आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्‍लॅकमेल' नावाची अर्बन ट्रॅजेडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनय देवदिग्दर्शित ‘ब्लॅकमेल’हा फसलेला सिनेमा आहे, म्हणतोय आपण. ब्लॅकमेल ही न जमलेली फार्सिकल कॉमेडी आहे, म्हणतोय आपण. आर वुई सिरियस? ब्लॅकमेल ही फसलेली फार्सिकल कॉमेडी आहे? मॉरली, मेंटली आणि इमोशनली करप्ट समाजाशी याचं काहीच देणंघेणं नाही?..


धर्म आणि संस्कार फार तर तुमच्या आचार-विचारांना दिशा देतील, पण जीवनशैली ठरवण्याचे अधिकार आणि नियंत्रण पूर्णपणे बाजारपेठेच्या हाती एकटवलेले असतात. बाजारपेठेच्या प्रभावातून आकारास आलेली जीवनशैलीच पुढे आचार-विचारांवरही विलक्षण प्रभाव टाकते. या "कंडिशण्ड'झालेल्या आचार-विचारांना जसा परंपरावाद्यांचा धर्म आणि संस्कृती आडकाठी आणू शकत नाही. तसेच प्रामाणिकपणा, निष्ठा, नीतिमत्ता, सचोटी, परस्परांबद्दलचा आदरभाव आदी मूल्यव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या गुणांचीही फिकीर नसते. आज अशी मूल्यव्यवस्थेबाबत कमालीची बेफिकीर, स्वत:पलीकडच्या जगाचा विचार न करणारी घरात आणि घराबाहेर एकाहून अधिक मुखवटे सराईतपणे घालून वावरणारी  नवी-जुनी  पिढी टिपेचा कोलाहल माजलेल्या महानगरी जगण्यात एकमेकांना अनेक ठिकाणी आडवी जातेय.


यातली नवी पिढी लौकिकार्थाने सुशिक्षित आहे, धर्म आणि संस्कृतीचा तथाकथित प्रभाव असलेली आहे, सण-उत्सव, व्रत-वैकल्यात स्वत:ला झोकून देणारी आहे,  पण तिच्यात परस्परआदर - सन्मान राखण्यायोग्य सुसंस्कृतपणा आणि सभ्यपणा नाही. ही पिढी कॉर्पोरेट कल्चरला सरावलेली आहे, पण तिच्यात प्रामाणिकपणा, निष्ठा, सहवेदना, सहानुभूतीचा अंश  नाही. ही पिढी टार्गेट ओरिएंटेड आयुष्य जगतेय, पण तिच्यात जगणं प्रगल्भ नि उन्नत करण्यायोग्य निश्चित ध्येय नाही. ही पिढी तिन्हीत्रिकाळ मीडिया-सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जगाशी कनेक्टेड आहे, पण प्रत्यक्ष आयुष्यात जवळच्या माणसांशीच तिचा संवाद नाही.


म्हणजेच, जे व्यावसायिक स्तरावर घडतंय, तेच थोड्याफार फरकाने कौटुंबिक स्तरावरही आहे. म्हणजे, असंख्य घरांमघ्ये नवरा-बायकोच्या नात्यात असलीच तर केवळ औपचारिकता शिल्लक आहे. परस्परविश्वास, प्रेम, आदर, भावनिक-मानसिक गुंतवणूक हे सारं केवळ दुसऱ्यांना दाखवण्यापुरता देखावा म्हणून उरलं आहे. वर्षानुवर्ष नवरा-बायको एकत्र राहताहेत, पण त्यांच्या शारीरिक आकर्षणाच्या, भावनिक गुंतवणुकीच्या जागा भलतीकडेच आहेत. अशी कुटुंबबाह्य-विवाहबाह्य गुंतवणूक कायम ठेवून समाजाच्या भयाने एकत्र संसार करण्यालाही अनेक जण सरावले आहेत. लग्न वेगळं. प्रेम वेगळं,अशी बहुतेकांनी स्वत:पुरती आयुष्याची विभागणी करून टाकलीय. पण तिथेसुद्धा निखळ प्रेमापेक्षाही आर्थिक लाभाचा, व्यावसायिक फायद्याचा भाग अधिक वरचढ आहे. वर-वर जाणवत नसलं तरीही त्यातून उद््भवणारे ताण-तणाव, नैराश्य हे सारं आचार-विचारांना कलुषित करत चाललंय. समोरच्या माणसाला एकतर इम्प्रेस करणे किंवा स्वत:च्या फायद्यासाठी अत्यंत चलाखीने दुसऱ्याचा वापर करणे हा एकच विचार त्यात प्रभावी ठरतोय.  स्त्री असेल तर पुरुषाचं शरीर आणि पुरुष असेल तर स्त्रीचं शरीर, जोडीला अधिकच्या पैशंाची हाव, त्यातून आयुष्यभराची आर्थिक सुरक्षितता असे दोनच उद्देश घेऊन आसपासचं जग वावरत असल्याचा हा माहोल आहे. पैशाच्या बदल्यात शरीर आणि शरीराच्या बदल्यात पैसा, पद, प्रतिष्ठा असा हा सनातन हिशेब आहे. 


इथे खरं तर सगळाच कोलाहल आहे. नव्हे, कोलाहल हीच रोजच्या जगण्याची इथली पार्श्वभूमी आहे. हा कोलाहल नातेसंबंधांत आहे. व्यावसायिक स्पर्धेत आहे. शारिरीक आकर्षणाचा, आर्थिक लोभाचा, मानसिक-भावनिक अवलंबित्वाचाही मोठाच कोलाहल इथे माजलेला आहे. पण, जितका कोलाहल बाह्य जगात दिसतोय, त्याच्या दसपट अधिक माणसाच्या मेंदूत आणि मनात तो सुरु आहे. संयम, समजंसपणा आणि सम्यक विचारांचा इथला अवकाश वेगाने आक्रसतोय. शरीराचं आणि पैशांचं सुख मिळवण्यासाठी प्रत्येकाचा मेंदू इथे अथकपणे धावतोय. एकाच वेळी अरबटचरबट खावून पोट आणि माहितीचा कचरा साठवून  मेंदू सुटलेल्यांचे थवेच्या थवे काहीतरी विकताहेत किंवा विकत तरी घेताहेत. मीडिया-सोशल मीडियात  सारं कसं छान-छान सुरु आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे सोयीचे तेवढे क्षण शब्द आणि चित्रांच्या माध्यमातून एकमेकांपर्यंत पोहोचवून स्वप्रतिमा प्रेमाचा मंत्र कटाक्षाने जपला जातोय. सभ्यतेच्या बुरख्याआड कमीअधिक प्रमाणात एक दुसऱ्याची फसवणूक (चिटिंग)  आणि  भावनिक-मानसिक छळवणूक  (ब्लॅकमेल) करत राहणे हे इथले शिष्टसंमत मार्ग बनले आहेत. या खेळात नवरा-बायको, आई- वडील, मुलगा-मुलगी, बहीण- भाऊ नोकर-मालक, कर्मचारी-बॉस , असे सगळेच सामील आहेत. ही म्हटली तर, भरगच्च बाजारपेठा, विकासाच्या नावाखाली सदासर्वकाळ धडधडणारी अजस्र यंत्रं, अवघं जगणं ताब्यात घेत चाललेलं तंत्रज्ञान, तंत्रज्ञानाला आकार देणारी स्मार्ट साधनं, माणसाच्या संयमाचा अंत पाहणारी महानगरी रहदारी,जातीचं आणि धर्माचं निमित्त होऊन भावनांचा सदानकदा होणारा विस्फोट, त्या विस्फोटाच्या सर्वदूर पोहोचणाऱ्या ज्वाळा, अन्याय-अत्याचारग्रस्तांच्या सततच्या आत्महत्या, सततचे हिंसक मोर्चे-आंदोलनं याच्या एकत्रित परिणामातून आकारास येत चाललेली महानगरी शोकांतिका अर्थात "अर्बन ट्रॅजेडी'आहे. 


निर्माता-दिग्दर्शक अभिनव देवच्या "ब्लॅकमेल'ने इतस्तत: विखुरलेल्या या अर्बन ट्रॅजेडीलाच प्राधान्याने हात घातला आहे. यात एक मध्यमवर्गीय  नवरा आपल्या बायकोची,-ऑफीसमधल्या मित्राची-बॉसची आणि ज्युनिअर महिला सहकारीची, बायको आपल्या नवऱ्याची आणि शय्यासोबत करणाऱ्या आपल्या मित्राची,  मित्र स्वत:च्या श्रीमंत बायकोची, त्याची श्रीमंत बायको आपल्या नवऱ्याची  एकाचवेळी अनेक पातळ्यांवर फसवणूकही करताहेत आणि एकमेकांना ब्लॅकमेलही. हे सारेच वरकरणी सुखवस्तू आहेत. सोशली कनेक्टेड आहेत. टेक्नोफ्रेंडली आहेत. व्हॉट्स अॅप, फेसबूक, इमेल ही त्यांच्या रोजच्या जगण्यातली संवादाची साधनं आहेत.पण यातला प्रत्येक जण मानसिक-भावनिक आणि शारिरीकसुखाच्या पातळीवर विस्कटलेला आहे. डिप्राइव्हड आहे. भौतिक पातळीवर या सगळ्यांच्या आयुष्यात सगळं काही आहे, म्हणूनही साऱ्यांचं जगण उथळ आणि बीभत्स झालेलं आहे. म्हणजे, मध्यमवर्गीय नवरा झालेल्या इरफान खानचा दिसायला छान संसार सुरु आहे. पण आपली सुंदर बायको सोडून इतर बायकांचे फोटो समोर ठेवून हस्तमैथुनाचा अतिंद्रिय आनंद घेण्याइतपत विकृती त्याच्यात आलेली आहे. त्याची बायको झालेल्या  किर्ती कुल्हारीला लग्नाच्या नवऱ्यात रोजच्या आर्थिक गरजा भागवण्यापुरताच रस आहे. त्या पेक्षा आपल्या निकम्म्या मित्राच्या शरीराचं मात्र तिला अधिक आकर्षण आहे. हा मित्र श्रीमंतीचा माज असलेल्या एका  कॉर्पोरेटरचा घरजावई आहे. या माजोरड्या कॉर्पोरेटरच्या नशेबाज मुलीने आपल्या घरजावई बनलेल्या नवऱ्याला  कुत्र्यासारखं वागवलेलं आहे. इरफान खानचा ऑफीसमधला एक स्त्रीलंपट मित्रही आहे.  बाई  व्हर्जिन आहे की नाही हे दुरूनच ओळखण्यालाच तो आपली खासियत मानतो आहे. बाई गळाला लागली की, तिला पार्ट्यामध्ये, पबमध्ये नेऊन आपला कार्यभाग उरकून घेण्यात त्याला अधिक रस आहे. इरफानचा अतार्किक नि अवास्तव आयडिया डोक्यात असलेला अमेरिकारिटर्न बॉस आहे. त्याला त्याचं प्रॉडक्ट आणि सेल यापलीकडे रस नाही. तेवढ्यासाठीच त्याला इरफान हवा आहे. इच्छा असो नसो रोज या सगळ्यांचं एकमेकांना धडकणं सुरु आहे.चार भिंतींआडचं काहीसं परिचित  जगच त्यातून पुढे येतंय. यातून निखळ नव्हे तर  क्रूर असा विनोद तेवढा निर्माण होतो आहे. कथेच्या प्रारंभाला एक दिवस इरफान आपल्या बायकोला तिच्या निकम्म्या मित्रासोबत बिछान्यात एकत्र पाहतो आणि टिकाव धरून राहण्याच्या एकमेव उद्देशाने  फसवणूक आणि ब्लॅकमेल करण्याच्या कधीही न संपणाऱ्या खेळाला प्रारंभ होतो. यानंतर असलेले सगळेच जण एकमेकांना एकमेकांच्या नकळत ब्लॅकमेल करत राहतात आणि अर्थातच एकमेकांची आयुष्य विस्कटून हा खेळ आटोपतो. 


या खेळात सामील सारेच परिस्थितीवश आहेत, हे खरेच. पण कुणाच्याही मनात अपराधी भाव नाहीत की कुणाच्याही मनाला पश्चातापाचं दु:ख नाही. हे तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या मुख्य म्हणजे मिडिऑक्रिटीचा अर्क असलेल्या  आजच्या समूहांचं  प्रातिनिधक  रुपच आहे. समीक्षक-जाणकारांनी आपापल्या परीने "ब्लॅकमेल'वर टीकाटिप्पणी केलेली आहे. कुणाला ही फार्सिकल कॉमेडी भासतेय. कुणाला यात डार्क कॉमेडीचा वास येतोय. कुणी हा भरकटलेला प्रयोग आहे, म्हणतंय,  कुणी इरफान खानचा जबरदस्त अभिनय बघून खूश आहे. कुणासाठी हा विकतचा डोक्याचा ताप आहे. कुणी अभिनय देवांच्या दिग्दर्शिकीय कौशल्याचीच तब्येतीने चिरफाड करतंय. पण "ब्लॅकमेल' हा फक्त एक खो खो हसायला लावणारा "लफडासदन' प्रकारातला सिनेमा आहे? लेखक-दिग्दर्शकाला आजच्या काळाबाबत, आजच्या सोशल मीडियाफ्रेंडली पण अंतर्बाह्य सैरभैर समाजाबाबत, आजच्या इमोशनलेस नातेसंबंधांबद्दल काहीच म्हणायचं नाही?  हे सगळं वगळून जर कुणाला "ब्लॅकमेल'मध्ये फक्त कॉमेडीच शोधायचीय आणि ती सापडली नाही म्हणून निर्माता-दिग्दर्शकाची अक्कलच काढायचीय,  त्यांना भलामोठा "धन्यवाद' आहे


- दीपांकर
divyamarathirasik@gmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...