आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकेपार रोवले झेंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परवा जागतिक महिला दिन. महिला आणि त्यांच्या जगण्याविषयी बोलण्याचा विशेष दिवस. त्यांचं स्त्रीत्व साजरं करण्यासाठी हे निमित्त. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे मधुरिमाचाही विशेषांक आज घेऊन आलोय. या अंकातून भेटणार आहेत अशा काही स्त्रिया, ज्यांनी परदेशात निव्वळ आपल्या कामाने, मेहनतीने, कर्तृत्वाने एक ठसा उमटवलाय. किंवा, ज्या परदेशी स्त्रियांनी भारतात येऊन लक्षणीय काम केलंय. 


परदेशात जाणं गेल्या काही वर्षांत नवीन राहिलेलं नाही, आपल्या प्रत्येकाच्या घरची नसली तर शेजारची, जवळच्या नात्यातली एखादी तरी व्यक्ती परदेशात शिक्षण वा नोकरीसाठी गेलेली असतेच बहुधा. मग या अंकातल्या ललिता किंवा शलाका यांचं का बरं कौतुक, असा प्रश्न पडू शकतो. योगायोगाची गोष्ट अशी की, या दोघी मूळ औरंगाबादच्या. ललिता जेव्हा पंचवीसेक वर्षांपूर्वी तिथून नोकरीसाठी बाहेर पडल्या, तेव्हा मुलींनी नोकरीसाठी बाहेरगावी जाण्याचं प्रश्न अगदीच कमी. त्यातही हाॅटेलात नोकरी तर टीकेसच पात्र. परंतु टीकेला न जुमानता त्या तेव्हा बाहेर पडल्या म्हणूनच आज इतकी मोठी जबाबदारी सांभाळतायत, हे निश्चित. शलाकावरही, दहा वर्षापूर्वीच अगदी, साधारण अशीच टीका झाली, पण ती तिच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी काहीही करायला तयार होती. तीही तेव्हा बाहेर पडली म्हणून आज कर्करोगासारख्या प्रचंड पसरलेल्या रोगावर औषध शोधायचा प्रयत्न करतेय. या दोघींचाही प्रवास १०० टक्के सुखाचा, सोपा, सरळ नाहीच. आव्हानं आली, येत राहणारच. पण त्यांनी या अडचणींचा बाऊ केला नाही, हे महत्त्वाचं.


गेल आॅम्वेट, गौरी ब्रह्मे यांचीही कामं अगदीच वेगळी, आलेल्या अडचणींवर मात करत सुरू ठेवलेली. नूपुर आणि रेणुका याही परदेशात राहून स्वतंत्रपणे काम करतायत. भारतात येऊन आपल्या मायदेशातली परिस्थिती बदलण्यासाठी शिकणारी मार्जियाही वेगळीच.
महिला दिन कशासाठी साजरा करायचा, सगळे दिवस त्यांचेच असतात, वगैरे कुत्सित विनोदांचा मारा सोशल मीडियावर सुरू होईलच आता. पण अशा कुचकटपणाकडे दुर्लक्ष करून किंवा त्याकडे निव्वळ विनोद म्हणूनच पाहून, आपण आपलं काम करत राहावं, हेच बरं. सर्वांना महिला दिनाच्या, तुमची स्वप्नं पूर्ण करण्याचं बळ तुम्हाला मिळो, अशा शुभेच्छा.


- मृण्मयी रानडे , मुंबई 
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...