आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वचन आणि मौखिकता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२३ एप्रिल हा जगभरात ग्रंथदिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने साेलापूरचे पुस्तकप्रेमी नीतीन वैद्य आशय परिवार हा छोटेखानी अंक प्रसिद्ध करत असतात. यंदाच्या अंकात वाचन आणि त्या निमित्ताने आपण करत असलेली मुशाफिरी यांविषयी डाॅ. आनंद जोशी यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ लेखातील हा संपादित अंश. या लिखाणाला संदर्भ आहे तो हर्मन मेलविल यांनी १८५१मध्ये लिहिलेल्या व आजही लोकप्रिय असलेल्या ‘मोबि डिक’ या अभिजात कादंबरीचा.

प न्नास वर्षांपूर्वी वाचत होतो ते निखळ आनंदासाठी. आजही वाचतो आनंदासाठी; पण त्या आनंदाचं रूप बदललं आहे. तेव्हा परा, पश्यंती, मध्यमा वैखरी यांचं भान नव्हतं. आज हे भान प्रकर्षानं जाणवतं. आज काही कविता, ललितकृतीतील काही भाग मी मुद्दाम मोठ्यानं वाचतो. भाषेतील वळणं, कंगोरे, घाट, शब्दांचा ताल ैआणि तोल सगळं कसं ठळकपणे आतपर्यंत पोचतं. कथनकलेतील मौखिकता जाणवते. वाक्याच्या अर्थाइतकी त्याची मोहकता महत्त्वाची. ‘विज्ञानातील Wसमीकरणातही सौंदर्य हवं,’ असं एका वैज्ञानिकानं म्हटलं होतं. ललितकृतीत तर हवंच हवं. मोठ्यानं वाचताना मला ते जाणवतं. ‘मोबि डिक’मधला इशामेल व्हेलिंग बंदरावरील एका खाणावळीत न्याहरीला जातो. एका मोठ्या टेबलावर बरीच मंडळी बसलेली आहेत, त्याचं वर्णन असं ‘दे वेअर ऑल व्हेलमेन; चीफ मेट्स, अँड सेकंड मेट्स, अँड थर्ड मेट्स, अँड सी कारपेंटर्स, अँड सी कूपर्स, अँड सी ब्लॅकस्मिथ्स, अँड हार्पूनिअर्स, अँड शिप कीपर्स; अ ब्राऊन अँड ब्रॉनी कंपनी, विथ बाॅस्की बियर्डस; अॅन अनशॉर्न, शॅगी सेट, ऑल वेअरिंग मंकी जॅकेट्स फॉर मॉर्निंग गाउन्स.’ हे वाक्य मी मोठ्यानं वाचलं तेव्हा त्याच्यातील ताल तर मला जाणवलाच पण व्हेलिंग जहाजावरची ही ‘रफ टफ’ मंडळी डोळ्यांसमोर उभी राहिली. निराळीच अनुभूती होती; ती माझ्यासाठी. वाचन ही वैयक्तिक कला आहे. ती फक्त स्वतःनं स्वतःसाठी विकसित करायची. तुम्हाला जो अनुभव येईल तो दुसऱ्याला येईलच असं नाही.

 

मी माझ्या वाचनात असे ‘लाइट बल्ब’ क्षण अनुभवले आहेत. मी भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू’ वाचत होतो. त्यात एकजण आपलं झोपलेलं नशीब शोधायला जातो असा प्रसंग आहे. गोष्टीत गोष्ट. त्याला अरेबियन नाइट्सचा ‘फ्लेवर’ आहे. हे सगळं मला तो प्रसंग मोठ्यानं वाचताना जाणवलं. मी प्रभावित झालो. माझ्या मित्रालाही हे आवडेल असं वाटून मी त्याला तो प्रसंग मोठ्यानं वाचून दाखवला. पण त्याच्यावर काहीच ठसा उमटला नाही. उलट त्याला ते बेकार वाटलं. माझा पोपट पडला. पण मला कळलं, वाचन ही वैयक्तिक अनुभूती असते. असं जरी असलं तरी...कथनकला ही मूलतः मौखिक होती.

 

पाचपन्नास माणसांसमोर सांगण्यासाठी तिचा उगम दोन माणसांच्या संवादातून आहे. पुढे माणूस लिहू लागला. कथनकला लिखित झाली वगैरे. पण आजही मौखिकतेच्या खुणा लिखित साहित्यात आढळतात. मोबि डिकमध्ये अशा अनेक जागा आहेत. म्हणून तर आजसुद्धा नव्या वर्षाच्या सुरुवातीला लेखक, कलावंत, चित्रकार, न्यू बेडफर्ड येथे लोकांसमोर मोबि डिकचं वाचन करतात. वाचनकला, कथनकला व मौखिकता हा असा तीनपेडी प्रवास आहे. याला नव्या तंत्रज्ञानाची साथ लाभत आहे. ई-पुस्तकं, ऑडिओ, बुक्स, व्हीसीडी वगैरे. हा प्रवास सनातन आहे.


अनेक विश्वे 
या जगात अनेक विश्वे आहेत. म्हणजे कारकुनाचं एक विश्व असतं, डॉक्टरचं एक, शिक्षकाचं एक आणि एकाच्या विश्वाची दुसऱ्याला कल्पना असेलच असं नाही. खलाशांचंही विश्व असतं. मला त्याबाबत कुतूहल. त्याचं असं झालं. लहानपणी मी रत्नागिरीला बोटीनं जायचो. बोट भाऊच्या धक्क्यावरून सुटायची. धक्क्यावर पोचलं की सागरी गंध यायचा. या गंधात माशांचा, डिझेलच्या धुराचा, माणसांच्या घामाचा असे अनेक गंध मिसळलेले असायचे. अप्पर डेकवर प्रवासी पथाऱ्या टाकायचे. बोटीवर निळ्या डगल्यातले इकडून तिकडे धावपळ करीत. बोट सुटायची. मी कठड्याजवळ उभा राहून पाण्याकडे बघायचो. सुरुवातीला निळंशार दिसणारं पाणी दिवस मावळल्यानंतर काळंनिळं व्हायचं. त्याची खोली जाणवायची. माझ्या छोट्याशा छातीत कसं धस्सं व्हायचं. मध्यरात्रीनंतर केव्हातरी बोट रत्नागिरी बंदरात शिरायची. बोटीतून पडावात बसायचं. काळोखात डुबूक बुळुक असे आवाज. पाण्याच्या जिभा चहूबाजूंनी पडावाला चाटायच्या. पडाव हलत डुलत जेटीवर पोचायचा. या सगळ्याचा प्रभाव मनात खोलवर कुठेतरी होता. पुढे केव्हातरी अनंत काणेकरांचं ‘आला खुषीत समिंदर’ हे भावगीत ऐकलं व वाचलंही. गीत गोड आणि लडिवाळ. ‘त्या’ वयात आवडलं पण आतपर्यंत पोचलं नाही कारण सागरी विश्वाबद्दल भीतियुक्त जे कुतूहल होतं, ते दर्शन त्यात नव्हतं. त्या विश्वाचं दर्शन मला मोबि डिकमध्ये झालं. काॅनरॅडच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये झालं. नॅनटुकेट या बंदराचं वर्णन मेलविल करतो. येथील नॅनटुकेटियर्स म्हणजे जणू सिंधूचे तपस्वी, ते रत्नाकराच्या वारुळातून बाहेर पडले आणि म्हणता म्हणता त्यांनी धरतीवरील कितीतरी उदधी पार केले. कारण जलनिधी हेच त्यांचं घर, हेच त्यांचं जग, हेच त्यांचं साम्राज्य. 


फुरसतीचं महत्त्व 
वाचनाचं असं असतं बघा. म्हणजे मेलविलनं व्हेलिंग बोटीबद्दल लिहून ठेवलं दीडशे वर्षांपूर्वी, ते मी आज वाचलं. हजारो मैल दूर असलेल्या मुंबईत बसून मी माझ्यासाठी, माझ्या परीनं त्या लेखनाचा अन्वयार्थ लावला. हा काय प्रकार आहे मी विचार करू लागलो. मेलविलनं निर्मिती केली, त्यानं लिहून ठेवलं, त्याला निर्मितीचा आनंद मिळाला. शब्दस्मृती मागे ठेवून त्याने या ग्रहगोलावरचा प्रवास संपवला. त्याच्या शब्दांचा प्रवास मात्र चालूच राहिला. या भूगोलावरच्या वास्तव्यात माणूस बौद्धिक आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मी वाचनानं मिळवला, इतर कोणी अन्य मार्गानं मिळवतील. म्हणजे संगीत, चित्रकला वगैरे. हे जे मी सांगितलं ते सुजाण माणसांना माहीत आहे. असं वाचन वगैरे करायला मला फुरसत मिळाली. सबंध मानवजातीलाच हल्ली रिकामा वेळ मिळू लागला आहे. हल्ली म्हणजे केव्हा?आपण होमो सापियन्स.

 

सापियन्स म्हणजे ‘वाइज मॅन’. आपल्या वास्तव्याला म्हणजे मानवजातीच्या, दोन लाख वर्षे झाली. यातील बहुतांश काळ माणूस शिकारी, गोळा करणारा होता. म्हणजे शिकार करायची, फळं, कंदमुळं गोळा करायची, टोळ्यांनी राहायचं. फुरसत, रिकामपणा कमी असायचा. दगडधोंड्यांची हत्यारं करायला माणूस शिकला. हस्तकौशल्याबरोबर बुद्धिकौशल्य विकसित होऊ लागलं. तो बोलायला केव्हा शिकला, त्याची भाषाक्षमता केव्हा व कशी विकसित झाली हे अजून नक्की समजलेलं नाही. पण हे सगळं व्हायला लाखो वर्षे लागली. तोपर्यंत बिचाऱ्याला उसंत नव्हतीच. ओबडधोबड डोक्याचा आणि जबड्याचा दणकट हंटर गॅदरर आणि आजचा होमो सापियन्स, सापियन्स यांच्या शरीरयष्टीत बराच फरक आहे. हंटर गॅदररच्या तुलनेत आजच्या माणसाचा आकार सुमारे दहा टक्क्यानं कमी झाला आहे. हे सगळं घडलं गेल्या दहा हजार वर्षांत म्हणजे मानव शेती करायला लागल्यापासून. कच्ची कंदमुळं, फळं आणि कच्चं मांस खायला तगडा जबडा लागायचा. अन्न शिजवून खायला लागल्यानंतर अशा जबड्याची गरज लागेनाशी झाली. हळूहळू जबडा लहान झाला. त्याच्या बरोबर डोक्याचा आकार लहान झाला. केंब्रिज विद्यापीठात मानवी उत्क्रांतीच्या विषयाचे प्राध्यापक व संशोधक आहेत. त्यांनी आफ्रिका, युरोप, आशिया येथे जाऊन मानवी जीवाष्मांचा म्हणजे हाडे, सांगाडे, कवट्या यांचा शोधाभ्यास केला. तो शोधनिबंध त्यांनी लंडन येथील जगन्मान्य रॉयल सोसायटीच्या विद्वत् सभेत सादर केला. वर दिलेली माहिती ही त्या निबंधातून सुलभ करून दिली आहे. आजच्या परिस्थिती-पर्यावरणात सर्व प्राणिमात्रांत माणूस हुशार ठरला. तो ‘शहाणा’ आहे की नाही हे मात्र अजून ठरायचं आहे. पृथ्वीवरच्या कोणत्याही प्रजातीत असं घडलेलं नाही. सवड मिळाल्यामुळे आवड निर्माण झाली, नवीन ज्ञान मिळवण्याची. माणसानं बुद्धिकौशल्यानं जे तंत्रज्ञान विकसित केलं त्यामुळे त्याला मोकळीक मिळू लागली. अंगमेहनतीची कामं कमी झाली. खाणंपिणं, मैथुन याच्या पलीकडे बुद्धीला मिळणारं उद्दीपन ही त्याची मूलभूत गरज झाली. यातून बौद्धिक आनंदाची विविध कलांची व ज्ञानशाखांची निर्मिती आहे. मिळालेल्या ज्ञानानं माणसानं स्वतःची आयुर्मर्यादा वाढवली. ‘भूगोला’वरच्या इतर कोणत्याही प्राण्याची आर्युमर्यादा वाढलेली नाही. मिळालेल्या या वाढीव आयुष्याचा उपयोग त्यानं तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी केला. अर्थात याला हजारो वर्षं लागली हे लक्षात घेतलं पाहिजे. कालाचा हा पट डोळ्यांसमोर आला. कालाचं भान झालं. एक क्षणभर मी थक्क झालो. या कालातील आपण एक बिंदू असं जाणवल्यानं काही तरी विलक्षण वाटलं. ‘लीजर’ म्हणजे कामधंदा झाल्यानंतर मिळणारं रिकामपण. समाजशात्र, अर्थशात्र, मेंदूविज्ञान अशा विविध अंगाने लीजरबाबत संशोधन झालेलं आहे व चालू आहे. मानवी उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून फुरसतीचं महत्त्व काय यावर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. (एव्होलुशनरी सिग्निफिकन्स ऑफ लीजर) हे जे मी पूर्वी वाचलं होतं ते आज पुन्हा आठवलं. वाचनानं विचारसाखळी अशी गुंफत गेली. अक्षरं पावत गेली.फुरसतीचं महत्त्व कळण्यासाठी गेल्या शंभर-दोनशे वर्षांतली काही उदाहरणं पाहू. १८७४ साली ब्रिटनमध्ये कामाचे तास नियंत्रित करणारा कायदा झाला. आठवड्यात ५६ तासच काम असं निश्चित झालं. उरलेला अवकाश स्वतःसाठी, कुटुंबासाठी. ब्रिटनमध्ये १९०५ साली ५,००० लोक फुटबॉलची मॅच बघायला जात. १९१३ साली ही संख्या २३,०००वर गेली. ब्रिटनमध्ये विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात दरवर्षी २,८०० नवीन पुस्तकं प्रकाशित होत आज ती संख्या कितीतरी पटीनं वाढली आहे. जगभरात जवळपास असंच घडत होतं. लीजर ही आज एक ‘इंडस्ट्री’ झाली आहे. त्यामुळे अनेक कलांना वाव मिळाला. बौद्धिक आनंदाचे अनेक मार्ग खुले झाले. लेखन, वाचन हा त्यातील एक. माझं मोबि डिकचं वाचन चालू होतं. वाचताना असे विचारांचे धुमारे फुटत होते, ते नमूद करून ठेवले. कालाचं भान देणारी अशी फुरसतीची उत्क्रांती माझ्यापुढे विकसित झाली.

(संपूर्ण अंक हवा असल्यास नीतीन वैद्य यांच्याकडून त्याची पीडीएफ फाइल ईमेलवर मागवता येईल. त्यांचा मेल आयडी vaidyaneeteen@gmail.com आहे.)

 


drjoshianand628@gmail.com

बातम्या आणखी आहेत...