आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍यभिचार हे उपपातक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


विवाहाशी निगडित पातिव्रत्याच्या कल्पना, व्यभिचाराचा संशय घेणे आणि दिव्य करायला लावणे हे तिन्ही मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत. मुलगा नरकात जाण्यापासून वाचवतो, त्यामुळे स्वत:चा मुलगा हवा आणि तो स्वत:चाच आहे याची खात्री करण्याचा डीएनए टेस्टसारखा सरळ मार्ग प्राचीन काळी उपलब्ध नसल्याने ‘पत्नीवर लक्ष ठेवणे’ हा एकमेव सोपा पर्याय पुरुषांना दिसला. लक्ष कुठवर ठेवणार? त्यामुळे तिने उंबरठ्याबाहेर न पडणे, उंबरठ्याआतही घुंगट / पडदा पाळणे, परपुरुषांना घरात न घेणे वा घरातल्याही ‘पर’पुरुषाशी – म्हणजे पती व पुत्र यांच्याखेरीज इतर कुणाही पुरुषाशी न बोलणे, त्याच्याकडे मान वर करून न पाहणे, त्याचा स्पर्श टाळणे, त्याचे चित्र / छायाचित्रही न पाहणे, इतकेच काय त्याला मनातही प्रवेश निषिद्ध ठेवणे व असा संयम राहावा म्हणून व्रतंवैकल्यं करणे अशी बंधनं स्त्रीवर घातली गेली. व्यभिचार ही जणू एकटीने करायची वा एकट्या स्त्रीकडून घडणारी गोष्ट असल्याप्रमाणे सगळी बंधनं स्त्रीवरच लादली गेली; व्यभिचारासाठी तिला एकटीलाच जबाबदार ठरवून दोषी मानलं जाऊ लागलं; आपण गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारीही तिचीच एकटीची मानली जाऊ लागली आणि अर्थातच शिक्षाही तिला एकटीला होऊ लागली. विवाहप्रथा रुजण्याच्या काळापासून हे असंच होतं का आणि कायम असंच राहिलं का, या दोन्हीही प्रश्नांची उत्तरं मात्र ‘नाही’ अशीच आहेत. प्राचीन काळाचा आढावा आधी घेऊ. 


महाभारताच्या आदिपर्वात पंडू राजा कुंतीला म्हणतो की, ‘पूर्वयुगात स्त्रिया कोणाच्या बंधनात नसत, त्या इच्छेला येईल त्याप्रमाणे वर्तन करीत, एका पुरुषाचा त्याग करून दुसऱ्याच्या मागे जात.’ (अ. १२२.४ आणि ७).


अशी स्थिती पंडूच्या वेळेलासुद्धा उत्तर कुरू देशात अस्तित्वात होती, असा अंदाज बांधता येऊ शकतो. महाभारताच्या सभापर्वात (३१.३७। ३८) असे वर्णन केले आहे की, माहिष्मती नगरीतील स्त्रिया अग्नीच्या वराने स्वेच्छाचाराने वागत आणि त्यांचे नियमन करता येत नसे. महाभारतातच असाही उल्लेख आला आहे की, उद्दालकाचा पुत्र श्वेतकेतु ह्याने स्त्रियांच्या स्वेच्छाचाराला बंदी घातली. 


अर्थात ह्या उल्लेखांवरून स्त्री-पुरुष संबंध स्वेच्छाचाराने चालत असत असे सिद्ध करता येणार नाही. कदाचित अशा प्रकारचा समाज त्याकाळी प्रत्यक्ष अस्तित्वात नसून हजारो वर्षांपूर्वी समाजस्थिती कशा प्रकारची होती याबद्दलची ही कविकल्पना असण्याचा संभव आहे. अनिर्बंध असे स्त्री-पुरुष संबंध आरंभीच्या समाजात अस्तित्वात होते अशी कल्पना आता शिष्टसंमत राहिलेली नाही, असं धर्मशास्त्राच्या इतिहासात म्हटलं आहे. (धर्मशास्त्राचा इतिहास; पूर्वार्ध; पृ. १९५) 


याबाबत अनेक दिव्यं आणि विविध शिक्षा अनेकविध जातीजमातींमध्ये आढळतात. खरे तर एखाद्या स्त्रीने व्यभिचार केला तरीही तिला घरातून बाहेर हाकून देण्याचा आणि तिचा त्याग करण्याचा अधिकार धर्मशास्त्रकारांनी तिच्या पतीला दिलेला नाही. यासंबंधीच्या धर्मशास्त्रातील वचनांचा निष्कर्ष असा आहे की, ‘व्यभिचार हे सामान्यतः एक उपपातक असून पत्नीने योग्य ते प्रायश्चित्त घेतल्यास त्या पातकाचा परिहार होऊ शकतो. असे प्रायश्चित्त केल्यावर तिचे पत्नीपणाचे सामान्य अधिकार सर्वही तिला परत दिले पाहिजेत.’ (वसि. २१.१२; याज्ञ. १.७२). याज्ञवल्क्याच्या मते, ‘व्यभिचारी स्त्रीने प्रायश्चित्त केले नाही तर तिला जेमतेम जिवंत राहता येईल इतक्या बेताचे अन्नवस्त्र द्यावे आणि तिचे पत्नीपणाचे सर्व अधिकार काढून घ्यावे.’ (याज्ञ १.७॰). 


अजूनही काही मते मांडली गेली होती, ती थोडक्यात पाहू : एखाद्या स्त्रीने शूद्राबरोबर व्यभिचार केला असेल आणि अशा संबंधापासून तिला अपत्य झाले असेल अथवा गर्भहत्येचा अपराध केला असेल अथवा पतीचा वध करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याबद्दल प्रायश्चित्त घेतल्यानंतरही तिचा धार्मिक कृत्यात भाग घेण्याचा आणि वैवाहिक सुखोपभोगाचा अधिकार काढून घेऊन तिला एका खोलीत कोंडून ठेवावी अथवा घराशेजारी एका झोपडीत ठेवावी आणि पोटही भरणार नाही इतके अन्न आणि हलक्या प्रतीची वस्त्रप्रावरणे तिला द्यावीत (वसिष्ठ २१.१॰; मनु. ११.१७७; याज्ञ. ३.२९७। ९८). अशी कृत्ये करून प्रायश्चित्त घेण्याचे नाकबूल करणाऱ्या स्त्रीला वरील प्रकारचे अन्नवस्त्रही देऊ नये (याज्ञ. ३.२९८ वरील मिताक्षरा). 


याज्ञवल्क्याने व्यभिचाराबद्दल अपराधी ठरलेल्या स्त्रीला उघड्या जागेत कुत्र्यांकडून खावविण्याची शिक्षा द्यावी, असे सांगितले आहे. स्वतःच्या भ्रताराचा वध करण्यासारखे घोर अपराध करणाऱ्या स्त्रीला नाक, ओठ, कान आणि हात तोडून बैलांच्या शिंगांनी फाडविण्याची शिक्षा सांगितली आहे. (याज्ञ. २.२७९). (धर्मशास्त्राचा इतिहास; पूर्वार्ध; पृ. ४७३) काळाच्या ओघात शिक्षांचे स्वरूप बदलले, पण पुरुषांची स्त्रीवर संशय घेण्याची वृत्ती आणि तिलाच एकटीला दोषी ठरवण्याची वृत्ती मात्र काही बदलली नाही. याबाबत कायदेही झाले आणि कायद्यांच्या निमित्ताने अनेक चर्चाही झाल्या. त्यांचा आढावा पुढील लेखात घेऊ.


- कविता महाजन, वसई
kavita.mahajan2008@gmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...