आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निळ्या बुरख्‍याआडची अफगाणी स्‍त्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज जगभरात अफगाण स्त्रीची प्रतिमा निळ्या बुरख्यात बंदिस्त अशी झालेली आहे. याला जबाबदार आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमं आहेत. पण परिस्थीती बदलते आहे, आणि अफगाणी स्त्रिया त्यांच्या हक्क व अधिकारांसंबंधी बोलू लागल्या आहेत.


‘स्त्रियांना त्यांच्या हक्कांची, अधिकारांची, गुलामगिरीची जाणीव होणे गरजेचे आहे. आज जरी त्या स्वातंत्र्याच्या गोष्टी बोलत असल्या ती त्यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या पुरुषच ठरवतात. पुरुषसत्ताकता ही फक्त व्यक्तीपुरती मर्यादित नसून ती सामाजिक विकास, राजकारण, संस्कृती, इतिहास अशा सर्वच माध्यमात वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात असते. त्याचा पूर्ण अभ्यास केला तरच स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी, स्त्रीपुरुष समानतेसाठी योग्य प्रकारे काम करता येईल. आम्हाला अफगाणिस्थानातील विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे शिक्षण देणारी एक व्यवस्था निर्माण करायची आहे, म्हणून आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्त्री अभ्यास केंद्रात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला,’ असं अफगाणी विद्यार्थी मार्जिया आणि तिचा पती नासिर सांगत होते.


मार्जिया  आणि नासिर यांनी समाजशास्त्रात  विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते एकत्र शिकत होते. शिकत असताना दोघांची मैत्री झाली, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला, अतिरिक्त खर्च टाळून उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, तोही बाहेरच्या देशात जाऊन. 


भारतात सर्व जातिधर्माचे लोक राहतात. भारताला आम्ही जवळचा मित्र समजतो, तर पुण्यातील सामाजिक संस्कृतीबद्दल खूप ऐकले आहे. इथल्या लोकांमध्ये आम्हाला सुरक्षित वाटते म्हणून आम्ही शिक्षणासाठी पुण्याला प्राधान्य दिलं. पण इथं आल्यावर ज्या वेळी इथल्या आजूबाजूच्या स्त्रियांची स्थिती पाहते त्यावेळी आमचा देश असो किंवा भारत, महिलांचे प्रश्न  गंभीर आणि दुर्लक्षित असल्याची जाणीव होते. जागतिक पातळीवर स्त्रियांसाठी काम करणं किती महत्त्वाचं आहे, असं पुन्हापुन्हा लक्षात येत राहातं, मार्जिया आणि नासिर सांगतात. हेरातमध्ये वाढलेलल्या मार्जियाच्या इथे येऊन शिकण्यात काय लक्षणीय आहे, ते कळण्यासाठी तिच्या देशातली परिस्थिती जाणून घ्यायला हवी. अफगाणिस्तानात गेल्या अनेक वर्षांपासून युद्धजन्य परिस्थिती आहे, तालिबान व इतर दहशतवादी हल्ले नेहमीचेच आहेत.  याची मोठी किंमत महिलांना चुकवावी लागते. अशी परिस्थितीत असूनही आज पत्रकारितेच्या क्षेत्रापासून वैमानिक होण्यापर्यंत तिथल्या महिला पुढं येऊ लागल्या आहेत. अशा दहशतीच्या वातावरणात मुलींची जडणघडण भीतीपासून सुरू झालेली असते. तिथून सुरुवात करून एखाद्या क्षेत्रात काम करण्याचं धाडस निर्माण होण्यापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नाही, पण या भीतीच्या छायेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न अनेक जणी करू लागल्या आहेत, मार्जिया त्यातलीच एक.


मध्यंतरी झान या वृत्तवाहिनीतील एका महिला पत्रकाराला एक दहशदवादी संघटनेकडून धमकी देण्यात आल्याने तिने नोकरी सोडली, पण वृत्तवाहिनी आणि कुटुंबाकडून सहकार्य आणि पाठिंबा मिळाल्याने ती पुन्हा कामावर रुजू झाली. अरियाना सईदसारख्या गायिका आता स्टेज शो करत आहेत.  हळू हळू परिस्थितीत बदलत आहे आणि या बदलाचं श्रेय मार्जिया अफगाणिस्थानातील वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांना व मालिकांना देते. त्यामुळेच तिने अफगाणिस्थानातील माध्यमांमुळे समाजात स्त्रियांच्या परिस्थिती झालेले सकारात्मक बदल हा विषय संशोधनासाठी घेतला आहे. 


या दहापंधरा वर्षांत अफगाणिस्थानात सोशल मीडियाचा प्रसार अत्यंत वेगाने झाला आहे. अनेक वृत्तवाहिन्यांमधून प्रवाहाविरुद्ध जाऊन काम करणाऱ्या व्यक्तिरेखा दाखविल्या जातात. त्यामध्ये प्रेमविवाहांना समर्थन, महिलांचे सक्षमीकरण, व्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्या महिला अशा व्यक्तिरेखा दाखविल्या जातात. त्याचा परिणाम युवा पिढीवर होत आहे. महिलांनी एकत्र येऊन दैनिक सुरू केले आहे. या दैनिकात स्रियांच्या प्रश्नावर, हक्क व अधिकारांवर लिहिले जाते आणि या दैनिकात महत्त्वाच्या पदांवर महिलाच काम करतात. झान टीव्ही ही पहिली वाहिनी आहे जी महिलांनी महिलांसाठी सुरू केली आहे. या वाहिनीत वृत्तनिवेदनापासून अनेक पदांवर महिलाच काम करतात. तर टोलोसारख्या वाहिनीवरून शिरीन ही मालिका दाखवली जात होती, यामधील स्त्री भूमिका या स्वतंत्र विचार करणाऱ्या, निर्णय घेणाऱ्या, सक्षम खंबीर स्वबळावर आयुष्य जगणाऱ्या अशा दाखविल्या आहेत. ही मालिका अत्यंत लोकप्रिय होती आणि याचे सकारात्मक परिणाम अफगाण समाजावर होत आहेत, आणि हाच माझ्या संशोधनाचा विषय पण आहे.


आम्ही अल्ला, कुराण या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतो. धर्माची मक्तेदारी चुकीच्या व्यक्तींकडे असल्यामुळे ते त्यांच्या सोयीचा अर्थ लावतात. स्त्रियांना आपल्या वर्चस्वात ठेवण्याचा प्रयत्न करतात. स्त्रियांचे प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहेत. आमच्या धर्माने आम्हाला कयास म्हणजे विवेकबुद्धीचा वापर करून कोणत्याही गोष्टीचा विचार करण, आणि   इजतेहाद म्हणजे तर्कशुद्ध  विचार करून निर्णय घेणं, व मानवता शिकवली आहे. आपण प्रत्येक गोष्टींची उत्तर कुराणामध्ये कशी शोधू शकतो? त्यामुळे माझ्या बुद्धीला जे पटेल तेच मी करेन. माणूस म्हणून माझे विचार, माझं अस्तित्वच कुणी नाकारत असेल बंदिस्त करत असेल, तर अशा गोष्टी मला मान्य नाहीत. आपला देवधर्म आपण आपल्या घरी आणि मनात ठेवावा आणि बाहेर माणूस म्हणून जगणे महत्त्वाचं आहे.


आज महिला प्रश्नांवर अभ्यास करताना मला शिक्षण व्यवस्था महत्त्वाची वाटते. आज अफगाणिस्थानमध्येही महिला शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हेरातसारख्या मोठ्या विद्यापीठात मुलींचे प्रमाण अधिक आहे. पण जेंडर स्टडीसारख्या अभ्यासक्रमांची गरज आहे. आमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही अशी शिक्षणव्यवस्थेची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. स्त्रीपुरुषांनी एकत्रितपणे स्त्री प्रश्नांवर काम करण्याची व्यवस्था निर्माण करायची आहे. कारण स्त्री प्रश्न हे केवळ स्त्रियांचे नाहीत तर पूर्ण समाजाचे आहेत. या कामात माझं कुटुंब आणि माझे पती माझ्या सोबत आहेत. 


- मिनाज लाटकर, पुणे
minalatkar@gmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...