आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझा ‘पंचतारांकित’ प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबेराॅय या जगभर पसरलेल्या हाॅस्पिटॅलिटी समूहात युरोप खंडाची विशिष्ट जबाबदारी सांभाळणाऱ्या लेखिकेचा प्रवास औरंगाबादेत सुरू झाला. या प्रवासातले काही विशिष्ट टप्पे आणि सध्या करत असलेलं काम याबद्दल तपशीलवार सांगणारी ही कव्हर स्टोरी.


मो ठं झाल्यावर तू काय करणार, किंवा कोण होणार, हा जगभरातल्या मोठ्या माणसांचा लहान मुलांना विचारायचा अगदी आवडता प्रश्न आहे. आणि सगळीच लहान मुलं याला अतिशय मजेशीर उत्तरं देऊन मोठ्यांची करमणूक करतात. वयाच्या पाचव्या वर्षी मी ‘विमानातली मावशी’ होणार म्हणून सांगितलं होतं. चॉकलेट-गोळ्यांनी भरलेल्या अख्ख्या ट्रेच्या हसऱ्या मालकिणीची मला त्या कारणाने फारच भुरळ पडली होती. अर्थात बालसुलभ निरागसतेबरोबर हा विचारही काळाच्या ओघात विस्मरणात गेला. 


अौरंगाबादसारख्या पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या शहरात माझे लहानपण गेले. चाळीस वर्षांपूर्वी जरी अौरंगाबादेतील अौद्योगिक विकासाला सुरुवात झाली असली, आणि अजिंठावेरूळ पाहण्यासाठी देश-विदेशातले अनेक पर्यटक इथे भेट देत असले, तरी  सर्वार्थाने अौरंगाबाद हे एक लहान गावच होतं. नशिबाने शारदा मंदिरसारखी उत्तम शाळा आणि शिक्षक इथे मला मिळाले. मातृभाषेतील शिक्षणाचा आणि त्याबरोबर येणाऱ्या आत्मविश्वासाचा मजबूत पाया इथे घातला गेला. पण करिअरच्या दृष्टीने इथलं मार्गदर्शन मात्र धोपटमार्गाचं आणि चाकोरीबद्ध होतं.


शाळा संपल्यावर पुढे काय करायचं हे ठरत नव्हतं. तेव्हा जरा बऱ्यापैकी बुद्धी असणाऱ्या सर्वच मुलामुलींनी डॉक्टर किंवा इंजीनिअर व्हावं, ही अपेक्षा असे. ही क्षेत्रं मुलांनी करिअर म्हणून का निवडावी, त्यांना या विषयात आवड, गती आहे की नाही, असल्या मूलभूत प्रश्नांचा विचार तेव्हा कुणी करायचं का, अशी शंका वाटते. मेडिकलला अॅडमिशन मिळाली नाही, तर मग जा इंजीनिअरिंगला असंही माझ्याबरोबरच्या काही मुलामुलींनी केलेलं आहे! मला विज्ञानाची अतिशय आवड होती पण डॉक्टर किंवा इंजीनिअर व्हायचे नाही हेही ठामपणे माहीत होतं. आईवडिलांचाही या निर्णयाला काहीच आक्षेप नव्हता. तसंही घरातील वातावरण अतिशय मोकळं आणि पुढारलेलं होतं. पालकांनी आम्हाला कायम ‘आउट अॉफ द बॉक्स’ विचार करायला लावले. डिकन्स, वुडहाउस, जेन अॉस्टिन, स्टीवनसन, ज्यूल्स व्हर्न, मार्क ट्वेन इत्यादींची पुस्तके वाचायला दिली. रीडर्स डायजेस्ट, नॅशनल जिओग्राफिक अशी मासिकं आणून दिली. एका लहान गावात राहूनसुद्धा बाहेरच्या मोठ्या जगाची तोंडओळख घरबसल्या होत होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीच केला नाही. मी मुलगी आहे म्हणून जुडो, पोहणे, टेनिस असे खेळ खेळण्यापासून कधी परावृत्त केले नाही. जीन्स-टीशर्ट किंवा शॉर्ट्ससुद्धा घालायला कधी हरकत घेतली नाही, ‘मुलग्यांशी’ बोलायला, मैत्री करायलाही आडकाठी घातली नाही. आता २०१८ सालात या गोष्टी साध्या सोप्या वाटतात, आपण या गृहीत धरतो, पण त्या काळात माझ्या अनेक मैत्रिणींना हे स्वातंत्र्य नव्हतं. मूळ स्वभाव मोकळा आणि बोलका असल्याने मला ढीगभर मैत्रिणी आणि तितकेच मित्रही होते. सगळ्यांपेक्षा वेगळी असल्याचा या लहान गावात मला दुर्दैवाने थोडाफार त्रासही झाला, पण आईवडील पाठीशी खंबीरपणे उभे होते. भविष्यात या सगळ्याचा खूपच फायदा झाला. 


आपल्याला काहीतरी करायचंय, घराबाहेर पडून स्वतंत्र व्हायचंय, इतकं तेव्हा कळत होतं. पण नेमकं काय करायचं, हा मार्ग सापडत नव्हता.
यथावकाश मार्केटिंग घेऊन एमबीए केलं आणि त्यानंतर योगायोगाने चालून आलेल्या संधीमुळे हाॅटेल व्यवसायात सेल्स आणि मार्केटिंगचा जॉब निव्वळ कुतूहलापायी निवडला.


त्या काळात बऱ्याचशा मराठी मध्यमवर्गीय लोकांची ‘पंचतारांकित’ हाॅटेल्सशी ओळख प्रिया तेंडुलकरांच्या याच नावाने प्रसिद्ध झालेल्या कथेपुरतीच होती, आणि त्यांनी केलेलं चित्रण फारसं प्रशंसनीय नव्हतं. तेंडुलकरांना कदाचित काही वाईट अनुभव आलेही असतील, पण अशा माहितीमुळे अॅडव्हर्टायझिंग आणि हॉस्पिटॅलिटी यांसारख्या व्यवसायांबद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात होते. अशा पार्श्वभूमीवर मी निवडलेल्या करिअरबद्दल लोक साशंक नाही झाले तर त्यात काय नवल! इतकी हुशार मुलगी हाॅटेलमध्ये का काम करते? रिसेप्शनिस्ट आहे का? तुम्हाला चालतं का हे? असे प्रश्न आईबाबांना आडून आडून विचारले जायचे.


पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. भारताची अर्थव्यवस्था बदलू लागली होती. खुल्या बाजारपेठेमुळे अनेक परदेशी कंपन्या भारतात पाय रोवू लागल्या होत्या आणि त्यामुळे हॉटेल व्यवसायालाही भरभराटीचे दिवस येऊ लागले होते. युरोप आणि अमेरिकेतून येणाऱ्या या प्रोफेशनल बिझनेस ट्रॅव्हलर्सच्या गरजा समजून घेण्यासाठी; त्यांच्या मीटिंग्स, कॉन्फरन्सेस, इत्यादीसाठी त्यांच्याच इतकी प्रोफेशनल सर्व्हिस देता यावी, आणि जागतिक पातळीवर अग्रेसर असणाऱ्या रिट्झ कार्लटन किंवा फोर सीझन्स यांसारख्या प्रख्यात होटेल कंपन्यांशी भविष्यात येणाऱ्या अपरिहार्य स्पर्धेला तोडीस तोड प्रत्युत्तर देता यावं या हेतूने आमच्या कंपनीने ‘मॅकेंझी अँड कंपनी’ या आंतरराष्ट्रीय मॅनेजमेंट फर्मला कन्सल्टन्ट म्हणून नेमलं. याचा आम्हाला व्यावसायिक स्तरावर खूप उपयोग झालाच, पण वैयक्तिकरित्यासुद्धा बरंच काही शिकायला मिळालं. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या लोकांच्या कार्यपद्धतीची तोंडओळख इथे झाली. पुढे कामानिमित्त परदेश प्रवासाच्या अनेक संधी मिळत गेल्या आणि वीस वर्षांपूर्वी मी लंडनला स्थलांतर केलं. लहानपणी जगप्रवासाची स्वप्नं मी बघितली होती, पण कायमस्वरूपी परदेशात स्थायिक होण्याचा विचार कधीच केला नव्हता. हे निव्वळ योगायोगानेच घडले.


भारतात असताना जरी पाश्चिमात्य लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव असला तरी प्रत्यक्ष त्यांच्या देशात राहून काम करण्यात बराच फरक आहे. सुरुवातीला जम बसवणं सोपं नक्कीच नव्हतं. इंग्रजी भाषा जरी आपल्याला उत्तम येत असली, तरी इंग्रजांचं इंग्रजी समजणं महाकर्मकठीण. समोरचा माणूस भराभर बोलू लागला की, समजून घेताना अगदी तारांबळ उडायची. याशिवाय इंग्रजी ‘ड्राय सेन्स ऑफ ह्यूमर’ हा एक अफलातून प्रकार आहे. वुडहाऊसच्या पुस्तकांतून जरी याची ओळख असली, तरी प्रत्यक्षात अगदी मख्ख चेहरा ठेवून शालजोडीतून मारलेले टोमणे, किंवा समोरचा माणूस आपले कौतुक करतो आहे की, उपरोधाने कीव करतो आहे हे नीटपणे समजायला इथे काही वर्षं घालवावी लागतात. आता, माझा सेन्स ऑफ ह्यूमर भारतीय लोकांना बरेचदा कळत नाही आणि माझी पंचाईत होते. असो.


तर मी ओबेरॉय होटेल समूहाच्या युरोपिअन सेल्स व मार्केटिंग आणि बिझनेस डिव्हेलपमेन्ट विभागाची प्रमुख म्हणून काम करते. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी येथील आमची ऑफिसेस माझ्या अधिकाराखाली येतात. आमचा बिझनेस साधारणपणे ४०% पर्यटन आणि ६०% कॉर्पोरेट बिझनेस ट्रॅव्हल, आणि मीटिंग्स व कॉन्फरन्सेस असा आहे. युरोपिअन मार्केटमधून अंदाजे साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांचा (पन्नास ते साठ मिलियन डॉलर्स) महसूल कंपनीला अपेक्षित आहे. या कामाच्या निमित्ताने माझा टूरिझम व्यवसायातल्या अनेक लोकांशी संबंध तर येतोच, पण कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक लोकांची गाठ पडते. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना हे माहीत असेलच की, आपल्या प्रॉडक्ट आणि बिझनेसच्या इत्थंभूत माहितीबरोबरच तुमच्या ग्राहकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आपले प्रॉडक्ट वळवता येण्याचं कसब फार महत्त्वाचं असतं. या ग्राहकांची मानसिकता लक्षात घेताना त्यांची संस्कृती, रीतिरिवाज, आवडीनिवडी यांचा अभ्यास करावा लागला. इंग्रज लोक सर्वसाधारणपणे अलिप्त असतात, त्यांचं रुक्ष वागणं शिष्टपणाचं असल्याचे गैरसमजही होतात. पण एकदा तुम्ही त्यांच्या या बाह्य कवचाला फोडून त्यांना बोलतं केलं, तर त्यांच्यासारखे सोशल आणि इंटरेस्टिंग लोक दुसरे नाहीत. इथे राहून काम करायचं तर त्यांच्यातील एक होऊन राहणं फार महत्त्वाचं आहे. 


इथल्या अनुभवांमध्ये सगळ्यात प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे या लोकांमध्ये असणारी समानतेची भावना. मग ती स्त्री-पुरुष समानता असो, नाही तर वेगवेगळ्या स्तरांवर आणि पदांवर काम करणाऱ्या लोकांतील, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागवलं जातं. उच्चपदस्थ सहकारी आपल्या हाताखालच्या माणसांकडे तुच्छतेने पाहात नाही, त्यांना तसं वागवतही नाही. तसेच एखाद्या ज्युनिअर व्यक्तीला आपल्या बॉसचं म्हणणं पटलं नाही तर ती व्यक्ती मोकळ्या मनाने बॉसशी यावर चर्चा करू शकते, प्रसंगी वादही घालू शकते. मॅनेजिंग डायरेक्टर कॉफी ब्रेकमध्ये डिस्पॅच डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्याबरोबर सहजपणे फुटबॉलवर गप्पा मारतात. एके काळी अत्यंत औपचारिक असणारे इंग्रज आता खूपच माणसाळले आहेत आणि चक्क सगळे जण एकमेकांना एकेरी नावाने संबोधतात. अर्थात या सलगीचा अवाजवी गैरफायदाही कोणी घेताना अजिबात दिसत नाही.


दुसरी गोष्ट म्हणजे शिस्तप्रियता आणि जीव ओतून काम. वेळेचा आदर करणं यांच्याकडून शिकावं. मीटिंग्सना कोणी उशिरा येत नाहीत, अपॉइंटमेंटशिवाय भेटायला येत नाहीत, भेटत नाहीत. सांगितलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधी हजर होतात, उशीर होणार असेल तर कळवतात. ३० मिनिटांचा अवधी दिला असेल तर पंचविसाव्या मिनिटाला आवरतं घेतात. नऊ वाजता ऑफिसमध्ये येतात आणि साडेपाचला उठून चालायला लागतात. मात्र नऊ ते पाच या दरम्यान कुठेही फारसा टाइमपास न करता कामच करतात! वर्क-लाइफ बॅलन्स इथल्या लोकांना जास्त चांगला जमतो असं वाटतं.


फास्ट फॉरवर्ड २०१८ : भारतातील परिस्थिती आता बदलते आहे. नवीन पिढीच्या मुली कितीतरी नवनवीन क्षेत्रांत अतिशय आत्मविश्वासाने आणि धडाडीने चमकदार कामगिरी करताना दिसतायत. या मुलींना आपलं स्वातंत्र्य आणि भवितव्य आपल्याच हातात आहे याची पुरेपूर जाणीव आणि उमज आहे हे पाहून त्यांचं खूप कौतुक वाटतं आणि यामुळे येत्या काळात आपल्या समाजातही अतिशय सकारात्मक बदल घडत जातील अशी आशा वाटते. गेल्या दहा-बारा वर्षांत परदेशात स्थलांतरांचे प्रमाणही खूपच वाढले आहे. समृद्ध जीवनशैलीपेक्षा प्रोफेशनल वर्क कल्चर हा मुद्दा बऱ्याच स्थलांतरित लोकांना इथे (युरोपात किंवा अमेरिकेत) राहण्यासाठी उद्युक्त करतो असं म्हणायला हरकत नाही. मात्र याबरोबर शिस्त, आदर, व्यक्तिस्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी हे सगळं अंगीकारणं अगदी आवश्यक आहे. इथे राहताना परक्यांसारखं न राहता इथलंच होऊन राहिलं तर आयुष्य सुकर आणि यशस्वी होतं.


भारतातल्या नकोशा प्रथा
प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऑफिसात उशिरापर्यंत बसून राहण्याची अत्यंत वाईट प्रथा आपल्याकडे आहे. वेळेवर घरी जाणारा कामचुकार आहे अशीच संभावना होते. यामुळे कामाच्या वेळात इतर उद्योग करून, नंतर उशिरापर्यंत ऑफिसमध्ये बसून कामं संपवण्याची वृत्ती बळावू लागते. लोकांच्या ईमेल्सना, पत्रांना वेळेवर उत्तरं न देणं, मीटिंगमधे असताना सतत मोबाइल फोनवर मेसेज पाहणं, डेडलाइनकडे पूर्ण दुर्लक्ष करून नंतर मुदत वाढवून मागत राहणं, या भारतीय लोकांच्या अतिशय वाईट सवयी आहेत. यामुळे एफिशिएन्सीवर वाईट परिणाम होतो, नाहीतर ओव्हरटाईममध्ये कामे केल्याने पर्सनल आयुष्यावर, कौटुंबिक वेळावर याचा भार पडतो. अर्थात भारतीय पद्धतीत एखादे काम वीकेंडला करायला सांगितले तर आपले कर्मचारी कुरकुरत का होईना करतात तरी, इथले लोक स्वच्छपणे सोमवारपर्यंत शक्य नाही म्हणून सांगतात! भारतात असताना मोठ्या सेल्स टीममध्ये काम करायची सवय होती. इथे जे काम एक-दोघे करतात, त्यासाठी भारतात ४-५ जणांची फौज असते. या पद्धतीत जुळवून घेणं सुरुवातीला अवघड गेलं.


स्त्री म्हणून सुखद अनुभव
एक स्त्री म्हणून इथे राहण्याचा आणि काम करण्याचा माझा अनुभव अत्यंत सुखदायी आहे. ऑफिसमधलं वातावरण जवळपास न्यूट्रल-जेंडर पातळीवर असते. टीम मेम्बर्सना आपण एका बाईला रिपोर्ट करतो आहोत याचा खेद नसतो, कमीपणाही वाटत नाही. स्त्रीदाक्षिण्य दाखवणं ही जरी इथली संस्कृती असली तरी याचा अतिरेक कोणी करत नाही. अॉफिसमधे असो किंवा घरी, सगळे जण स्वतःची कामं स्वतः करतात, त्यात स्त्री-पुरुष भेदभाव होत नाही. स्त्री म्हणून तुम्हाला सवलतीही अर्थातच मिळत नाहीत. तुम्ही काय कपडे घालता, काय खाता-पिता, कुणाबरोबर बोलता, कुठे जाता, कधी घरी येता, इत्यादींची चर्चा ना तुमचे शेजारी-पाजारी करतात, ना तुमचे सहकर्मचारी; ना यावरून तुमच्या चारित्र्याची चर्चा होते. एक अत्यंत ताजीतवानी मोकळीक इथल्या सामाजिक वातावरणात आहे. ज्याने त्याने आपापली नैतिक मर्यादा ठरवावी आणि त्याप्रमाणे वागावं, समाज तुमचं कोर्ट मार्शल करत नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे छेड काढणं हा प्रकार मी एकदाही अनुभवला नाही. सार्वजनिक वाहन असो वा अपरात्र, एक बाई म्हणून कोणी तुम्हाला ओंगळ नजरेने बघतंय किंवा घाणेरडं बोलतंय, असं वागणं अगदी विरळाच. याचा अर्थ असा नाही की, इथे स्त्रियांविरुद्ध गुन्हे होत नाहीत, पण प्रमाण अतिशय कमी आहे.


-  ललिता जेम्स, लंडन
james.lalita@gmail.com  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...