आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिनाची गोष्‍ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला दिनाची गोष्ट. ती संध्याकाळी तुफान गर्दीच्या लोकलमधनं प्रवास करताना शेजारच्या दोघींच्या गप्पा तिच्या कानावर पडत होत्या. तुमच्या आॅफिसात काय होतं सेलिब्रेशन महिला दिनाचं, आमच्याकडे लंच होतं छान. आमच्याकडे काहीच नाही. असं कसं गं. त्या सोनलच्या आॅफिसातही बरेच कार्यक्रम होते. ती परदेशी कंपनीत काम करते ना, हे सगळे डेज परदेशातलेच तर आहेत, भारतीय कंपन्यांना काय पडलंय त्याचं!


ऐकून तिला धक्काच बसला, वाईटही वाटलं. पण तिने वाद नको म्हणून याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. पण जेव्हा मदर्स डे आणि फादर्स डेशी या दिवसाची तुलना झाली, तेव्हा मात्र तिला राहावलं नाही. इतक्या बातम्या, इतके लेख, इतक्या जाहिराती, टीव्हीवरच्या इतक्या मुलाखती, पुरस्कार समारंभ होऊनही मुंबईतल्या सुशिक्षित नोकरदार स्त्रीला महिला दिन हा निव्वळ पाश्चिमात्य कल्पनेतून आलेला आणखी एखादा ‘डे’ वाटत असेल, तर काहीतरी चुकतंय ना? एखादा दिवस कशाला कौतुक, रोजच करा की, नाहीतर आपल्याला रोजच घरीदारी मरमर मरावं लागतं, असं ती प्रवासी म्हणाली, तेव्हा वाटलं की, यातूनच मार्ग काढण्यासाठी महिला दिनाचा उपयोग होणारेय, हे कसं समजवावं?


जगभरातल्या अनेक देशांमध्ये महिला संघटना, कार्यकर्त्या, चळवळी अनेक दशकांपासून स्त्रियांच्या समस्यांवर उत्तरं शोधतायत, त्यांचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून झटतायत. याच प्रयत्नांना एक संघटित रूप मिळावं, नियोजनाचा फायदा व्हावा, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. त्याचा उत्पादक व सेवा पुरवठादार व्यावसायिक फायदा करूनही घेत असतील, पण जागतिक पातळीवर कामही होतंच की. या निमित्ताने चांगलं काम करणाऱ्या स्त्रिया आपल्यासमोर येतात. जसं समस्यांवर बोललं जातं, तशीच उपायांचीही चर्चा होतेच की. प्रत्येक सर्वसामान्य बाईपर्यंत महिला दिनाचे फायदे सोडा, असा दिवस असतो ही माहितीही नसेल पोचली अजून, पण अनेकजणींना या दिनाच्या निमित्ताने काही क्षण आनंदाचे मिळतायत, हे नक्कीच. त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?
लोकलमधल्या त्या प्रवासी शेजारणीचं थोडंसं प्रबोधन तिने केलंच, पण त्यातून इतकं स्पष्ट कळलं की, अशा कित्येक जणी असणारेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.

 

- मृण्मयी रानडे, मुंबई

mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...