आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबटायटलिंग करताना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमराठी चित्रपट आपल्यापर्यंत पोचतात ते सबटायटल्समुळे, ते लिहिणाऱ्या  अनुवादकामुळे. तसंच मराठी, हिंदी चित्रपटांचा आनंद जर्मन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात लेखिकेचा मोठा वाटा अाहे.


चित्रपट हा आपल्या भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यात हिंदी चित्रपट म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता विषय, अगदी सॉफ्ट कॉर्नर म्हणण्याइतका. या चित्रपटांचा एक छोटासा भाग आपण होणे किंवा तो दूरदूरच्या देशातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मधला एक पूल बनणे, त्यात एक महत्त्वाची भूमिका निभावणे कोणाला आवडणार नाही? साधारण पंधरासोळा वर्षांपूर्वी हिंदी सिनेमाने सातासमुद्रापार झेप घेतली. विविध परकीय भाषांमध्ये सबटायटल्स भाषांतरित करण्यासाठी भारतात तेव्हापासून मागणी सुरू झाली. सिनेमांचे सबटायटल्स जर्मनमध्ये भाषांतरित करण्याचे काम सर्वात पहिल्यांदा माझी सहकारी पल्लवीकडे आले. त्या काळात काही तांत्रिक भाषांतरं केली होती, त्यामुळे थोडाफार अनुभव गाठीशी होता. त्या जोरावर तिने हे काम हाती घेतले. कामाचा पसारा भरपूर होता म्हणुन मग मीही तिच्या बरोबर अधूनमधून हे काम करू लागले. भाषेच्या क्षेत्रात अनेक वर्षं काम केल्यावर आम्हाला काहीतरी वेगळं करायला मिळालं होत. त्यात काम सिनेमाचं, म्हणजे तर सोन्याहून पिवळं!  सबटायटल भाषांतरित करणे म्हणजे संपूर्ण चित्रपट पाहून ते भाषांतरित करणे नव्हे तर त्यातले फक्त संवाद भाषांतरित करणे. आमच्याकडे पूर्ण चित्रपट येत नाही, स्क्रिप्ट तर नाहीच नाही (त्यात रिस्कही आहे!) फक्त संवाद येतात, तेदेखील हिंदीमधून इंग्रजीत भाषांतरित झालेले. म्हणजे चित्रपटामध्ये जे जे बोलले जाते, त्या सर्वाचे भाषांतर करावे लागते, अगदी गाण्यांसकट! इथे शब्दनिवडीला स्वातंत्र्य असतं, पण तेही एका मर्यादेपर्यंतैच. उदाहरणार्थ ‘तेरे ईशकदा चोला पहन के मैं तुझ में ही रंग जाऊंगी’ (सीक्रेट सुपरस्टार) याचं इंग्रजी ‘I will wear the blouse of your love and will colour myself in your colour’ चं जर्मनमध्ये भाषांतर करावं लागतं. आता मुळात असं आहे की, हे इंग्रजी भाषांतर आधी योग्य असावं लागतं, तरच पुढची जर्मनमधली वाक्यं चांगली होऊ शकतात. मूळ लिखाण हिंदी असेल तर पहिला अनुवादक (Translator 1)इंग्रजी भाषांतर करणारा असतो आणि आम्ही असतो दुसरे अनुवादक (Translator 2). आता हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्याने व हिंदी चित्रपटांचा थोडाफार अनुभव गाठीशी असल्याने साधारण हिंदीमध्ये काय म्हणले गेले असेल याचा अंदाज आम्हाला इंग्रजी वाक्यांवरून येतो. पण तरीही अनेकदा अडचणी येतात. 


सबटायटल्सचे भाषांतर करताना काही बाबी विशेष लक्षात घ्याव्या लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्या गेलेल्या जागेतच आहे तो संवाद बसवावा लागतो. उदाहरणार्थ इंगजी संवाद जर दोन वाक्यांचा असेल तर जर्मनमध्येही तो साधारण तेवढ्याच लांबीचा आणि दोन वाक्यांचाच असावा लागतो. फार पाल्हाळ लावून चालत नाही. त्याची चार वाक्यं होऊन चालत नाहीत किंवा एक होऊनही चालत नाही, कारण प्रेक्षकांना ते वाक्य स्क्रीनवर जेमतेम काही सेकंदांत वाचता येईल हे पाहावं लागतं. 


एकच संवाद जर तीन वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये तोडून आला असेल तर तो तसाच भाषांतरित करावा लागतो. व्याकरणाशी फार जुळवून घेता येत नाही. हिंदीमधली वाक्यरचना वेगळी, त्याचं इंग्रजी भाषांतर होतानाची रचना वेगळी आणि पुढे त्याचं जर्मनमध्ये भाषांतर होतानाची रचना अाणखी वेगळी. त्यामुळे भाषांतर करताना बऱ्याचदा मूळ हिंदीमधला संवाद कसा असेल याचा विचार करावा लागतो. तांत्रिक भाषांतर करताना मूळ लेखनाशी प्रचंड एकनिष्ठ राहावे लागते. सिनेमाच्या बाबतीत थोडेफार स्वातंत्र्य घेऊ शकतो. 


सुरुवातीच्या काळात आधी प्रदर्शित झालेले चित्रपट सबटायटलिंगसाठी यायचे, तेव्हा निदान तो चित्रपट आधी बघून मग भाषांतर करू शकायचो. याची थोडीफार मदत होऊ शकते. पण तरीसुद्धा काही वेळा नेमकं भाषांतर नाहीच मिळत. काही सिनेमांचे संवाद अजिबातच आव्हानात्मक नसतात ( उदा. क्रिश, ढिशूम) तर कधी कधी एकेका शब्दाकरता बरीच डोकेफोड करावी लागते. उदाहरणार्थ ‘जाने भी दो यारो’ मधल्या शेवटच्या महाभारताच्या दृश्याचे भाषांतर करायला अतिशय अवघड गेले. तेच ‘सूरज का सातवा घोडा’ मधील काही संवादांचे भाषांतर करायला विशेष मजा आली. इंग्रजीमधला एक अगदी सोपा शब्द घेऊ ‘Yes Sir!’ अय्यारीमधे हा बऱ्याच वेळा आलेला आहे. याचं जर्मन भाषांतर करताना Jawohl Meister असं करता येईल पण संवाद सैन्यातल्या लोकांचा आहे हे लक्षात घेऊन मगच त्याचे योग्य भाषांतर करावे लागते. Jai Hind चेही तेच. ‘Heil Indien’ केले तर परत जर्मनमध्ये Heil हा शब्द हिटलरशी जोडला जातो. त्यापेक्षा ते Jai hind च ठेवलेले बरे असा विचार आम्ही करतो.


आधी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे येणारं स्क्रिप्ट इंग्रजीमध्ये येतं आणि मग त्या इंग्रजी भाषांतरावर आधारित जर्मन भाषांतर करावं लागत. कधीकधी मूळ भाषेतून इंग्रजीत केलेले भाषांतर फसलेलं असतं, त्यामुळे परत त्याचं जर्मनमध्ये भाषांतर करताना मूळ अर्थ हरवला जाऊ शकतो. उदा. सीक्रेट सुपरस्टारमधलं गाणं -


‘चोरी से चोरी से, छुपछुपके मैने,
तिनका तिनका चुनके सपना एक बनाया’
या ओळी आमच्याकडे येताना इंग्रजीत अशा आल्या, 


‘Secretly, quietly and with care patiently
I picked a twig here and a straw there and built myself a dream.’ 


सुदैवाने तेव्हा यूट्यूबवर हे गाणं आधीच आल्यामुळे आम्हाला त्याचं साजेसं भाषांतर करता आलं. 
गाण्यांचं भाषांतर करताना एकूणच भरपूर हसू येतं, कारण ते एका परकीय भाषेत वाचताना वेगळंच काहीतरी वाटत असतं. 


प्रत्येक भाषेचे स्वतःचे नियम, स्वतःची वाक्यरचना, स्वतःचं सौंदर्य, लहेजा आणि त्रुटी आहेत हे कायम लक्षात ठेवावं लागतं. सबटायटलिंग करताना अाणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे खूप जड किंवा पुस्तकी भाषा वापरून चालत नाही. सगळे संवाद बोलीभाषेतील असल्याने सोप्या किंवा रोजच्या वापरातील भाषा वापरावी लागते. एक उदाहरण. पॅडमॅनमध्ये एक वाक्य आहे, “I am on my periods.” बऱ्याचदा मुली चारचौघात पाळीबद्दल बोलताना, “आज माझी मावशी आली आहे” किंवा “आज माझा happy birthday आहे” अशी सांकेतिक भाषा बोलतात. विशेष म्हणजे जर्मनमध्येसुद्धा “Meine Tante ist gekommen” असंच म्हणतात. त्यामुळे हे भाषांतर तिथे अगदी चपखल बसलं.


सगळ्यात अवघड असतं संबोधन. हिंदीमध्ये (आप आणि तुम) आणि जर्मनमध्ये (Sie) अशी आदरार्थी सर्वनामे आहेत. इंग्रजीमध्ये याचा पूर्ण अभाव आहे. सगळ्याला You हेच सर्वनाम वापरले जाते. त्यामुळे “You played very well today.” (एमएस धोनी) हे धोनीला नक्की कोण म्हणतंय हे लक्षात घेऊन मगच ते Sie (आप) किंवा du (तू/तुम) मध्ये लिहावे लागते. सीक्रेट सुपरस्टारमधली आई नवऱ्याशी बोलते तेव्हा “आप” म्हणेल पण नवरा तिला अगंतुगं करेल. कधीकधी नुसत्या संवादावरून प्रसंगाचा अंदाज लागत नाही. ही आमची सर्वात मोठी अडचण असते. त्यामुळे प्रसंग समजून घेऊन मगच भाषांतर करावे लागते.


प्रत्येक देशाच्या संस्कृतीचे तिथल्या भाषेवर संस्कार झालेले असतात. त्यामुळे एका भाषेत प्रचलित असलेले शब्द दुसऱ्या भाषेत असतीलच असे नाही. या दृष्टीने आम्हाला सर्वात अवघड गेला तो एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी भाषांतरित करायला. जर्मनीमध्ये फुटबॉलला देव मानत असल्याने, क्रिकेटला भारत आणि इंग्लंडमध्ये जेवढे आहे तितके महत्त्व नाही. त्यामुळे क्रिकेटशी संबंधित अनेक गोष्टींचे भाषांतर करायला आम्हाला बराच रिसर्च करावा लागला. तसेच हिंदीमध्ये “और ये लगा छक्का! किंवा इंग्रजीमध्ये “And its a sixer! या वाक्यांना जे भावनिक महत्त्व आहे ते जर्मनमध्ये “Und das ist ein Sechs”! या वाक्यात प्रतित होत नाही पण तसे भाषांतर करावे लागते.


या कामाला भरपूर ग्लॅमर असेल असाही बऱ्याच जणांचा अंदाज असतो. तर असं काही नसतं. आम्ही घरी बसून गपगुमान काम पूर्ण करून पाठवतो. कामाची डेडलाइनही अत्यंत तोकडी असते, म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चार दिवस वगैरे. त्यामुळे शब्दशः दिवसरात्र काम करून ते संपवावं लागत. ते पुढे एका जर्मन तज्ज्ञाकडून तपासलं जात आणि मग आमचा संबंध संपतो. ना कुठल्या महोत्सवाचं बोलावणं येतं, ना कुठल्या फिल्मी पार्टीला बोलावलं जातं ना क्रेडिट्समध्ये आमचं कुठे नाव येतं! मानधनाविषयी बोलायचं तर अगदीच नावापुरतं असतं, कारण या क्षेत्रात जबरदस्त स्पर्धा आहे.


आज अनेक वर्षं आम्ही हे काम करतो आहोत. अडचणी तर येतातच. तरीसुद्धा प्रत्येक सिनेमाचे काम करताना आमची स्वतःची भाषा समृद्ध होत जाते आहे आणि यातून जे आत्मिक समाधान मिळतं त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. अर्थात एखादवेळी मानधनाऐवजी अक्षयकुमार किंवा आमीर खानबरोबर नुसती एक कॉफी डेट जरी मिळाली तरी आम्हाला ती अगदी चालेल असा विचार मनात कधीतरी चमकून गेल्याशिवाय राहात नाही हे ही तितकंच खरं!


(पल्लवी गोरे आणि गौरी ब्रह्मे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जर्मन विभागात शिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत भाषांतरित केलेले काही चित्रपट : जाने भी दो यारो, सूरज का सातवा घोडा, अशोका, प्रेम रतन धन पायो, इ.)

 

-  गौरी ब्रह्मे, पुणे
gaurirbrahme@gmail.com

बातम्या आणखी आहेत...