीलाल आणि बलराज सहानी यांचा साधेपणा व स्वाभाविकता. अमिताभचा आवाज आणि उंची. नसिरुद्दीन शाहची आर्तता, संजीवकुमारची नाट्यकलाभिमुख शैली. या सर्वांपेक्षा वेगळेच रसायन असलेला दिलीपकुमार खऱ्या अर्थाने परिपूर्ण अभिनेता ठरतो. बोलायचं ठरवलं, तर खास असे त्याच्यात काहीच नाही. पण तो जेव्हा पडद्यावर अवतरतो, तेव्हा त्याच्याकडे असलेले जे काही आहे, ते अमर्याद आहे, हे जाणवते. 


दिलीपकुमारच्या नावावर वाईट चित्रपटही खूप आहेत. पण त्यात तो स्वत: कधीच वाईट नव्हता. सिनेमाध्यमाची अचूक जाण त्याला आहे. स्वत: फ्रेममध्ये नसलेल्या किंवा आपल्यावर कॅमेरा नसलेल्या ठिकाणी त्याने कधीच स्वत:ची शक्ती खर्च केली नाही. हजारो डोळे थिएटरच्या अंधारात आपल्यालाच बघत आहेत, याची संपूर्ण जाणीव असल्यामुळे ‘अभिनया’च्या जागा कोणत्या व ‘अदा’च्या जागा कोणत्या याची जाणीवपूर्वक आखणी त्याने केली. बुद्धिमान आणि चतुर असल्यामुळे तसेच आपण एक व्यावसायिक नट आहोत, याचे भान असल्यामुळेच नट आणि अभिनेता याचा समतोल राखण्याची किमया त्याने वेळोवेळी साधली.  त्याने उच्चारलेले शब्द आणि शरीराची भाषा यात अप्रतिम टायमिंग आहे. हात किंवा बोटे ज्या लयीनं तो वापरतो, तीच लय शब्दांचीही असते. दृश्य प्रेमाचे असो की भावुक, आक्रंदनाचे, प्रत्येक वेळी शब्द आणि शरीर हातात हात घालून विहरताना दिसतात. तो पेश करत असलेली अदा किंवा सादर करत असलेला अभिनय यावर नट आणि अभिनेता म्हणून त्याचा ताबा असतो. अभिनयाचा अाविष्कार करण्याच्या विविध अभिनेत्यांच्या विविध पद्धती आहेत. शारीरिक ठेवण व आवाजाचे पोत वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. ज्या नटांचा, अभिनेत्यांचा आवाज खर्चातील, वजनदार आहे, अशी मंडळी हाताचा कमीत कमी वापर करतात. म्हणूनच स्वाभाविक वाटतात. उदा. मोतीलाल, बलराज साहनी, अमिताभ, नाना पाटेकर. पण त्याचबरोबर संजीवकुमार, नसिरुद्दीन शहा, कमल हसन, पंकज कपूर या सर्व महान अभिनेत्यांचे आवाज रूढार्थाने वजनदार नसले, तरी त्यांनी शरीरभाषेवर काम केल्याने महत्त्व प्राप्त केलेले लक्षात येते.  


दिलीपकुमार याच कलावंतांच्या जातकुळीतील आणि एकाच वेळी स्वाभाविक व नाट्याभिमुख शैलीशी नाते सांगणारा अभिनेता आहे. वरवर पाहता, दिलीपकुमारने त्याच्या भूमिका एकाच पद्धतीने केल्यासारख्या वाटतात. पण, तपशील अभ्यासला, तर ही गोष्ट खोटी, फसवी आहे, हेही जाणवते. त्याची स्वत:ची छाप भूमिकेवर असते हे खरे आहे. पण अनेक ‘तपशील’ वेगवेगळे ठेवण्यात, तो यशस्वी ठरतो. उदाहरणार्थ ‘मुगल-ए-आझम’मध्ये त्याने आवाजाचे पोत एकदम वेगळे ठेवले आहेत. हळुवार आवाजाबरोबरच अत्यंत कमी हातवारे केले आहेत. ग्रामीण ढंगाच्या, विनोदी प्रसंगांत हातवाऱ्यांचा त्याने जादा वापर केल्याचे दिसते. ‘शक्ती’ चित्रपटात करारी, स्वाभिमानी, तडफदार पोलिस अधिकारी साकारताना एकेका शब्दावर जोर देऊन बोलण्याची पद्धत वापरली आहे. तर हतबल, निराश झालेला बाप, पती साकारत असताना वाक्यांची सलगता न राखता, तुटक तुटक शब्दांचा आणि त्याच्या जोडीला पूरक हातवाऱ्यांचा कलात्मक वापर त्याने केलेला दिसतो.  


प्रत्येक भूमिकेचे बेअरिंग, आवाज आणि शरीराची भाषा व हातवारे यांच्यात एक सूक्ष्म असे वेगळेपण त्याने विचारपूर्वक ठेवलेले असते. म्हणूनच गेल्या पन्नास वर्षांत अनेक प्रवाह आले तरीही, हा अभिनेता कधीच प्रवाहाबाहेर फेकला गेला नाही. काळाबरोबर स्वत:ला थोडेसे बदलत तो दीपस्तंभासारखा उभा राहिला. प्रतिमेच्या पलीकडे जाण्यात त्याला यश लाभले, याचे मुख्य कारण म्हणजे, त्याची शरीरयष्टी आणि चेहरा यांना कोणतीही खास ठसठशीत ओळख, आयडेंटिटी नसणे यात सामावले आहे. 


१९५० ते ६० या काळात दिलीपकुमारला ‘ट्रॅजेडी किंग’ असे विशेषण बहाल करण्यात आले कारण त्याचे त्या काळातील बहुतांश चित्रपट शोकांतिका प्रकारातील होते. १९६० ते ७० कालावधीत त्याने रोमँटिक, विनोदी भूमिका असलेले चित्रपट केले. १९७५ नंतर वाढते वय आणि काळाची गरज ओळखून त्याने चरित्र अभिनेता रंगवण्यास सुरुवात केली. शक्ती, मशाल, कर्मा, विधाता म्हणून अँग्री ओल्ड मॅन उभा केला. प्रत्येक ठिकाणी त्याचा आविष्कार सौंदर्यपूर्णच होता. इतर कोणत्याही अभिनेत्याला एखादा प्रसंग परिणामकारक करण्यासाठी दहा ओळींचे दृश्य खर्ची करण्यासाठी, जे खर्च करावे लागते, तेच काम तो एखाद्या भावमुद्रेतून करत गेला.  


गाण्यात जशी एक लय असते, तशी संवादातून उभी करण्यात दिलीपकुमार मातब्बर. गंभीर, शोकांत भूमिकेत तसेच क्रोध दाखवताना त्याच्या कपाळावर नाकाच्या सरळ रेषेत मस्तकापर्यंत एक शीर टरारून उभी राहते. ती अनेक वेळा संवादाचे काम करते. एखादे वाक्य पुन्हा उच्चारून तो वेगवेगळ्या अर्थाच्या शक्यता निर्माण करतो. कधी शब्दांचे क्रम बदलून, तर कधी विरामांचा वापर करून तो हा परिणाम साधतो. एखाद्या भूमिकेचा अभ्यास करताना, ‘बिटविन द लाइन्स’चे प्रभावी प्रक्षेपण, त्याच्याइतके प्रभावीपणे दुसरा अभिनेता क्वचितच करत असावा.  
अभिनयाप्रमाणेच तो गाणेही कलात्मकरीत्या पेश करतो. गाणे कोणत्याही मूडचे असो, तर्जनी, मध्यमा ही दोन बोटे सरळ उभी ठेवून अनामिका व करांगुली थोड्याशा खालच्या बाजूला कललेल्या अवस्थेत राखत हातांच्या अर्धवर्तुळाकार, हातवाऱ्यांमधून व मुद्रांतून अवघड असलेले गाणे तो सुलभ, मोहक, आकर्षक करतो. शास्त्रीय बाज असलेल्या गाण्यात तर या प्रकारच्या हस्तमुद्रा सगळीकडे पेरलेल्या दिसतात. ‘कोहिनूर’ चित्रपटात ‘मधुबन में राधिका नाचे रे’ गाण्यातील शेवटचा तराणा पेश करतानाच्या हस्तमुद्रा त्याचे उत्तम उदाहरण आहे. नया दौरमधील नैन लड गई रे या लोकशैलीतल्या गाण्यात त्याचे हावभाव, “लीडर’ चित्रपटातील “तेरे हुस्न की क्या तारीफ करू ‘या गाण्यात पाय दुमडून बोटांच्या केलेल्या हरकती अशी अनेक गाणी सांगता येतील. अभिनयाच्या बाबतीत सांगायचे झाले, तर ‘मशाल’ चित्रपटात पत्नी गेल्यावर निर्मनुष्य रस्त्यावर केलेला आक्रोश, आक्रंदन म्हणजे, अभिनयाचा एक अख्खा अभ्यासक्रमच आहे.  


बुद्धिमान, लोभस व्यक्तिमत्त्वाचा, सुसंस्कृत आणि वजनदार असलेला एकाच वेळी नट आणि अभिनेता अशी ओळख निर्माण करणारा, दिलीपकुमार हा खऱ्या अर्थाने अभिनयाची एक संस्थाच आहे. कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि एकाग्रता हे नटाचे प्रमुख गुण मानले जातात.

 

बहुतांश नटांकडे यातील दोन गुण असतात. दिलीपकुमारकडे या तिन्ही गुणांचे सुयोग्य मिश्रण आहे. अनेक बडी नट मंडळी भावनानिष्ठ निर्मिती करतात. त्यांचा आविष्कारही भावनानिष्ठच असतो. काहींच्या बाबतीत बुद्धिनिष्ठता आढळते. या दोन्ही गोष्टी पडद्यावर काही वेळापुरत्या प्रभावित करतात. पण पडदा बाजूला सारून रसिकांपर्यंत पोहोचत नाहीत. दिलीपकुमारचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती बुद्धिनिष्ठ असते, पण रसिकांकडे पोहोचणारा आविष्कार भावनानिष्ठ असतो. म्हणूनच तो ‘लार्जर दॅन लाइफ’ म्हणजेच अलौकिकतेचा अनुभव देतो... 

 

- प्रा. डॉ. दिलीप घारे ( लेखक ज्येष्ठ रंगकर्मी, तसेच सरस्वती भुवन महाविद्यालयाचे माजी नाट्यशास्त्र विभागप्रमुख आहेत. लेखक संपर्क : ९८२२८२४५५५ )

बातम्या आणखी आहेत...