आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझं दुबळेपण उद्या निघून जाईल ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.

माझं दुबळेपण उद्या निघून जाईल 
सावळ्या बाळाला, मोल राघूला येईल 
धन गं संपदा कोण पुसतं मालाला?
आता पुसतील माझ्या कडेच्या लालाला!
यातल्या पहिल्या ओळीमुळे ही ओवी मला आवडली, हे स्पष्ट आहे. पुढचा मुद्दा मात्र निश्चितच विचार करण्याजोगा आहे. पुत्रजन्माचं महत्त्व त्या ओळी अधोरेखित करतात आणि धनसंपदेपेक्षाही स्त्रीला पुत्र असणं महत्त्वाचं आहे, असं थेट विधान करतात. स्त्रिया आणि मालमत्ता हा आजही गहन चर्चांचा विषय आहे. कुमारिका, परित्यक्ता, घटस्फोटिता आणि विधवा अशा एकल स्त्रियांच्या संदर्भात तर तो अधिकच कळीचा ठरतो. स्त्रीने विधवा होणं, तिला त्यानंतर सासरी न ठेवलं जाणं, विधवेने माहेरी परत येणं हे तिच्या भावांना संकट वाटणं यात ‘मालमत्तेचा वाटा’ हा व्यावहारिक मुद्दा छुपा असला, तरी गंभीर स्वरूप धारण करू शकणारा आहे.   


विधवा स्त्रियांचा मुख्य प्रश्न येई, तो उदरनिर्वाहाचा. त्यात तिच्या अन्नवस्त्रांवरच मर्यादा घातलेल्या असल्या, तरी डोक्यावरचं छप्परदेखील नाहीसं होण्याची शक्यता त्यांना भेडसावत असे. त्यात ती निपुत्रिक असेल, तर तिच्या हालांना मर्यादाच उरत नसत. प्राचीन काळी पुत्रहीन मरण पावलेल्या पुरुषाच्या विधवेला तिच्या पतीच्या मालमत्तेवर वारसा मिळत नसे. (धर्मशास्त्राचा इतिहास; पूर्वार्ध; पृ. २३५). त्यानंतरचा उल्लेख स्मृतींमधला आहे. स्मृतींत सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन मरेस्तोवर करणाऱ्या विधवा स्त्रीला तिच्या मृत पतीची मालमत्ता तिच्या हयातीपर्यंत उपभोगता येईल आणि ती मरण पावल्यावर पुत्रहीन असली तरी स्वर्गाला जाईल असे सांगितले आहे. नंतरच्या काळात वारसाहक्काच्या बाबतीत विधवेचा दर्जा सुधारला, परंतु तरी देखील तिला सामान्यतः पतीच्या मिळकतीच्या उत्पन्नाचाच उपभोग घेता येई आणि फक्त तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या कायदेशीर गरजा भागवण्यासाठी किंवा पतीच्या पारलौकिक हिताकरिता म्हणजे श्राद्धपक्ष वगैरे धार्मिक कार्ये व मृत पतीच्या नावे दानधर्म वगैरे करता येण्यासाठी पतीची मिळकत वापरता येई. ती मालमत्ता पतीची स्वकष्टार्जित असणे यासाठी आवश्यक असे; वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर पतीच्या निधनानंतर विधवेला त्यात हिस्सा मागता येत नसे. एकत्र कुटुंब असेल तर तिला घासभर अन्न आणि दोन वस्त्रं याहून काही लाभण्याची शक्यताच नव्हती. त्यातही तिने वैधव्याचे नियम काटेकोरपणे पाळले नाहीत, व्यभिचार केला अथवा कुठल्याही स्वरूपाचे दुर्वर्तन केले आणि समज देऊनही ती पुन:पुन्हा तसंच वागत राहिली, तर तिचा अन्नवस्त्रनिवाऱ्याचा प्राथमिक हक्कही नष्ट होत असे. सदाचरणाची खात्री दिली, आवश्यक ती ‘दिव्यं’ केली, तर त्यानंतरच तिला जेमतेम जिवंत राहता येईल इतपत अन्नवस्त्राचा हक्क पुन्हा दिला जाई. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही अजून काही वर्षं भारतात विधवा स्त्रियांची अवस्था ही अशीच अवघड होती. अंदाजे चाळीसच्या दशकात एकत्र हिंदू कुटुंबातील विधवेची आणि जिच्या पतीने स्वतंत्र मिळकत ठेवली आहे अशा विधवेची स्थिती थोडी सुधारत गेली. 


विधवांना धार्मिक अधिकार ना घरात होते, ना समाजात. शंकराचार्यांनी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असतानाही, त्या विधवा आहेत या कारणास्तव त्यांना दर्शन नाकारलं होतं आणि त्यांच्याशी काही बोलण्यास वा त्यांचा आवाज ऐकण्यासही नकार दिला होता. या ‘विधवे’ला त्यांनी केवळ भिंतीआडून ‘हात उंचावून आशीर्वाद’ दिला. ही घटना त्या काळात प्रचंड गाजली होती. सरसकट समाजात स्वतःच्या विधवा आईव्यतिरिक्त इतर विधवा स्त्रियांचे दर्शन अशुभसूचक असल्याचे समजत आणि म्हणून विधवा स्त्रीला विवाहासारख्या कोणत्याही समारंभात भाग घेता येत नसे (स्कंद पुराण, ब्रह्मारण्य. ७.५०। ५१). आजही विधवांना लग्नघरात कोठी सांभाळण्याची कामं ‘जबाबदारीची आणि विश्वासाची’ म्हणून दिली जातात; जेणेकरून त्या आत एकट्याच कोठीजवळ किल्ल्या सांभाळत बसून राहतात आणि प्रत्यक्ष लग्नसोहळ्यात समोर येत नाहीत. अगदी मुंबईसारख्या महानगरात देखील लग्न लागेतो आलेल्या सर्व विधवा स्त्रिया एका वेगळ्या खोलीत थांबून राहिल्या आणि मंगलाष्टके संपून अक्षता पडल्यावर हॉलमध्ये आलेल्या मी पाहेलं आहे. मग अशा स्थितीत त्यांना स्वत:च्या मुलीच्या / मुलाच्या लग्नातले धार्मिक विधी कोण करू देणार? काही शहरांमध्ये हे चित्र थोडं बदलतं आहे, हे आशादायक असलं, तरी या ‘सुधारक / पुरोगामी’ वृत्तीविषयी मागाहून नाकं मुरडली जातातच. 
“माझं दुबळेपण उद्या निघून जाईल” असं एखाद्या पुत्रवती नसलेल्या, विधवा असलेल्या स्त्रीला देखील ठामपणाने म्हणता येईल आणि स्वत:चे निर्णय स्वत: घेत खंबीर वृत्तीने जगता येईल, तो सुदिन!


kavita.mahajan2008@gmail.com

बातम्या आणखी आहेत...