आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोटात बांबस्फोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला नक्की काय त्रास होतोय हे डॉक्टरांना सांगता येणं ही एक कलाच आहे. त्यामुळे रुग्णाच्या कथनानुसार त्याच्या तब्येतीचं निदान ही डॉक्टरांची परीक्षाच ठरते. ग्रामीण भागातल्या एका आजोबांचा असाच पोट धरून हसू आणणारा एक अनुभव.

 

काही काही पेशंट्सची लक्षणं ऐकूनच डोकं गरगरायला लागतं.वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली हे काय असतं हे मला आजतागायत कळलेलं नाही. जेव्हा अशा अगम्य भाषेत पेशंट्स बोलतात तेव्हा मेंदूला सरस्वतीदेवीची घोर आराधना करावी लागते आणि बरेचसे बोलीभाषेतले पर्यायी शब्द आठवून, ते वापरून नेमकी लक्षणे काय असावीत, हे कौशल्याने काढून घ्यावं लागतं.


त्यांना बोलतं करून नेमका काय त्रास आहे हे काढून घेणं म्हणजे कौशल्याचं काम असतं. खूप वर्षं सरावाने ते जमूही लागतं. अशी नेमकी केसची माहिती मिळाली की निम्मी लढाई जिंकलीच समजा. पण काही काही वेळा पेशंट्सच्या लक्षणं सांगण्याच्या पद्धती ऐकून हसता हसता पुरेवाट होते. त्यातलाच हा एक प्रसंग.


एकदा एक आजोबा पोटाला हात लावत सकाळीच क्लिनिकला आले.
‘काय झालं बाबा?’
‘आता कसं सांगू बाई. तू बाईमानूस, घाबरून जाशील.’
‘अहो बाबा! आम्हा डॉक्टरांचं कामच आहे ते. मी तुमच्या मुलीसारखी आहे. काय प्रॉब्लेम असेल तो बिंधास्त सांगा.’
‘आता कोंत्या भाशेत सांगू? अयायायाया!’


आजोबा सरकीतून कापूस काढण्याच्या स्पीडमध्ये. माझ्या प्रश्नांचा अॅक्सलरेटर तिथे ढिम्म काम करेना. शेवटी बरेचसे प्रश्न विचारूनही मला उपचाराला आवश्यक अशी अपेक्षित उत्तरं येईनात तेव्हा मी अक्षरशः संतपदाला पोहोचायच्या बेतात होते (श्रद्धा आणि सबुरी वगैरे). मग मी शेवटचा प्रयत्न केला.


‘बाबा, जेवढं पटकन तुम्ही सांगाल तेवढं पटकन तुम्हाला आराम पडेल. सांगा बरं.’
सब्र का मीठा (?) फल मिळायला सुरुवात झाली. कण्हत कण्हतच आजोबा म्हणाले, ‘गावात सप्ता बसला व्हता. आठ दिस नेमानं जात व्हतो. काल हाटेलवाला शंकर भेटला. त्याची न माझी लय दोस्ती. पाsssर लंगोटबी घालत नवतो तवापासुनची.’
‘अच्छा! वा! वा! बरं मग?’


‘त्येची आन् माझी लागली व्हती पैज, कोन जास्त वडापाव खातो म्हनुन. आता वडापाव म्हनल्यावर मिरचीबी आलीच.
मंग काय. चांगले पाच वडापाव हानले. ते येक झालं आन् संध्याकाळी काल्याचं कीर्तन व्हतं. तिथंबी आमटीभाकरी हानली. तस्सं आपल्याला येकदा खाल्ल्यावर सोनं दिलं तरी नको. पन् काल शंकऱ्या ऐकायलाच तयार नाय, च्या×××ला त्येच्या. अयायायाया! तसं पोटात गुरगुर व्हतंच रहाती. शरीरधर्म हाये तो, देवाघरचा पावा. वाजला तरी कोनाला बोलनार? नाय का?’
(इथं मी महत्प्रयासाने हसू लपवलेलं आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.)


‘हो हो हो! खरंय.’
‘तर काय सांगत होतो बाई! आज नेमीप्रमानं रामपहारी उठलो. सकाळी झाड्याला (शौचाला) गेलो आन पाहातो तं क्काय! सगळं लालभडक रगात! पोटात बांबस्फोट झाला ना माज्या!’ 
आणि हे ऐकून माझी हसता हसता पुरेवाट झाली हे सांगणे न लगे.

 


shelarkshama88@gmail.com

बातम्या आणखी आहेत...