आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्वतीच्या सख्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाचं मन रूढी-परंपरांत रुळते. साहजिकच या परंपरांचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम होतो, पुराणकाळापासून आजवर या परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिल्पकलेने, त्यातही मंदिरांवरील शिल्पकलेने केले. त्याच प्रभावाचे हे निरूपण... 


ही प्रसंग असे असतात की, त्यांचे प्रतिसाद किंवा पडसाद आपल्या जीवनावर उमटतात. हेच शिल्पांतून जेव्हा प्रत्ययास येते तेव्हा मौज वाटते. प्राचीनांनी मूर्ती घडवल्या, त्यांची उपासना होऊ लागली. त्या मूर्ती देवादिकांच्या असतात. त्यांचा उद्देश, त्यांच्यापासून व्हावयाचा बोध याकडे भक्तांचे लक्ष गेले तर उत्तमच. किंबहुना, भक्तांकडे लक्ष जावे यासाठीच तर असते, त्यांचे प्रयोजन. पण त्या मनात रुजाव्यात, अगदी आपल्यासारखेच त्यांचे व्यवहार असतात असे वाटावे, म्हणून त्या वेळच्या कलावंतांनी व विचारवंतांनी काही उपाययोजनाही केलेल्या आहेत हे लक्षात घ्यायला हवे. मानवी मनाचा एवढा असा अभ्यास दिसतो, तो विविध प्रसंगांत दिसणाऱ्या मूर्तींतून. 


प्रत्यक्ष पार्वती म्हणजे उमा, हिने शिवाची प्राप्ती व्हावी म्हणून केलेली घोर तपश्चर्या आपणा सगळ्यांना अवगत आहेच. पण शिवाशी विवाह झाल्यानंतरही तिने आणखी एकदा तपश्चर्या केली होती, हे सामान्य भक्ताला साधारणत: माहिती नसते. पती-पत्नीमधील चेष्टामस्करी आपल्याला नवीन नसते, पण ती उमा-महेश्वरातही होती, असे पाहिले की आपल्यासारखेच हे आहेत, असे वाटून त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटायला लागतो.


त्याचे असे झाले : एकदा पार्वतीने म्हणजे, उमाने शिवाला मिठी मारली, तर चेष्टेने शिव म्हणाले, काळ्या नागिणीने चंदनाच्या झाडाला विळखा घालावा, असेच वाटते आहे.


शरीरे मम तन्वंगी सिते भास्यासित द्युति:।
भुजङ्गीवासिता शुद्धा संश्लिष्टा चन्दने तरौ।। (मत्स्यपुराण, १५४.१)        
(येथे गोरी बायको असावी असे वाटणाऱ्यांच्या मनातले भाव पुराणकारांनी टिपले आहेत) तेव्हा पार्वती रुष्ट झाली. शिवाला तिने ‘सुनावले’. एवढ्यावर शिवाने चूप बसावे की नाही? पण तसे झाले नाही. शिव म्हणाले, ‘तू तुझ्या वडिलांसारखी (पर्वतासारखी) कठोर आहेस. उमा चिडली, ‘मी नाही जा’, असे म्हणून ती तपश्चर्येला निघून गेली. असो. शिव-पार्वतीच्या दांपत्य जीवनाबद्दल अशा अनेक कथा सांगता येतील. पण आपल्याला पार्वतीच्या सख्यांबद्दल माहिती करून घ्यायची आहे. शिल्पातून त्या कशा प्रगट होताहेत, ते पाहायचे आहे. तर उल्लेख झालेल्या पार्वतीच्या पहिल्या तपाशी, संबंधित एक आहे, तर दुसरी आहे तिच्या विवाह प्रसंगात दिसणारी. सामान्यत: स्त्रिया एकट्या-दुकट्या सहसा कोठे न जाण्याचा प्रघात आहे. त्यातल्या त्यात शाळेत जाताना, खरेदीला जाताना त्यांच्यासवे दोन-तीन मैत्रिणी असणारच. आणि विशेष म्हणजे, एखादीला सहानुभूतीची किंवा साहाय्याची आवश्यकता असेल, तर मैत्रिणीच्या अवती भोवती त्या असतातच. पार्वती जेव्हा तपस्या करण्यास प्रवृत्त झाली - शिवाच्या प्राप्तीसाठी, तेव्हा तिच्या सोबत जया आणि विजया या तिच्या दोन सख्या होत्या, असा उल्लेख येतो. स्कंदपुराणानुसार त्या वेळी तिच्या सोबतीला १३ सख्या होत्या. पद्मपुराणकर्त्याला ही संख्या कमी वाटली असणार, त्याच्या म्हणण्यानुसार त्या एकूण २५ जणी होत्या. यापैकी जया आणि विजया यांचा उल्लेख वर आलेलाच आहे. यांच्याशिवाय जयंती आणि अपराजिता याही नावाने माहिती आहेत. या पार्वतीच्या सख्ख्या मैत्रिणी होत्या. मात्र तिच्या अगदी जिवाभावाच्या होत्या, त्या म्हणजे सोमप्रभा आणि मालिनी. या सगळ्या समवयस्क असल्यामुळे शिल्पातून कोण कोणती हे ओळखले जाणे अगदी अशक्य. मात्र सोमप्रभा आणि मालिनी यांची गोष्ट वेगळी आहे. त्या ओळखू येतात, ते त्यांनी बजावलेल्या भूमिकामुळे.


वर तपस्विनी पार्वतीचा उल्लेख झालेलाच आहे. त्या वेळी, एक विशेष घटना घडल्याचे पुराणे सांगतात. त्याचे असे झाले - पार्वती घोर तपस्या करत असता, तिची परीक्षा पाहाण्यासाठी स्वत: शिव एका बटूच्या वेशात तेथे अवतरतात. पार्वती पाहतेय तो जवळच्या सरोवरातील मगरीने त्याचा पाय कराल दाढेत पकडलाय आणि तो बटू साहाय्यासाठी आक्रोश करत आहे. तेव्हा सख्यांच्या घोळक्यातून तपश्चर्या व्रत बाजूला ठेवून कनवाळू, दयार्द्र पार्वती त्याच्या साहाय्याला धावून जाते. तिच्या साऱ्या तपस्येचे पुण्य मगरीला अर्पण करण्याची अट ती मानते आणि बटूची सुटका करवते आणि हा बटू शिव स्वत:च असतात. (ब्रह्मपुराण ३५.१७ - ६३) या वेळी पार्वतीच्या निकट असते, ती ही सोमप्रभा. वेरूळ येथील क्र. २१च्या रामेश्वर लेणीत हा प्रसंग तपशिलाने कोरलेला आहे. त्यात सोमप्रभा ही पार्वतीची खास सखी आपणास भेटते, परिचयाची होते.


पार्वतीची दुसरी, अगदी जवळची तिचे सदोदित भलं चिंतणारी, त्यासाठी पुढाकार घेणारी, धडपड करणारी सखी म्हणजे, मालिनी. शिव-पार्वतीच्या विवाहाच्या धांदलीतही ती आपणास भेटते. तिची ओळख तर लगेच पटते. आणि आपण उत्तर भारतातील लग्न सोहळ्यातील नित्यश: घडणारी घटनाच अनुभवतो आहोत, अशी अनुभूती आपणास येते. वामनपुराण (५३.५१_५३) हिची ओळख आपणास करून देते. शिव-पार्वतीचा विवाहात ब्रह्मा पौरोहित्य करत असतो, तर विष्णू-लक्ष्मी कन्यादान करतात. विवाहसोहळा संपन्न होतो आणि तेवढ्यात पार्वतीची सखी मालिनी हिने शिवाच्या डाव्या पायाला विळखा घातलेला असतो. शिवाने तिच्या सखीला म्हणजे, पार्वतीला ‘शिवगोत्रोत्पन्न सौभाग्य’ प्राप्त करून द्यावे अशी तिची मागणी असते. अशी शिल्पे उत्तर भारतात आढळतात. विशेष म्हणजे, अशी परंपरा उत्तर भारतात अजूनही आढळते. तेथे नवऱ्याचे बूट (पायाचे प्रतीक) लपवून ठेवून, त्याच्याकडे काही मागणी करणे, ही ती प्रथा! यथा देहे तथा देवे. समाजात कालानुरूप, प्रांतश: ज्या प्रथा चालू असतात, त्यांचे प्रतिबिंब मूर्तींमध्ये पाहायला मिळत असते.


- डॉ. जी. बी. देगलूरकर
udeglurkar@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...