आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डोंबारी-कोल्हाटी समाजात जन्मलेल्या-वाढलेल्या शैला यादवला शिक्षणाच्या वाटेवर दूरवर दिसणारा मुक्तीचा प्रकाश सतत खुणावत राहिला आहे. शैलाने उभ्या केलेल्या मुलांच्या शिक्षणाच्या, रोजगाराच्या किंवा समाज परिवर्तनाच्या प्रत्येक कामामागे शिक्षणाने दिलेली प्रेरणा आजही कायम आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ला असलेल्या परिवर्तनशील मंडळींचा शोधाच्या वाटेवरचा हा महत्वाचा टप्पा आहे...
जन्मत: पायाशी घट्ट बांधून आलेला भटका उपेक्षितपणा दूर सारून डोंबारी कोल्हाटी समाजातील शैला यादव हिने शिक्षणाची वाट धरली. रस्तो न् रस्ते भटकतच राहायचे असेल तर विद्येच्या वाटेवरच का भटकू नये? असा बोचरा सवाल तिने एका क्षणी आपल्या समाजापुढे ठेवला. त्याचे उत्तर समाजाकडून काही मिळाले नाही, तरी तिने शिक्षणाची कास सोडली नाही. ती शिकू लागली. तिची समज वाढत गेली. तिच्या लक्षात आले, की ‘आपला समाज तर कोसो दूर आहे अजून! तो ना कोठल्या शाळेच्या पटात, ना कोठल्या राजकीय अजेंड्यात! समाजाच्या हातात मोबाइल आणि घरात टीव्ही आला असेल, लोकांनी गावोगाव फिरायचे सोडून एकाएका ठिकाणी मुक्काम टाकला असेल, पण आहे काय त्यांच्याकडे?’ हे वास्तव शैलाला अस्वस्थ करून गेले. तिने समाजातील येणाऱ्या पिढ्यांच्या शिक्षणांसाठी झटायचे ठरवले. शिक्षणाची वाट दाखवण्याआधी समाजाचे प्रबोधन होणे महत्वाचे होते. त्यासाठी अवघ्या अठ्ठावीस वर्षें वयाच्या शैलाने ‘समावेशक सामाजिक संस्था’ सुरू केली.
आता शैला संस्थेच्या माध्यमातून बचत गटांची निर्मिती, रोजगार मार्गदर्शन, हुंड्याचा नायनाट असे विविध उपक्रम राबवते आहे. पुढे जाऊन कामाची दिशा पक्की व्हावी म्हणून एक महत्त्वाचे पाऊलही तिने उचलले आहे. त्यासाठी ती सध्या दुष्काळी भागातील भटक्या विमुक्त महिलांचा सामाजिक, राजकीय, आर्थिक व आरोग्याचा स्तर या विषयावर क्षेत्रीय पाहणी करत आहे. एरवी, भटक्या विमुक्त मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षण घेताना फार अडचणी येतात. एकतर भाषा अपरिचित असते आणि दुसरे म्हणजे, गावाकुसाबाहेर राहणारी मुले म्हणून त्यांची हेटाळणी होते. त्यामुळेही मुले मागे पडतात. या स्वअनुभवातून आलेल्या अडचणी ओळखून तिने तिच्या खटाव तालुक्यातील औंध, खटाव, मायनी, दिसकळ, पुसेसावळी, गुरसळे येथे महात्मा फुले अभ्यासवर्ग सुरू केले आहेत.
शैलाचे कुटुंब सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या औंध गावातील डोंबारी माळ वस्तीत वास्तव्याला आहे. वस्तीत डोंबारी, कोल्हाटी, पारधी, कैकाडी अशा वेगवेगळ्या भटक्या विमुक्तांचा राबता आहे. शैलाच्या कुटुंबात आई-वडील, दोन भाऊ आणि दोन बहिणी. आई धुण्याभांड्यांचे काम करी. वडील बैलांच्या शिंगांना धार लावून दे, रवी-लाटणे-ढोलकी बनव, अशी कामे करत. शैलाचे शिक्षण तशा भवतालात झाले. तिला शिक्षण टिकवण्यासाठी पाचव्या इयत्तेपासून एका पार्टीसोबत गाणे म्हणण्यासाठी जावे लागे. शैला सांगते, आमच्या समाजात तमाशात नाचणेगाणे हे ‘कॉमन’. पण ती परंपरा आमच्या घरात नव्हती. आईला वाटायचे, की तिच्या मुलांनी शिकावे. मात्र, मोठ्या भावंडांना शिकण्याची आवड नव्हती. मला मात्र शाळेत जावे वाटायचे. म्हणजे, अभ्यास आवडत होता अशातील भाग नाही. पण शाळा बरी वाटायची. आमच्या वस्तीतील आम्ही पोरी परिसरातील कन्या शाळेत जायचो. तेथे सधन घरातील मुली यायच्या. त्यांचे वागणे, बोलणे आवडायचे. म्हणूनही शाळेत जात होते. पण आमच्या वस्तीत शिक्षणाच्या बाबत सगळीच अनास्था. शिक्षकही आमच्याकडे लक्ष द्यायचे नाहीत. मग आमच्या परिसरात संभाजीराजे देशमुख आश्रमशाळा सुरू झाली. ती भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी होती. आईने मला त्या शाळेत घातले. तेथे सगळीच मुले आमची भाषा बोलणारी होती. मुले कमी असल्याने शिक्षकांचेही आमच्याकडे लक्ष वाढले आणि मुळात आवडणारी शाळा अधिक आवडू लागली.
त्याच सुमारास आणखी एक गोष्ट घडली. शैलाच्या पाचवीच्या सुट्टया सुरू असताना, त्यांच्या वस्तीवर एक जोडपे पार्टीत गाणे म्हणण्यासाठी एक मुलगी हवी होती. म्हणून आले होते. शैला चुणचुणीत. तिचा आवाजही चांगला. त्यांनी तिला सोबत घेतले. आई-वडिलांना ते नको वाटत होते, पण पैसे मिळू लागले. हातभार होऊ लागल्यावर वडिलांनी पार्टी चांगली आहे का, याची खात्री करून घेतली फक्त. पार्टी चांगली सुशिक्षित होती. त्या कुटुंबातील मुले-मुलीही शिकत होती. त्यामुळे त्यांनी शैलाच्या शिक्षणास आडकाठी आणली नाही आणि तिचे शिक्षण सुरू राहिले. ‘मला काही कळत नव्हते. रसही नव्हता. पण हळुहळू, मी त्यांच्या घरातील वातावरणात मिसळून गेले. शाळेच्या सुट्ट्यांत, तर त्यांच्याकडे राहायलाच जायची. इतर वेळी ये-जा करायची. त्या भल्या माणसांनी शाळेनंतर कॉलेजही सोडू दिले नाही. वस्तीतील लोक नावे ठेवत. ‘कशाला पाठवता लोक गैरफायदा घेतील’. असे खूप बोलत. मला वाईट वाटे. एके दिवशी त्या कुटुंबातील ताई म्हणाल्या, ‘फडावर, तमाशातील बायकांचे हाल बघतेस ना. कोणी कमरेत चिमटे काढते. कोणी हात धरते. कोणी अंगाला हात लावते. त्यापेक्षा या शिव्या कितीतरी सुसह्य आहेत’. ती गोष्ट माझ्या डोक्यात फिट बसली. मला त्या पेचात अडकायचे नव्हतेच. मग शिकण्याचे मनावर घेतले. त्यातच ग्रॅज्युएट झाले.
गुण ६२ टक्के मिळाले. बी.एड. करायचे होते. तसा फॉर्मही भरला. पण आमच्याकडे कोठे आली कागदपत्रे? मला शाळेत घालण्यासाठीच आईच्या घरमालकिणीने कसाबसा दाखला बनवून दिला होता. तेवढाच एक कागद. जातीचा दाखलाही नव्हता. गाडी तेथे अडली. मित्रांमध्ये चर्चा करताना कोणीतरी सांगितले, की एमएसडब्ल्यू केल्यावर लगेच नोकरी लागते. मला नोकरीची गरज होती. मी साताऱ्याच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
‘मास्टर इन सोशल वर्क’ शिकेपर्यंत शैलाला समाजातील प्रश्न, जातिभेद, समतावाद, वैचारिक भूमिका, चळवळी हे काहीच माहीत नव्हते. इंग्रजीतून सुरू झालेले शिक्षण तर तिला डोक्यावरून जात होते. शिवाय, ‘ती डोंबारी कोल्हाटी आहे, पार्टीत गाणे म्हणायची’ ही गोष्ट कॉलेजमध्ये पसरली. त्यावरून कुजके बोलणे सुरू झाले. तिला शिक्षण सोडून द्यावेसे वाटू लागले. परंतु, तेथील शिक्षकांनी तिला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. भाषेचा अडसर संपला. विषय समजू लागले, तेव्हा तिला पहिल्यांदा जाणवले, की तिचा समाज तर या ज्ञानापासून किती कोसो दूर आहे! तो वास्तवात गावकुसाच्या-शहरांच्या परिघावर आहे हे खरे, पण तो आचारविचारानेही परिघावरच आहे! त्यांच्यात न्याय-अन्याय, भलेबुरे इतके समजण्याचीही समज विकसित झालेली नाही. त्यांना मजुरी नाहीतर कला सादर करण्यापलीकडे विश्वच नाही! ती अस्वस्थ झाली आणि त्यातूनच तिने ‘समावेशक’ ही संस्था एमएसडब्ल्यूच्या (मास्टर इन सोशल वर्क) दुसऱ्या वर्गात असताना समविचारी मित्र-मैत्रिणींसोबत सुरू केली. ती महिलांचे मेळावे घेणे, बचत गट निर्माण करणे, शिक्षणाविषयी प्रबोधन, व्यावसायिक प्रशिक्षण असे एकमागून एक उपक्रम घेऊ लागली.
शैलाने ‘निर्माण’ या संस्थेसोबत पुण्यात तीन वर्षे काम केले. ती संस्था भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर काम करते. तेथे तिच्या जाणिवा विस्तारल्या. त्या वेळी राहत्या वस्तीत कामही सुरू होते. मग सातत्याने प्रयत्न करून बचत गट तयार केले. हुंड्यासारख्या प्रथेचा (शैला इस्लामपूरमधील जातपंचायत बरखास्त करणाऱ्या कार्यकर्त्यांतही सक्रीय होती.) नायनाट करण्यासाठी खंबीरपणे उभी राहिली. ‘शैला लग्न मोडते’ असे म्हणून लोक तिला नावे ठेवत, पण ती मागे हटली नाही. आज, तिच्या परिसरात हुंडा घेण्यास कोणीही धजावत नाही.
शैलाच्या कामाचा मुख्य भाग शिक्षण असा आहे. ती म्हणते, ‘आज शासनदरबारी चांगल्या योजना असल्या, तरी त्यासाठी किमान शिक्षणाची अट असते. मग आमची मुले शिकलेलीच नसतील, तर उपयोग काय? शाळाबाह्य मुले नाहीत, हे कागदोपत्री ठीक. पण प्रत्यक्ष आयुष्याचे मातेरे होणाऱ्यांविषयी सहानुभूती कधी दाखवणार? मुले शाळेत जात नाहीत, कारण त्यांना तेथील भाषा, वातावरण त्यांच्यासारखं वाटत नाही. म्हणूनच महात्मा फुले अभ्यासवर्ग सुरू केला. ज्यांना अभ्यासाची आवड आहे, अशा सगळ्यांना तेथे मुक्त प्रवेश आहे. तेथे मी समाजासाठी व्यावसायिक प्रशिक्षण वर्गही घेते. मी लोकांच्या हातांना काम देऊ शकत नाही, पण दिशा देऊ शकते. प्रबोधन करू शकते. प्रशिक्षण देऊ शकते.’
शैलाला ‘इको नेट’ या संस्थेने फेलोशिप दिली आहे. तिला दुष्काळी भागातील भटक्या विमुक्त महिलांचा अभ्यास आहे. ती माण तालुक्याचा अभ्यास करते आहे. मला त्याचा उपयोग प्रत्यक्ष कामासाठी होणार आहे. नेमके प्रश्न, नेमका स्तर, गुंतागुंत समजेल. त्यातून मग मुलांसाठी शिक्षणासाठीचा पायलट प्रोजेक्ट मला हाती घेता येईल.’
शैलाने एमएसडब्ल्यू करेपर्यंत पुस्तके वाचली नव्हती. आज तिच्याकडे दोन हजार पुस्तके आहेत. तिने ती लोकांच्या भेटीतून मिळवली आहेत. वाचन फार महत्त्वाचे आहे, हे कळण्यास वेळ लागला याची तिला चुटपूट आहे. शैला तिला झालेली ती जाणीव, पाड्या-वस्तींपर्यंत पोचावी यासाठी धडपडते आहे. त्यातून परिवर्तनाची छोटीशी पायवाट रुळावी, एवढीच तिची माफक अपेक्षा आहे...
शैला यादव : 9552626501
हिनाकौसर खान : 9850308200
greenheena@gmail.com
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.